अतिवृष्टीमध्ये नवी मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात ; नवी मुंबई महापालिकेची यंत्रणा सतर्क
17-Aug-2025
Total Views |
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात १६ ऑगस्ट मध्यरात्रीपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून १५ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० ते १६ ऑगस्ट सकाळी ८.३० पर्यंत सरासरी १३४.६८ मिमी. आणि १६ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० ते १७ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० पर्यंत सरासरी १०५.७० मिमी. पावसाची नोंद झालेली आहे. तसेच आज १७ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० ते दुपारी ४.३० पर्यंत ४३.२० मिमी पावसाची नोंद झालेली आहे.
१६ तारखेपासून पुढील ५ दिवस भारतीय हवामान खात्याकडून ठाणे जिल्ह्याकरिता ऑरेंज अलर्टच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी संपूर्ण महापालिका यंत्रणेस दक्ष राहण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार सर्व विभागांचे संपर्क अधिकारी, दोन्ही परिमंडळांचे उपायुक्त तसेच आठही विभागांचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी व कार्यकारी अभियंता आणि विभागातील आपत्कालीन कक्षातील कर्मचारी तसेच स्वच्छता निरीक्षक आपापल्या कार्यक्षेत्रात मदत कार्यासाठी सज्ज झाले. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी होऊनही महानगरपालिकेची मदत यंत्रणा सर्व क्षेत्रात दक्षतेने तैनात असल्याने शेजारच्या शहरांच्या तुलनेत नवी मुंबईतील परिस्थिती नियंत्रणात राहिली व कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.
यामध्ये अतिवृष्टी आणि भरती एकाच वेळी असताना नवी मुंबई हे समुद्रसपाटीपासून खाली वसलेले शहर असल्याने पाणी साचणाऱ्या संभाव्य ठिकाणांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले होते. त्या ठिकाणी विभागातील कार्यकारी अभियंत्यांमार्फत पाणी उपसा पंपांची वाढ करण्यात आली. त्याचप्रमाणे रस्ते आणि पदपथ यांच्यामधील पाणी वाहून जाणाऱ्या वॉटर एन्ट्रीज काही अडथळ्यांमुळे बंद झाल्या असतील तर त्या साफ करून पाण्याला वाट करून देण्याचे कामही सातत्याने करण्यात आले व येत आहे.
पावसाची संततधार स्थिती लक्षात घेऊन नमुंमपा आयुक्त सर्व संबंधितांच्या नियमित संपर्कात होते. अतिरिक्त आयुक्त सुनील पवार व शहर अभियंता शिरीष आरदवाड यांनी शहरातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली व आवश्यक त्या ठिकाणी मदत कार्याचे निर्देश दिले. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्तांसह विभागप्रमुख व सर्व विभाग अधिकारी तथा सहा.आयुक्त हे अधिनस्त कर्मचाऱ्यांसह मदतकार्यासाठी सज्ज होते. आपत्कालीन नियंत्रण कक्षामार्फत आयुक्तांमार्फत वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना सर्वांपर्यंत पोहोचविण्यात येत होत्या. स्वच्छता कर्मचारी पावसात स्वच्छतेची कामे करीत होते. घंटागाड्यांमार्फत कचराही वेळेत उचलण्यात आला. त्यामुळे शहरातील स्वच्छता नेहमीसारखी राहिली. आरोग्य यंत्रणाही नागरी आरोग्य केंद्रापासून रूग्णालयापर्यंत सर्वच स्तरांवर दक्षतेने कार्यान्वित होती. ज्या ठिकाणी वाहत्या पाण्याला अडथळा निर्माण झाल्याची माहिती मिळाली त्या ठिकाणचे अडथळे दूर करून पावसाळी पाण्याच्या प्रवाहाला वाट मोकळी करून देण्यात आली.
महानगरपालिकेच्या मध्यवर्ती नियंत्रण कक्षास तसेच विभाग कार्यालयातील नियंत्रण कक्षास प्राप्त झालेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी झाडे अथवा झाडांच्या फांद्या पडल्या आहेत अशा ७ ठिकाणी अग्निशमन दल तसेच आपत्कालीन मदत पथकाने जाऊन रहदारीला होत असलेला अडथळा दूर केला.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने जोरदार पर्जन्यवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी महत्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन आयुक्तांच्या वतीने करण्यात आले आहे. महानगरपालिकेच्या सर्व यंत्रणाही सर्वच आठही विभागात दक्षतेने कार्यरत आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण यंत्रणा पावसाळी कालावधीतील मदत कार्यासाठी सज्ज आहे याची नागरिकांनी नोंद घ्यावी असे आयुक्तांमार्फत आश्वासित करण्यात आले आहे. नागरिकांच्या माहितीसाठी महानगरपालिकेच्या अधिकृत समाजमाध्यमातून अतिवृष्टी व इतर महत्वाचे संदेश वेळोवेळी जारी करण्यात येत असतात. तरी नागरिकांनी अशा संदेशांमधील सूचनांचे पालन करावे व या पावसाळी कालावधीत पावसाची स्थिती लक्षात घेऊन घराबाहेर पडावे आणि अडचण जाणवल्यास नजिकच्या विभाग कार्यालयातील आपत्कालीन कक्षाशी अथवा महानगरपालिका मुख्यालयातील मध्यवर्ती आपत्ती व्यवस्थापन केंद्राशी २७५६७०६०/२७५६७०६१ या क्रमांकावर अथवा १८००२२२३०९ /१० या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.