"...तर त्यांना असे भोपळेच मिळणार"; बेस्ट निवडणुकीतील विजयानंतर शशांक राव यांचा ठाकरे बंधूंना सणसणीत टोला!

    20-Aug-2025   
Total Views |

मुंबई : (Shashank Rao On BEST Election) मुंबईतील 'द बेस्ट एम्प्लॉइज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी'च्या निवडणुकीत शशांक राव यांच्या बेस्ट वर्कर्स युनियन पुरस्कृत पॅनलने १४ जागा जिंकत एकहाती यश मिळवले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या 'उत्कर्ष' पॅनलला २१ पैकी एकही जागा मिळवता आली नाही. या निकालानंतर शशांक राव यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी ठाकरे गटावर टीका केली. तसेच "कोणी कितीही एकत्र आले आणि त्यांनी कामगारांचे हित पाहिले नाही तर भोपळाच मिळणार ना", असा टोला शशांक राव यांनी लगावला.

शशांक राव काय म्हणाले?

बेस्टमध्ये जो खासगीकरणाचा डाव आहे, तो या निकालाने उधळला गेल्याचे शशांक राव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले, "सध्या बेस्टची जी वाईट स्थिती आहे, त्याला ठाकरे गट आणि त्यांची बेस्ट कामगार सेना ही जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. उद्धव सेना ही गेल्या अनेक वर्षांपासून या समितीत आहे. पण स्वतःच्या फायद्यासाठी त्यांनी बेस्टचे नुकसान केले. ९ वर्षांनी ही निवडणूक झाली. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही कामगारांच्या कल्याणासाठी न्यायासाठी लढा देत आहोत. त्याला आलेले हे यश आहे, असे राव म्हणाले.

...तर त्यांना असे भोपळेच मिळणार ना

"या निवडणुकीत दोन भाऊ एकत्र येणे हा काही मुद्दा नव्हता. कामगारांसाठी जो लढा देईल. त्यांच्या हक्कासाठी जो लढेल, मग तो एकटा असला तरी त्याला निवडून दिले जाते, हे या निकालाने दाखवून दिलेले आहे. गेल्या ३ वर्षांपासून कामगारांना ग्रॅज्युएटीची रक्कम मिळाली नाही. त्याविरोधात आम्ही मोर्चा काढला होता. त्याची ही पोचपावती आहे. कोणी कितीही एकत्र आले आणि त्यांनी कामगारांसाठी जर काम केले नाही तर त्यांना असे भोपळेच मिळणार ना" असा टोला शशांक राव यांनी लगावला.




अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\