वारसा म्हटलं की, पैसा-अडका, व्यवसाय, राजकीय नेतृत्व अशा अनेक गोष्टी आपल्या नजरेसमोर आल्या असतील. पहिली पिढी दुसर्या पिढीकडे संस्काराच्या माध्यमातून हा वारसा सुपूर्द करते. परंतु, एखाद्याला वारश्यामध्ये भळभळणाऱ्या जखमांचे आणि वेदनेचे कढ मिळाले तर? मूळ समस्येचा अनुभवही नसताना, एक जबाबदारी म्हणून ती वेदना पुढच्या पिढीपर्यंत ती पोहोचवणे हेच काम असेल तर? जपानमध्ये सध्या याच स्थित्यंतराचे पर्व सुरू आहे.
८० वर्षांपूर्वी जगाच्या पाठीवर दुसरे विश्वयुद्ध पेटले होते. एका बाजूला हिटलर आणि मुसोलिनीसारखे हुकुमशहा, तर दुसऱ्या बाजूला साम्राज्यवादी इंग्रजांची सत्ता. वैश्विक पटलावर युत्या, आघाड्या झाल्या आणि युद्धामध्ये कोट्यवधी निष्पाप मारले गेले. अशातच अमेरिकेने जगाला हादरवणारा अणुस्फोट घडवला. जपानच्या हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकल्यानंतर, अखेर युद्धाला पूर्णविराम मिळाला. युद्धतंत्राच्या विश्वामध्ये आण्विक शस्त्रांचा प्रवेश झाला आणि जगाचा नूर कायमचाच पालटला. शीतयुद्ध याच युद्धाचे अपत्य ठरले आणि आण्विक शस्त्रांसाठी जगात एक नवी स्पर्धाच सुरू झाली. परंतु, याकाळात जपानमध्ये जी दोन शहरं बेचिराख झाली होती, त्यांचे पुढे काय झाले? अणवस्त्राच्या हल्ल्यामध्ये जी माणसं मृत्युमुखी पडली, त्यांचे जीवन तर संपले परंतु, जी जिवंत राहिली त्यांचे काय? आपल्या सामर्थ्यातून त्यांनी पुन्हा एकदा आपला देश उभा केला. पुढच्या काही दशकांमध्येच जपानने घेतलेली गरुडभरारी, जगाच्या गौरवास पात्र ठरली. मात्र, त्या एका संपूर्ण पिढीच्या काळजात, अणवस्त्र हल्ल्याच्या ज्या स्मृती आजही आहेत, त्यांचे काय?
जपानमध्ये आजसुद्धा अणवस्त्र हल्ला ज्यांनी प्रत्यक्षात अनुभवला, अशी लोकं जिवंत आहेत. मात्र, मागच्या काही वर्षांमध्ये अशा लोकांची संख्या वर्षागणिक कमी होत आहे. १९४५ सालचा अणवस्त्र हल्ला सहन करून जी माणसं जिवंत राहिली, त्यांना ‘हिबाकुशा’ म्हणतात. हिबकुशांच्या जीवनाचा सूर्यास्त होत असताना, त्यांनी भोगलेल्या वेदना, त्यांच्या आयुष्याला झालेल्या जखमा या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी निहोन हिदांयो आणि त्यांची संघटना काम करते. २०२४ साली त्यांच्या याच कार्यासाठी त्यांना ‘नोबेल’ पारितोषिक देण्यात आले होते. ज्यांच्या जीवनावर अणवस्त्रांचा परिणाम झाला, अशा लोकांच्या स्मृती एकत्रित करून अण्वस्त्रे कधीही वापरली जाऊ नयेत, हा प्रचार ते करत आहेत.
२०१२ मध्येच जपानला या धोयाची कल्पना आली होती. तेव्हापासूनच ‘ए-बॉम्ब लेगसी ससेसर प्रोग्रेम’ची सुरुवात झाली. या कार्यक्रमांतर्गत जपानवरील अणवस्त्र हल्ल्यातून बचवलेली माणसे, पुढच्या पिढीतील स्वयंसेवकांना आपले अनुभव सांगत असतात. या स्वयंसेवकांचे कार्य एकच, अत्यंत पारदर्शकपणे हा अनुभव स्वीकारणे आणि तो जतन करणे. यासाठी स्वयंसेवकांना दोन वर्षांचे प्रशिक्षण घ्यावे लागते. यामध्ये त्यांना आण्विक हल्ल्याचे वास्तव समजून घ्यावे लागते. त्याचबरोबर इतरांपर्यंत ते पोहोचवण्यासाठी लागणारे संवाद कौशल्यही आत्मसात करावे लागते. हल्ल्याच्या साक्षीदाराबरोबर काम करत, स्वयंसेवकाने आपली अनुभूती मांडणे आवश्यक असते. एकदा त्याचा हा अभ्यासक्रम आणि परीक्षा पूर्ण झाली की, ‘हिरोशिमा पीस कल्चरल फाऊंडेशन’च्या माध्यमातून ते व्याख्याने देण्यास पात्र ठरतात. जपानमधील वेगवेगळ्या शाळा, वस्तुसंग्रहालये, सांस्कृतिक व्यासपीठांवर हे स्वयंसेवक साक्षीदारांची संघर्षगाथा ऐकवतात.
या पार्श्वभूमीवर काहींच्या मते जी माणसं अनुभूती जगलेली नाहीत, ती खरोखरच त्या वेदना मांडण्यास पात्र ठरतात का? मूळात अशा पद्धतीचे अनुभवकथन पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे योग्य आहे का, असा प्रश्नही विचारला जातो. याबाबतीत वेगवेगळे मतप्रवाह असले, तरी जागतिक स्तरावर अशा अनुभवकथनांचे स्वागत होत आहे. ‘हिबाकुशा’ या गटापाशी लोकं आपली संवेदनशीलता व्यक्त करतात. इतिहास आकलनाच्या बाबतीत, जपानमधील या चळवळीच्या वेगळेपणाची प्रचिती आपल्याला हिबाकुशाच्या माध्यमातून येते. इतिहास म्हणजे केवळ तारखा आणि लढाया इथपर्यंतच मर्यादित नसून, स्मृतींच्या पानांवर चिरकाल जिवंत राहणारी ती एक सजीवशक्ती आहे, याची यानिमित्ताने समाजाला जाणीव होईल ही आशा.