मुंबई: बेस्ट कामगार हे मुंबईचे वैभव होते. नारायण राणे, विठ्ठल चव्हाण असतील पक्षासाठी बेस्ट कामगारांनी काय मेहनत घेतली ती मला माहित आहे. शिवसेनेला मोठे करण्यात बेस्ट कामगारांचा खारीचा वाटा आहे. ज्या नेत्यांनी आपल्याला घडवले, वाढवले त्या नेत्यांकडे लक्ष नाही तर गरीब बेस्ट कामगारांकडे यांचे काय लक्ष राहणार. यांचे लक्ष मोठ्यांकडे आहे. मोठा असूनही छोट्यांसाठी काम करणारा प्रसाद लाड आपला नेता आहे. दोन दिवस मेहनत घ्या. पाच वर्ष प्रसाद लाड यांच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणण्याचा प्रयत्न करू, असा शब्द भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी शुक्रवारी पार पडलेल्या दि बेस्ट एम्प्लॉईज को. ऑप. क्रेडिट सोसायटीच्या जाहीर मेळाव्यात दिला. तसेच कप बशीला मतदान करून समृद्धी पॅनेलच्या २१ च्या २१ जागा निवडून आणण्याचे आवाहनही त्यांनी कामगारांना केले.
या मेळाव्याला समृद्धी पॅनलचे सर्वेसर्वा आमदार प्रसाद लाड, मुंबई बँकेचे संचालक नंदकुमार काटकर, महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष रामदास मोरे, समर्थ बेस्ट कामगार संघटना, बेस्ट राष्ट्रीय कर्मचारी सेना, दि इलेक्ट्रिक युनियन, एससी-एसटी वेल्फेअर असोसिएशन आणि बहुजन एम्प्लॉईज युनियनचे पदाधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कामगारांना संबोधित करताना आ. दरेकर म्हणाले कि, देश स्वतंत्र १५ ऑगस्टला झाला आणि बेस्ट कामगार हा १८ ऑगस्टला स्वतंत्र होणार आहे. परिवर्तन करण्याचे काम व कामगारांच्या आयुष्यात समृद्धी आणण्याचे काम हे कामगार १८ तारखेला करणार आहेत. ही निवडणूक बेस्ट कामगारांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. २५ वर्ष या पतपेढीचे नेतृत्व बेस्ट कामगार सेनेने केले. त्यांनी या पतपेढीच्या माध्यमातून चांगल्या दोन योजना आणल्याचे सांगितले तर आम्ही ही निवडणूकच लढणार नसल्याचे दरेकर म्हणाले.
मनसेचे संदीप देशपांडे यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेत दरेकर म्हणाले कि, तुम्ही कुणाचे बाप, आई काढताहेत. अहो देशपांडे एखादी छोटी संस्था तरी काढा व ती चालवून दाखवा. परंतु ते तोंड चालवू शकतात. तुमचा २५ वर्षाचा इतिहास आणि प्रसाद लाड यांचा २५ महिन्यांचा इतिहास नसेल त्यांनी बोलले तसे केले. प्रमोशनसह इतर सर्व विषय लाड यांनी मार्गी लावले. त्यांनी दुकानदारी केली नाही. सर्वसामान्य कामगारांना न्याय दिला. मी एसटी कामगाराचा मुलगा आहे. मला त्यांची दुःख माहित आहेत. कुठल्या परिस्थितीत ते राहतात याची मला जाणीव आहे. एसटी व बेस्टमध्ये फार फरक नाही. एसटी कामगारांना पगार वेळेवर मिळत नाही तसाच बेस्ट कामगारांनाही पगार वेळेवर मिळत नाही. या कामगारांच्या जीवनात अंधार बेस्ट कामगार सेनेने आणला आहे. कितीही ब्रँड (ठाकरे) घेऊन या परंतु या भावनांची व संवेदनांची बरोबरी कुठलाच ब्रँड करू शकत नाही. तुम्ही सोन्याचे चमचे घेऊन जन्माला आलात परंतु हा काबाडकष्ट करून, घाम गाळून सर्वसामान्याच्या पोटी जन्माला आलेला कामगार असल्याचेही दरेकर म्हणाले.
विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलीय
गिरणी कामगार, माथाडी कामगारांना आम्ही घरांसाठी आर्थिक सहाय्य केले. मुंबईत स्वयंपुनर्विकास योजना आणली. त्या योजनेला देवाभाऊंनी पाठबळ दिले. आज मुंबईत २० इमारती उभ्या राहिल्या आहेत. २५-३० वर्ष तुम्ही मराठी माणसाला मुंबईत ठेवण्यासाठी काय काम केलात याचा हिशोब द्या. यांच्या पायाखालची वाळू घसरलीय. त्यामुळे केवळ पोपटपंची सुरु आहे. बेस्ट कामगारांनी ठरवले आहे बेस्ट एम्प्लॉईज पॅनेलवर प्रसाद लाड यांच्या समृद्धी पॅनेलचाच झेंडा फडकणार, असा विश्वासही दरेकरांनी व्यक्त केला.
बेस्ट कामगारांना कमी व्याज दरात पैसे उपलब्ध करून देऊ
दरेकर म्हणाले कि, बेस्ट कामगारांना हक्काचे घर देण्यासाठी प्रसाद लाड यांचे प्रयत्न सुरु आहेत. तुम्ही काय केलात क्षणभर विश्रांती. तुम्ही कामगारांच्या कष्टाच्या, घामाच्या पैशावर ऐय्याशी मारलात. ही ऐय्याशी संपवून टाकणारी निवडणूक आहे. मुंबई बँक आमची आहे, कर्मचाऱ्यांची आहे. त्यांनी सभासद म्हणून आमच्या ताब्यात दिली आहे. त्यांचा पालक म्हणून सांगतो कामगारांना कमीत कमी व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देऊ. विरोधकांकडे अजेंडा, योजना नाहीत. आमच्याकडे योजना आहेत. या सर्व कामगारांना मेडिक्लेम दिल्याशिवाय राहणार नाही. ही निवडणूक झाल्यावर बेस्ट एम्प्लॉईज पतपेढी व मुंबई बँक यांच्यात एमओयू करू आणि एकत्रितपणे घरासाठी पैसे उपलब्ध करून देऊ.
बेस्ट कर्मचारी कामगार सेनेचा बँड वाजविल्याशिवाय राहणार नाही
दरेकर म्हणाले कि, तेजस्विनी घोसाळकर यांच्या पतीचे निधन झाले म्हणून त्यांची सन्मानाने मुंबई बँकेच्या संचालक पदी निवड केली. यांना भगवे झेंडे फडकवायचे आहेत. विचार गहाण ठेवून काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसले आणि भगव्याच्या गोष्टी करताहेत. खरे म्हणजे मनसेचे आश्चर्य वाटतेय. मनसेचे दोन उमेदवार घेतलेत. राज ठाकरे व मनसेला घेतले नाही तर आपले डिपॉझीट जप्त होईल कि काय अशी भीती बेस्ट कामगार सेनेला आहे. म्हणून १८ वर्ष त्यांना वाळीत टाकले होते. आता ब्रँड नावाने पुढे आले. परंतु बेस्ट कर्मचारी या बेस्ट कामगार सेनेचा बँड वाजविल्याशिवाय राहणार नाही. कप बशी आपली निशाणी आहे. २५ वर्ष ही निशाणी घेऊन लढतोय. एकदाही हरलो नाही. ही निवडणूकही जिंकायची आहे. लागेल ती ताकद मुंबई बँक आणि सरकार केल्याशिवाय राहणार नाही, असा शब्दही दरेकरांनी यावेळी कामगारांना दिला.