मुंबई : राष्ट्र सेविका समितीच्या नागपूर येथील मुख्य कार्यालयात शुक्रवारी सकाळी वंदनीय प्रमिलताई मेढे यांना समितीच्या सेविकांनी श्रद्धांजली वाहिली. या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे देखील उपस्थित होते. प्रमिलताईंना आदरांजली अर्पण करत ते म्हणाले, "प्रमिलताईंचे कार्य आणि जीवन हे येणाऱ्या पिढ्यांसाठी दीपस्तंभासारखे सतत प्रेरणा देणारे राहील."
दत्तात्रेय होसबाळे यांच्यासह यावेळी सह-सरकार्यवाह सीआर मुकुंदजी, अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी देखील उपस्थित होते. होसबाळे पुढे म्हणाले, प्रमिलताईंच्या निधनासोबतच भारतीय संस्कृतीसाठी समर्पित एका उज्ज्वल जीवनयात्रेचा शेवट झाला आहे. प्रमिलताई आता शारीरिक स्वरूपात आपल्यात नाहीत, त्यामुळे निश्चितच एक पोकळी जाणवते. ही रिक्तता केवळ देवी अहिल्या मंदिरापुरती किंवा राष्ट्र सेविका समिति पुरती मर्यादित नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा संपूर्ण विचार परिवार आणि सर्व समाजप्रेमी ही पोकळी अनुभवत आहेत.
सरकार्यवाह पुढे म्हणाले, प्रमिलताईंनी २५ वर्षांहून अधिक काळ प्रमुख कार्यवाहिका म्हणून देशाच्या कानाकोपऱ्यात आणि परदेशातही समितीच्या सेविकांना मार्गदर्शन केले, समाजजागरण केले आणि समाज संघटनेचे कार्य केले. प्रमिलताई नेहमी राष्ट्रासाठी सजग राहून राष्ट्राच्या चिंता करत असत. कोणतीही घटना घडली की त्या त्वरित तिचा सखोल विचार करत. इतिहासाची जाण, वर्तमान परिस्थिती समजून घेणे, भविष्यासाठी चिंता आणि विश्वास – हे सर्व प्रमिलताईंच्या व्यक्तिमत्त्वात केवळ पाहायला मिळाले नाही, तर शिकण्यासारखेही ठरले. स्वतःबद्दल कठोरता, साधेपणाची परिसीमा, आणि इतरांबद्दल प्रेमभाव आणि वात्सल्य – हे वंदनीय प्रमिलताईंच्या व्यक्तिमत्त्वात सर्वांनी अनुभवले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सेविकांसाठी प्रमिलताईंनी दिलेल्या संदेशाचे वाचन समितीच्या अखिल भारतीय कार्यवाहिका चित्राताई जोशी यांनी केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत आणि इतर मान्यवरांनी पाठवलेल्या श्रद्धांजली संदेशांचे वाचन करण्यात आले. तत्पश्चात प्रमिलताईंचे पार्थिव एम्सकडे सुपूर्द करण्यात आले.
प्रत्येक क्षण भारतमातेच्या आणि मानवतेच्या सेवेसाठी समर्पितप्रमिलताईंनी आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण भारतमातेच्या आणि मानवतेच्या सेवेसाठी समर्पित केल्याचे सरकार्यवाहंनी सांगितले. ते म्हणाले, प्रमिलताईंनी आपली जीवनयात्रा संपवली असली, तरीही त्या सेवा वृत्तीचे तेज मागे ठेवून गेल्या. त्या आपल्या सर्वांसाठी जीवन, वाणी आणि वागणुकीतून सदैव प्रेरणादायी दीपस्तंभ राहतील, असे दत्तात्रेय होसबाळे यांनी सांगितले.