मिठी नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता; नदीलगतच्या कुटुंबाना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम सुरु

    19-Aug-2025   
Total Views |


मुंबई : (Mithi River flood Alert) मुंबईत गेल्या तीन दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. अतिमुसळधार पावसामुळे कुर्ला पुलावरील क्रांती नगर येथे मिठी नदी धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफची टीम घटनास्थळी तैनात करण्यात आली आहे. नदीलगतच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सलग पाऊस असाच सुरू राहिल्यास मिठी नदी धोक्याची पातळी ओलांडू शकते. त्यामुळे परिसरात पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.



मागील दोन दिवसांपासून मुंबईत अतिमुसळधार पाऊस सुरू असून पवईतील विहार तलाव तुंडूब भरून वाहत आहे. विहार तलाव वाहू लागल्याने मिठी नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. मिठी नदीची धोकादायक पातळी ३.४० मीटर आहे. मंगळवारी ही पातळी ३.२ मीटरवर पोहोचल्याची माहिती पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी दिली. त्यामुळे मिठी नदीलगत नदीलगत वास्तव्याला असलेल्या १४० कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या कामास मुंबई महानगरपालिकेने सुरुवात केल्याचेही गगराणी यांनी सांगितले.

क्रांतीनगर आणि संदेश नगरमधील १४० कुटुंबांना नजीकच्या मगनलाल नथूराम शाळेत स्थलांतरित करण्यात येत असल्याची माहिती पालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली, तर त्यांची खाण्या-पिण्याची योग्य ती व्यवस्था करण्यात आल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, मिठी नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता असल्याने वांद्रे-कुर्ला संकुल आणि वांद्रे परिसरात पूरस्थिती निर्माण होण्याची चिन्हे आहे.

 




अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\