दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला! हल्लेखोर ताब्यात; रेखा गुप्ता यांच्या जनता दरबारात नेमकं काय घडलं?

    20-Aug-2025   
Total Views |

नवी दिल्ली : (CM Rekha Gupta Attacked) राजधानी दिल्लीतून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला करण्यात आला. त्यांच्या सरकारी निवासस्थानी कॅम्प ऑफिसमध्ये जनता दरबार सुरू असताना ही घटना घडली, त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली असून चौकशी सुरु आहे. मात्र, अद्याप कोणतेही कारण समोर आलेले नाही.

नेमकं काय घडलं?

बुधवारी सकाळी मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवासस्थानी जनता दरबार सुरू असताना ही घटना घडली. यावेळी एक व्यक्ती आली. ही व्यक्ती त्याच्या हातातील कागदपत्र दाखवत रेखा गुप्ता यांच्या जवळ गेला. जेव्हा रेखा गुप्ता यांनी त्या व्यक्तीची तक्रार जाणून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा या व्यक्तीने आधी खूप आरडाओरड आणि शिवीगाळ केली. काही वृत्तानुसार, हल्लेखोराने त्यांच्यावर दगड भिरकावला. तर काही माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हा व्यक्तीने अचानक आरडाओरड सुरू केली आणि नंतर तो मुख्यमंत्र्यांवर धावून गेला. त्याने जोरात चापट मारण्याचा प्रयत्न केला. त्याने शिवीगाळ केली. त्यामुळे एकच धावपळ उडाली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. त्याने हा प्रकार का केला, याविषयीची चौकशी सुरू आहे.


मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्याशी गंभीर धक्काबुक्की देखील झाल्याची माहिती समोर आली आहे. ही त्यांच्या सुरक्षा व्यवस्थेतील घोडचूक असल्याचे मानण्यात येत आहे. दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.




अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\