ठाण्यात शालेय ९-साईड हॉकी लीगला सुरुवात ; ७६ संघांचा उत्साही सहभाग

    18-Aug-2025
Total Views |

ठाणे : हॉकी ठाणे असोसिएशनतर्फे शालेय ९-साईड हॉकी लीगचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. २९ शाळांमधील एकूण ७६ संघांनी या लीगमध्ये सहभाग नोंदवला आहे.

ही स्पर्धा १२ जुलै पासून सुरू झाली असून सलग आठ आठवडे शनिवार व रविवार या सुट्टीच्या दिवशी सामने खेळवले जात आहेत. अंडर-१२, अंडर-१४ आणि अंडर-१६ या वयोगटातील मुला-मुलींसाठी अशी सहा गटांमध्ये स्पर्धा विभागली आहे. लीग पद्धतीमुळे प्रत्येक संघाला अनेक सामने खेळण्याची संधी मिळत असून एकूण १५० हून अधिक सामने होणार आहेत.

स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी न्यू बॉम्बे सिटी स्कूल, घणसोली यांनी आपले कृत्रिम टर्फचे मैदान व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच पी-क्यूब फाउंडेशन या सह-आयोजक संस्थेनेही महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

या उपक्रमाविषयी बोलताना हॉकी ठाणे असोसिएशनचे अध्यक्ष आयपीएस श्री कृष्ण प्रकाश यांनी सांगितले की, “शालेय ९-साईड हॉकी लीग ही महाराष्ट्रातील गवतपातळीवरील खेळाडूंना घडवण्यासाठी आणि लपलेल्या क्षमतेला संधी देण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे.”

या संदर्भातील माहिती हॉकी ठाणे असोसिएशनचे सचिव गुरमीत सिंग राव यांनी दिली असून अधिक माहितीसाठी ९७०२२ ३२२३३ या क्रमांकावर संपर्क साधावा.