केडीएमसीने सीएसआर कक्ष स्थापन करुन प्रतिष्ठितांना विविध प्रकल्पांमध्ये सहभागी होण्यासाठी केले आवाहन

    02-Aug-2025   
Total Views |

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमार्फत खाजगी क्षेत्रातील संस्था, तज्ञ व्यक्ती इ. समवेत चर्चा घडवून योग्य नियोजनाव्दारे दिर्घकाळ टिकणा-या सुविधा, महापालिका प्रशासनावर कोणताही आर्थिक भार न येता निर्माण करण्यासाठी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष सीएसआर कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.‌ यामुळे महापालिकेमार्फत भविष्यात राबविल्या जाणा-या समाज उपयोगी उपक्रमांना चालना मिळणार आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात विविध समाजपयोगी उपक्रम राबविण्याकरिता खाजगी औदयोगिक संस्था, बहुराष्ट्रीय कंपन्या इ. मार्फत कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सी एस आर) अंतर्गत अनेक सुविधा महानगरपालिकेमार्फत सामान्य नागरिकांपर्यंत उपलब्ध होऊ शकतात. या सी एस आर अंतर्गत निधी प्राप्त होऊन अथवा प्रत्यक्ष तज्ञ व्यक्तींच्या सहकार्याच्या माध्यमातून महापालिकेस अनेक सामाजिक उपक्रम राबविणे, कामे करणे सहज सुलभ होऊ शकते.

अतिरिक्त आयुक्त योगेश गोडसे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सी एस आर कक्षाची स्थापना करण्यात आली असून महापालिकेचे लेखा व मुख्य वित्त अधिकारी दिग्विजय चव्हाण, शहर अभियंता अनिता परदेशी, नगररचना विभागाचे सहा.संचालक संतोष डोईफोडे, विशेष प्रकल्प विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे, उपायुक्त प्रसाद बोरकर, कांचन गायकवाड, संजय जाधव हे या सीएसआर कक्षाचे सदस्य असून विदयुत विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत हे या सीएसआर कक्षाचे सदस्य सचिव राहतील.

स्थानिक व्यवसाय, स्वयंसेवी संस्था तसेच इतर सरकारी संस्थाशी संवाद साधणे, संभाव्य सीएसआर निधी देणारे आणि भाग धारकांसह संवाद निर्माण करणे तसेच अपेक्षित परिणामांची रुपरेषा देणारे आकर्षक प्रस्ताव तयार करणे, सीएसआर कार्यक्रम आयोजित करणे, सीएसआर संधींना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यशाळा/ परिषदा आयोजित करणे, सीएसआर माहिती, प्रकल्प व निधीचे उपलब्धतेसाठी समर्पित वेबसाईट तयार करणे आदी कामे या सीएसआर कक्षामार्फत केली जाणार आहेत.