‘इमानाचं घर, इमानाचं नाव पायजे’ — भाषाप्रभू जगन्नाथ महाराजांचा गरजता आवाज; नवी मुंबई विमानतळ नामकरणाचा विषय "सरावनसरीतून" घुमला!

    20-Aug-2025
Total Views |

कल्याण : 
“विमानाच्या घराला नाव पायजे, तर इमानाच्या घराचं नाव पायजे!” या गगनभेदी शब्दांनी श्रीमलंगगडाच्या पायथ्याशी भरलेल्या तिसऱ्या आगरी साहित्य संमेलनाचा प्रारंभच जणू ‘नवी मुंबई विमानतळ नामकरणा’वरील ठाम घोषणेतून झाला. भाषाप्रभू ह.भ.प. जगन्नाथ महाराज पाटील यांच्या आगरी बोलीतील प्रखर प्रवचनाने श्रोत्यांची मने जिंकलीच, पण ‘दि.बा. पाटील’ यांच्या नेतृत्वाची उजळणी करत त्यांनी ठणकावले की समाजाच्या इतिहासाशी, त्यागाशी आणि अस्मितेशी कुणालाही खेळ करता येणार नाही.

१७ ऑगस्ट रोजी पार पडलेले ‘सरावनसरी २०२५’ हे संमेलन साहित्य, अध्यात्म, संस्कृती, शौर्य आणि कलेची जत्रा ठरले. आगरी ग्रंथालय चळवळ आणि समाज कल्याण न्यास यांच्या संयुक्त विद्यमाने जोशी बाग, श्री मलंगगड पायथा येथे रंगलेल्या या कार्यक्रमाला लोककवी अरुण म्हात्रे अध्यक्षपदी, तर डॉ. सोन्या पाटील स्वागताध्यक्ष म्हणून विराजमान होते. संमेलनाला आगरी बांधवांसह साहित्यिक, कलाकार, सामाजिक व राजकीय मान्यवरांची प्रचंड उपस्थिती लाभली.

या संमेलनात मलंगगड आंदोलनाचा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला. गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेल्या या आंदोलनात भूमिपुत्रांचा मोठा सहभाग असून, भूमिपुत्रांच्या अस्मितेची लढाई अद्याप जोमाने सुरु आहे. या संदर्भातील परिसंवादात चित्रकार व इतिहास अभ्यासक मोरेश्वर पाटील, हिंदू मंचाचे अध्यक्ष दिनेश देशमुख, रामायणाचार्य विश्वनाथ महाराज वारिंगे, जयेश महाराज भाग्यवंत, विनीत महाराज म्हात्रे आदींचा सहभाग होता. वक्त्यांनी मलंगगड हा हिंदूंच्या अस्मितेचा गड असल्याचे ठामपणे सांगत हिंदुत्ववादी भूमिका स्पष्ट केली.

इतर सत्रांमध्ये ॲड. विवेक भोपी यांनी आगरींच्या शौर्यगाथा उजागर केल्या. चित्रकार मोरेश्वर पाटील, विश्वनाथ महाराज वारिंगे व इतरांनी इतिहास-अध्यात्माचा मेळ घडवला. ‘आगरी समाज व सामाजिक चळवळ’ या चर्चासत्रात सीए निलेश पाटील, सुशांत पाटील, अभिनेता मयुरेश कोटकर यांनी सामाजिक भान देणारे मुद्दे मांडले.

लोकगीतांच्या कार्यक्रमात किसन फुलोरे, चंद्रकला सुतार-दासरी, संतोष चौधरी (दादुस), जगदीश पाटील यांनी रंगत वाढवली. शाहिर काशिराम चिंचय यांना मरणोत्तर ‘आगरी-कोळी रत्न’, साहित्यिक म.वा. म्हात्रे यांना ‘साहित्यरत्न’, तर गायक संतोष चौधरी आणि जगदीश पाटील यांना ‘कलारत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कवी संमेलनात जय म्हात्रे, नितुराज पाटील, अनन्या म्हात्रे यांसारख्या नवकवींनी समाजातील अडचणी, उपेक्षा आणि अन्यायावर उपरोधिक बाण सोडले; तर काही कवितांनी हास्याची लहर उठवली.

कल्याण-ठाणेपासून रायगड-पालघर-नाशिकपर्यंत आगरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार विश्वनाथ भोईर, आमदार राजेश मोरे, माजी मंत्री जगन्नाथ पाटील आदींच्या उपस्थितीने संमेलनाचे महत्त्व अधोरेखित झाले.

कार्यक्रमाच्या समाप्तीला समाजातून एक आवाज दुमदुमला तो म्हणजे“हे साहित्य संमेलन नाही; हा तर खरा आगरी महोत्सव आहे!”