आजच्या ‘जागतिक छायाचित्रण दिना’निमित्ताने तीन दशकांहून अधिक काळ फोटोजर्नालिझमच्या क्षेत्रात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या रजनीश काकडे यांचा जीवनप्रवास...आजमितीला मोबाईल आणि त्यातील कॅमेरामधल्या प्रगत तंत्रज्ञानामुळे फोटोग्राफी या तंत्राचे लोकशाहीकरण झाले आहे. परंतु, हेच उजळलेले चित्र खरोखरोच अभिरुचीच्या आणि सौंदर्याच्या कसोटीवर उतरेल, याची शाश्वती देता येत नाही. होय, परंतु जर त्या फोटोला एखाद्या प्रशिक्षित आणि अनुभवी छायाचित्रकाराच्या हातांचा स्पर्श झाला, तर दृश्यकलेतील वेगळा आविष्कार आपल्याला अनुभवायला मिळेल. त्यातसुद्धा ‘फोटो जर्नलिझम’च्या माध्यमातून समाजाचे चित्र आपल्या कॅमेरात कैद करायचा निर्धार केला, तर आपल्या हाती लागते, ती एक अभिजात कलाकृती! याच अभिजात कलाकृतीची निर्मिती आपल्या कामाच्या माध्यमातून करणारे फोटोजर्नलिस्ट रजनीश काकडे.
मुंबईच्या साने गुरुजी विद्यालयात शिक्षणाचे धडे गिरवणार्या रजनीश काकडे यांच्या मनावर लहानपणीच ‘खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे’ हा संस्कार बिंबवला गेला. शाळेमध्ये असल्यापासूनच जगाकडे बघण्याचा एक संवेदनशील दृष्टिकोन वयापरत्वे घडत गेला. फोटोग्राफीचा वारसा आणि वसा त्यांच्या घरातूनच त्यांना लाभला. त्यामुळे लहानपणापासून कळत-नकळत आपल्या भविष्यातील जीवनाचे बीज रुजले जात होते. वयाच्या दहाव्यावर्षी त्यांनी पहिल्यांदा फोटोप्रिंटचे तंत्र हाताळले. वयाच्या १४व्या वर्षी त्यांनी हातात कॅमेरा धरला आणि तो त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला. तारुण्यात आपल्याला जी गोष्ट सर्वाधित आवडते, रुचते, तिचे रूपांतर आपल्या चरितार्थमध्ये करणे, हे सर्वांनाच शय होते असे नाही. कारण, त्या जीवनाच्या प्रवासात येणार्या सगळ्या खाच-खळग्यांची जबाबदारी स्वीकारत आपल्याला पुढे जायचे असते. रजनीश काकडे यांनी फोटोग्राफीचे तंत्र आणि मंत्र आत्मसात केले आणि ‘फोटो जर्नलिझम’ हा त्यांचा जीवनाचा ध्यास बनला. पुढे मुंबईच्या डी. जी. रुपारेल महाविद्यालयातून त्यांनी आपला पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला. ‘राज्यशास्त्र’ हा केवळ त्यांच्या अभ्यासाचा विषय नव्हता, तर त्यांच्या विचारविश्वाची जडणघडणसुद्धा यामुळे झाली.
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी ज्यावेळी मुंबई दौर्यावर आले होते, त्यावेळेस त्यांचा दौरा आपल्या कॅमेराच्या माध्यमातून टिपण्याची संधी रजनीश काकडे यांना मिळाली. तारुण्यातच इतया मोठ्या संधीचे सोने करणार्या या अवलिया फोटोग्राफरने लवकरच नवीन क्षितिज आणि नवीन आव्हाने स्वीकारण्याचा निर्णय घेतला आणि थोड्याच कालावधीमध्ये वेगवेगळे प्रदेश आपल्या पायाखाली घातले. आपल्या कामाच्या माध्यमातून आपण आपलं आयुष्य घडवत असतो. परंतु, माणसाच्या हाती नसलेलेसुद्धा अनेक घटक, त्या माणसाच्या जीवनावर वेळोवेळी प्रभाव टाकत असतात. अशातच वडिलांच्या आजारपणामुळे आपल्या कामाची व्यावसायिक गणितं त्यांना बदलावी लागली. परंतु, या काळातसुद्धा त्यांच्यातला फोटोग्राफर शांत बसला नाही. पत्रकार हा केवळ लोकांना बातम्या देत नाही, तर तो समाज घडवणारा एक महत्त्वाचा घटक आहे, अशी रजनीश काकडे यांची पक्की धारणा आणि याच कारणासाठी त्यांनी ‘फोटो जर्नालिझम’ची कास धरली.
१९९० सालच्या दशकानंतर समाजमाध्यमांमध्ये अनेक संधी उपलब्ध झाल्या. मात्र, रजनीश यांनी आपल्या कलेला विराम दिला नाही. चित्रांच्या माध्यमातून समाजातील लोकांच्या भावभावना टिपण्याचे कार्य त्यांनी सुरूच ठेवले. ‘बॉम्बे आय’, ‘कालनिर्णय’ वर्तमान आदी संस्थांसाठी त्यांनी फोटोग्राफीचे काम केले. पुढे जाऊन एका वृत्तपत्रासाठी पुढचा दशकभर त्यांनी काम केले. दैनिकासाठी काम करताना, आपल्या चित्रांच्या माध्यमातून त्यांनी सत्याचा शोध सुरू केला. रुढार्थाने आज ज्या गोष्टीला आपण ‘फॅट चेक’ म्हणतो, तशा आशयाचा चित्रशोध त्यांनी त्याकाळी सुरू केला.
पुढे २००२ साली गुजरातच्या भूज येथे प्रलयकारी भूकंप झाला. तिथेल हृदयद्रावक फोटो टिपण्यासाठी गेले असता, अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये त्यांनी भूकंपग्रस्त माणसांचे भावविश्व आपल्या कॅमेर्यात कैद केले. पुढे जाऊन त्यांनी काढलेल्या फोटोला ‘मुंबई प्रेस क्लब’चा ‘पिचर ऑफ द इयर’ हा पुरस्कारदेखील मिळाला. जगाच्या पाठीवर अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जाणारा ‘एशियन मीडिया अॅवॉर्ड्स’चा पुरस्कार त्यांना २००७ साली मिळाला. एकार्थी ‘लोकल ते ग्लोबल’ असा प्रवास त्यांनी आपल्या चित्रांच्या माध्यमातून अनुभवला. आजसुद्धा रजनीश काकडे ‘असोसिएटेड प्रेस’ या जागतिक वृत्तसंस्थेसाठी मुख्य छायाचित्रकार म्हणून कार्यरत आहेत. त्याचबरोबर ‘मुंबई प्रेस लब’चे उपाध्यक्षपदसुद्धा ते भूषवत आहेत. फोटोग्राफी म्हणजे केवळ कॅमेर्याच्या माध्यमातून चित्र काढणे नव्हे, तर माणसांच्या भावना टिपणे, त्यांच्या जीवनाशी समरस होणे, इतका व्यापक विचार ते आपल्या कामाच्या माध्यमातून मांडत असतात. अशा या अवलिया कलाकाराला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!