अर्बन नक्षलवाद्यांसारखे वागाल तर तुम्हाला अटक होईल - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीय यांचे राज ठाकरे यांना प्रत्युत्तर

    02-Aug-2025   
Total Views |

नागपूर : अर्बन नक्षलवाद्यांसारखे वागाल तर तुम्हाला अटक होईल. तुम्ही अर्बन नक्षलांसारखे वागत नाहीत, त्यामुळे तुम्हाला अटक करण्याचे कारण नाही, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिले. शनिवारी त्यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला.

राज ठाकरेंनी शेकापच्या मेळाव्यातून जनसुरक्षा विधेयकावर टीका केली होती. आम्हाला अटक करून दाखवाच, असे ते म्हणाले होते. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "अर्बन नक्षलवाद्यांसारखे वागाल तर तुम्हाला अटक होईल. तुम्ही अर्बन नक्षलांसारखे वागत नाहीत, त्यामुळे तुम्हाला अटक करण्याचे कारण नाही. कायद्याच्या विरोधात वागणाऱ्या लोकांसाठी तो कायदा आहे. आंदोलकांविरुद्ध हा कायदा नाही. सरकारविरुद्ध बोलण्याची पूर्ण मूभा असून त्यांच्याविरुद्ध हा कायदा नाही. त्यामुळे कायदा न वाचता असे वक्तव्य केले आहे," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात हिंदी कशी आणता येईल, याचा विचार करतात, अशीही टीका राज ठाकरे यांनी केली होती. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री की, "महाराष्ट्रात मराठी अनिवार्य असली पाहिजे. आपण ती अनिवार्य केलीच आहे. पण महाराष्ट्रातील मराठी मुलांना मराठीसोबत अजून एक भारतीय भाषा शिकायला मिळाली तर त्यात काय वावगे आहे? आपण भारतीय भाषांना विरोध करायचा आणि इंग्रजीकरिता पायघड्या घालायच्या या मानसिकतेला माझा विरोध आहे."

पुण्याच्या उद्योगक्षेत्रातील दादागिरी मोडून काढणार

"सर्वपक्षीय नेत्यांना एकमत करावे लागेल. पुण्याच्या उद्योगांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात राजकीय दादागिरी पाहायला मिळते. विविध पक्षांचे नाव घेऊन ते दादागिरी करतात. ही दादागिरी मी मोडून काढणारच आहे. यामध्ये मदत करणाऱ्यांचेही स्वागत आहे," असेही ते यावेळी म्हणाले.

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....