मुंबई : (Mumbai BEST Election Results) मुंबईतील 'दी बेस्ट एम्प्लॉइज को. ऑप. क्रेडिट सोसायटी'ची निवडणूक सोमवारी १८ ऑगस्ट रोजी पार पडली. मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उबाठाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याने प्रतिष्ठेची ठरलेल्या या निवडणुकीचा बहुप्रतिक्षित निकाल अखेर जाहीर झाला आहे. या निकालाने ठाकरे बंधूंना मोठा धक्का बसला आहे. या निवडणुकीत प्रचंड चर्चा असलेल्या ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलला २१ पैकी एकही जागा जिंकण्यात यश आलेले नाही. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूक एकत्र लढण्याच्या विचारात असलेल्या ठाकरे गट आणि मनसे पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
कोणी सत्ता मिळवली?
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत शशांक राव यांच्या पॅनेलने सत्ता मिळवली आहे. २१ पैकी १४ जागांवर राव यांच्या पॅनेलने विजय मिळवला.महायुती प्रणित सहकार समृद्धी पॅनेलने प्रसाद लाड, नितेश राणे आणि किरण पावसकर यांच्या नेतृत्वाखालील ७ जागांवर विजय मिळवला.
यामध्ये भाजपचे ४ , शिवसेनेचे २, तर एससी-एसटी युनियनचा एक उमेदवार विजयी झाला. ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनेलचा निवडणुकीत दारुण पराभव झाला. २१ पैकी सर्वाधिक १९ जागा लढवणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकाही जागेवर खातं उघडता आलं नाही. तर राज ठाकरेंनाही भोपळाही फोडता आला नाही. या पराभवामुळे ठाकरेंच्या शिवसेनेने बेस्ट पतपेढीत असलेली ९ वर्षांची सत्ता गमावली आहे.
या निवडणुकीसाठी १८ ऑगस्ट रोजी मतदान झाले होते. यानंतर मंगळवारी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणे अपेक्षित होते. मात्र, मंगळवारी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे मतमोजणीला सुरुवात होण्यास चार-पाच तासांचा विलंब झाला. त्यामुळे मंगळवारी रात्री उशिरा या निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर झाला. या निकालातून ठाकरे बंधूंची युती सपशेल फेल ठरल्याचे स्पष्ट झाले.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\