उपराष्ट्रपतीपदासाठी ‘इंडी’आघाडीकडून माजी न्यायमूर्ती बी. सुदर्शन रेड्डी यांची उमेदवारी जाहीर! काँग्रेस अध्यक्षांकडून नावाची घोषणा

    19-Aug-2025   
Total Views |

 


नवी दिल्ली : (B Sudarshan Reddy Named INDI Alliance Vice President Candidate) उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांच्या इंडी आघाडीकडून उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी उपरराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराचे नाव जाहीर केले. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी इंडिया आघाडीचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार असतील. दरम्यान, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीएचे सीपी राधाकृष्णन विरुद्ध इंडी आघाडीचे बी सुदर्शन रेड्डी असा थेट सामना रंगणार आहे.

इंडी आघाडीने पत्रकार परिषद घेऊन सुदर्शन रेड्डी यांचे नाव उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले. सर्व पक्षांच्या सहमतीने उपराष्ट्रपतीपदासाठी उमेदवाराचे नाव निश्चित झाले आहे, असं काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांनी सांगितले.आम आदमी पक्षाचीही सुदर्शन रेड्डी यांच्या नावाला सहमती आहे, असं टीएमसी खासदार डेरेक ओ’ब्रायन यांनी सांगितले.

कोण आहेत बी. सुदर्शन रेड्डी?

बी. सुदर्शन रेड्डी यांचा जन्म जुलै १९४६ रोजी आंध्र प्रदेशच्या रंगा रेड्डी जिल्ह्यात अकुला मायलारम गावात एका शेतकरी कुटुंबात झाला.ते भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत. गोव्याचे ते पहिले लोकायुक्त होते. सुरुवातीच्या शिक्षणानंतर त्यांनी हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठामधून १९७१ साली लॉ ची पदवी घेतली. १९९५ मध्ये त्यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. २००७ मध्ये त्यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली.

 



अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\