प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी एमएमआरडीएची पंचसूत्री

Total Views |

मुंबई, मोनोरेल प्रवाशांची सुरक्षितता ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. मंगळवार दि. १९ रोजी घडलेल्या घटनेनंतर एमएमआरडीएने आणि एमएमएमओसीएलने प्रवाशांची गैरसोय होऊ नये तसेच अशा घटनेची पुनरावृत्ती होउ नये यासाठी अंशकालीन तसेच दीर्घकालीन उपाययोजना हाती घेतल्या आहेत. प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत आम्ही पूर्णपणे बांधील आहोत. तसेच अशा घटनेची पुनरावृत्ती होणार नाही याची सर्वतोपरी काळजी घेण्याचे आदेश महा मुंबई मेट्रोला एमएमआरडीएने दिले आहेत.

मोनोरेल हे मुंबईकरांसाठी एक महत्त्वाचे सार्वजनिक परिवहन साधन आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी व सोयीसाठी आम्ही सातत्याने उपाययोजना करत आहोत. अल्पकालीन दुरुस्तीपासून ते नव्या गाड्यांच्या समावेशापर्यंत — प्रत्येक पाऊल हे प्रवाशांना सुरक्षित, विश्वासार्ह आणि सुखकर प्रवास मिळावा यासाठीच आहे. कालच्या घटनेनंतर एकही प्रवासी जखमी न होता सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले, ही आमच्यासाठी मोठी दिलासादायक बाब आहे.आम्ही मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि अग्निशमन दलाचे आभारी आहोत, असेही एमएमआरडीएने म्हटले आहे.

अंशकालीन उपाययोजना

१. अतिरिक्त प्रवासी नियंत्रण

मोनोरेलची क्षमता १०४ टनांपर्यंत आहे. पण मोनोरेल गाड्यांचे एकूण आयुर्मान पाहता तसेच त्यांची परिवहन क्षमता पाहता यापुढे कोणत्याही गाडीत प्रवासी संख्येची मर्यादा ओलांडली जाऊ नये याची काळजी घेतली जाणार आहे. आणि ही प्रवासी क्षमता १०२ ते १०४ दरम्यान इतकीच राहिल यापेक्षा वाढणार नाही यासाठी स्टेशनवरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. गाडीत प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त गर्दी झाल्यास प्रवाशांना सुरक्षितपणे उतरवून नंतरच गाडी पुढे सोडण्याचे निर्देश दिले आहेत.

२. अतिरिक्त कर्मचारी तैनात

प्रत्येक ट्रेनमध्ये एक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आला आहे, जो आतील गर्दीवर लक्ष ठेवेल. तसेच मोनो पायलटसह एक टेक्निशियनही पाठवला जाणार आहे.

३. आपत्कालीन खिडक्यांची तपासणी व लेबलिंग

प्रत्येक मोनोरेलमध्ये ४ डबे असून प्रत्येक डब्यात २ व्हेंटिलेशन खिडक्या आहेत — म्हणजे एका गाडीत एकूण ८ खिडक्या. या खिडक्यांची तातडीने तपासणी करून त्यांचे स्पष्ट लेबलिंग करण्याचे आदेश दिले आहेत, जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांनी घाबरुन न जाता संयम बाळगावा.

४. अधिक सक्षम सूचना फलकांची उभारणी

आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांनी काय करावे, सुरक्षित मार्ग कुठला आहे, याबाबत स्पष्ट माहिती असलेले सूचना फलक गाड्यांमध्ये लावण्यात आले आहेत. त्यात वाढ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत म्हणजे या सुचना अधिक ठळकपणे सहज प्रवाशांना दिसतील.

५. सुरक्षा तपासणी

मोनोरेलच्या सर्व गाड्यांची तातडीने तपासणी करण्याचे डायरेक्टर मेंटेनन्स यांना देण्यात आले आहेत. यामुळे वरील सर्व बाबी काटेकोरपणे अंमलात येतील.

दीर्घकालीन उपाययोजना


मोनोरेलसाठी नव्या १० गाड्या मागवण्यात आल्या आहेत. त्यापैकी ७ गाड्या डेपोमध्ये दाखल झाल्या असून त्यांची तपासणी आणि ट्रायल सुरु आहे. या ट्रायलनंतर सर्टिफिकेशन प्रक्रिया पूर्ण होईल आणि मग या गाड्या सेवेत दाखल केल्या जातील. त्यामुळे प्रवासी क्षमता वाढेल आणि उपलब्ध मोनोगाड्यांवरील ताण कमी होईल.


गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.