
मुंबई : (Veteran Actor Achyut Potdar Passes Away) मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९१व्या वर्षी सोमवारी रात्री १० वाजून १० मिनिटांनी ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये त्यांची प्राणज्योत मालवली. मंगळवारी १९ ऑगस्ट रोजी ठाण्यात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.
अच्युत पोतदार यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीसह मराठी रंगभूमी, मालिकाविश्व आणि हिंदी सिनसृष्टीवरही शोककळा पसरली आहे. चित्रपट, मालिका, जाहिरात, नाटक अशा विविध माध्यमांमधून अच्युत पोतदार यानी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. फक्त मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले.
सैन्यात कॅप्टन पदावरून निवृत्ती घेतलेल्या अच्युत पोतदारयांनी शिक्षण, भारतीय सैन्य दलात सेवा, इंडियन ऑइल कंपनीतील नोकरी आणि अभिनय या सर्व क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले आहे. आमिर खानच्या 'थ्री इडियट्स' चित्रपटामधील त्यांची प्राध्यापकाची भूमिका लोकांच्या चांगलीच लक्षात राहिली.
१२५ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं
अच्युत पोतदार यांनी हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत १२५ हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 'आक्रोश', 'अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है', 'अर्ध सत्य', 'तेजाब', 'परिंदा', 'राजू बन गया जेंटलमन', 'दिलवाले', 'रंगीला', 'वास्तव', 'हम साथ रहना', '३ इडियट्स, 'अंगार, 'दहेक', 'फर्ज’, 'भाई', 'दबंग 2' आणि 'व्हेंटिलेटर' अशा अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी साकारलेल्या विविधांगी भूमिका आणि त्यांच्या अभिनयाचे कौतुक झाले.
मालिकाविश्वातही अमिट छाप पाडली
याव्यतिरिक्त, अच्युत पोतदार यांनी छोट्या पडद्यावरही आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांनी 'वागले की दुनिया', 'माझा होशील ना', 'मिसेस तेंडुलकर' आणि 'भारत की खोज' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केले. अच्युत पोतदार यांनी भारतीय चित्रपटसृष्टीत खूप मोठे योगदान दिलं. त्यांचे हे योगदान भावी पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी राहील.