आता आपल्याला ‘आत्मनिर्भरतेची दहीहंडी’ उभारायचीय; शिवराज प्रतिष्ठानच्या दहीहंडीत मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन
17-Aug-2025
Total Views |
मुंबई : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ हा नारा दिलाय. आता आपल्याला ‘आत्मनिर्भरतेची दहीहंडी’ उभारायची आहे आणि विकासाचे मनोरे रचून सामान्य माणसापर्यंत हंडीतील प्रसाद पोचवायचा आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आ. प्रविण दरेकर आयोजक असलेल्या शिवराज प्रतिष्ठानच्या दहीहंडीवेळी केले.
दहिसर पूर्व येथे भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर आयोजक असलेल्या शिवराज प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी दहीहंडीचे आयोजन केले जाते. उंचउंच मनोरे रचून गोविंदा पथके येथे सलामी देतात. यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बोरिवलीतील सुमित घाग गोविंदा पथकाला सलामी देण्याचा मान मिळाला.
यावेळी गोविंदा पथकांना संबोधित करताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारत माता कि जय, छत्रपती शिवाजी महाराज कि जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कि जय, जय भवानी जय शिवाजी, जय श्रीराम असा जयघोष केला. ते म्हणाले कि, मी दरवर्षी येथे येतो. प्रत्येक वर्षी मला आधीपेक्षा जास्त उत्साह पहायला मिळतो. सकाळपासून पाऊस सुरु आहे. अनेकांना वाटत होते पावसामध्ये दहीहंडीचा उत्सव कसा होईल. पण पावसापेक्षा जास्त गोविंदांचा उत्साह आहे. त्यांच्या उत्साहाला पाऊस काहीच करू शकत नाही हे पहायला मिळाले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘आत्मनिर्भर भारत’ हा नारा दिलाय. आता आपल्याला ‘आत्मनिर्भरतेची दहीहंडी’ उभारायची आहे आणि विकासाचे मनोरे रचून सामान्य माणसापर्यंत हंडीतील प्रसाद पोचवायचा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले कि, आपल्या भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानात घुसून पाकिस्तानची पापाची हंडी फोडली आहे. आता नवीन भारताच्या निर्मितीकडे जायचे आहे. त्यात सर्व गोविंदांचा महत्वाचा सहभाग असणार असल्याचे सांगत सर्वांना दहीहंडीच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी विधानपरिषद आमदार निरंजन डावखरे, मुंबई भाजपा उपाध्यक्ष प्रकाश दरेकर, डॉ. यश प्रविण दरेकर, मंडल अध्यक्ष अमित उतेकर, मोतीभाई देसाई, आदित्य दरेकर, कृष्णा दरेकर, गणेश खणकर, संजय घाडी, आरपीआयचे रमेश गायकवाड यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
लाडक्या बहिणींनी बांधली राखी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गोविंदांसह 'दहीहंडी उत्सवा'मध्ये सहभागी झाले असता लाडक्या बहिणींनी त्यांना राखी बांधली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रेम आणि जिव्हाळ्यासाठी सर्व लाडक्या बहिणींचे आभार मानले.