मुंबईत पावसाचा हाहाकार! सर्व शाळांना सुट्टी जाहीर; वाहतूकसेवा विस्कळीत
18-Aug-2025
Total Views |
मुंबई : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागांत पाणी साचले आहे. दरम्यान, आता मुंबई महापालिकेकडून सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
भारतीय हवामान खात्याने मुंबई महानगरासाठी दिनांक १८ आणि १९ ऑगस्ट असे दोन दिवस रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर, सकाळपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मुंबईतील दुसऱ्या सत्रातील अर्थात दुपारी १२ वाजेनंतर भरणाऱ्या सर्व शाळा, महाविद्यालयांना सोमवारी सुटी जाहीर केली आहे.
तसेच आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे सखल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे. वरळी, वडाळा, दादर, कुर्ला, सायन, परळ, अंधेरी या भागात पाणी साचले आहे. नागरिकांना पाण्यातून वाट काढावी लागत असून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचेही पाहायला मिळाले.
तसेच या पावसाचा लोकल सेवेलाही मोठा फटका बसला आहे. पुढील ३ ते ४ तासांत मुंबई शहर, मुंबई उपनगर आणि रायगड या ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.