नव्याने उलगडणारी रणरागिणींची उज्ज्वल गाथा - ‘अपराजिता’

    16-Aug-2025
Total Views |

भारताच्या इतिहासात रणांगण गाजवणारे पुरुष कमी अधिक प्रमाणात गौरवले गेले आहेत. पण, या इतिहासात ज्यांनी अविचल धैर्य, राजकीय मुत्सद्देगिरी आणि अप्रतिम नेतृत्वगुण दाखवले, त्या अनेक वीरांगना मात्र विस्मरणात गेल्या आहेत! या अज्ञात स्त्री शक्तीच्या योगदानावर प्रकाश टाकणारा एक महत्त्वाचा ग्रंथ काही महिन्यांपूर्वी वाचकांसमोर आला आहे ‘अपराजिता.’ पहिल्या आवृत्तीला मिळालेल्या अत्यंत चांगल्या प्रतिसादानंतर याची दुसरी आवृत्तीही प्रकाशित झाली आहे.

मेजर (निवृत्त) मोहिनी गर्गे-कुलकर्णी लिखित हा सुमारे ८०० पानांचा देदीप्यमान ग्रंथ भारताच्या इतिहासातल्या गत २००० वर्षांमधल्या निवडक रणरागिणींच्या लघुचरित्रांचा समग्र दस्तऐवज आहे. ‘अपराजिता’ या शीर्षकानेच या स्त्रियांच्या अजेय लढ्यांचा, धैर्याचा आणि त्यागाचा ठसा उमटतो. लेखिकेने जवळपास चार वर्षे, शेकडो संदर्भग्रंथ डोळ्याखालून घालत, अनेक अडचणी पार करत हा अभ्यास सिद्ध केला आहे. विस्मरणात गेलेल्या अनेक वीरांगनांची गाथा यामधून ग्रथित केली आहे. ‘अपराजिता’मध्ये समाविष्ट राण्या केवळ झाशीच्या लक्ष्मीबाईपुरत्या मर्यादित नाहीत, तर प्राचीन काळातील नागनिकेपासून, स्वातंत्र्ययुद्धातल्या झाशी रेजिमेंटमधील क्रांतिकारक युवतींपर्यंतचा विस्तृत पट या ग्रंथात उलगडतो. या सखोल अभ्यासातून एक मोठा संदर्भग्रंथच तयार झाला आहे.

भारताचा प्रदीप्त इतिहास या वीरनारींच्या पराक्रमाचा साक्षीदार आहे. परकीय आक्रमकांशी लढत या वीरांगनांनी स्वातंत्र्य अबाधित ठेवले, तसेच अंतर्गत बंडखोरांचे दमन करून सुराज्य प्रस्थापित केले. लोकप्रशासन, रणकौशल्य, मुत्सद्देगिरी, अर्थकारण, न्यायव्यवस्था, परराष्ट्रधोरण, आंतरराष्ट्रीय व्यापार अशा अनेक पैलूंनी त्यांचे कर्तृत्व समृद्ध होत. मागील दोन सहस्त्रकांमधल्या निवडक राण्यांची गाथा या पुस्तकात आली आहे.

प्रत्येक वीरांगनेचे चरित्र एका ऐतिहासिक व सांस्कृतिक चौकटीत मांडले गेले आहे. लेखिकेचे निरीक्षण, भाषा आणि संदर्भांचा मागोवा इतका प्रभावी आहे की, वाचक पुस्तकात पूर्णपणे बुडून जातो. सिंध, काश्मीर, आसाम, तामिळनाडू, बंगाल, राजस्थान यांच्यासह अखंड भारतातल्या बहुतांश राज्यांचा, राजवंशांचा इतिहास, त्याचे महाभारत-रामायणकालीन तसेच, पौराणिक संदर्भ, संस्कृती, प्रशासन व्यवस्था अशा अनेक गोष्टींची ठोस माहिती यातून मिळते.

इतिहासावर आधारित लेखन प्रासंगिक आणि कोरडे वाटण्याचा संभव असतो. पण, ‘अपराजिता’ हे पुस्तक गंभीर अभ्यास आणि ललित शैलीचा सुरेख संगम आहे. त्यामुळे वाचकाला इतिहास वाचतो आहे की एखादी चरित्रकथा, असा विचार करावा लागतो.इतिहास हे केवळ राजे-रजवाड्यांचे किंवा परकीय आक्रमकांचे क्षेत्र नसून, स्त्रियांनी गाजवलेले मैदानही आहे, हे सांगण्यासाठी आणि समजण्यासाठी हा ग्रंथ प्रत्येक शाळा आणि महाविद्यालयात असायला हवा असा आहे. महाराष्ट्र शासनाने राज्यातल्या प्रत्येक शासकीय ग्रंथालयात ठेवण्यासाठी या ग्रंथाची निवड केलेली आहे.

मेजर मोहिनी या स्वतः एक लष्करी अधिकारी आणि इतिहासप्रेमी अभ्यासक असल्यामुळे, त्यांनी रणांगणाचे वास्तव, प्रशासकीय भूमिका आणि नारीशक्तीचे दर्शन समरसून अनुभवले आहे. त्यामुळेच या ग्रंथाला अधिक महत्त्व प्राप्त होते. ‘अपराजिता’ हे केवळ चरित्रसंग्रह नाही, तर भारतीय स्त्रीशक्तीचे गौरवगान आहे. शौर्य, कर्तृत्व आणि आत्मसन्मान यांचे सजीव प्रतीक असणार्या या वीरांगनांनी देशाचा इतिहास घडवला आणि मेजर मोहिनी यांनी या ग्रंथाद्वारे या वीरांगनांना मानवंदना दिली आहे, त्यांच्या स्मृतींना संजीवनी दिली आहे. तसेच विश्वाच्या पटलावर भूषवता येईल, असा भरीव साहित्यिक ठेवा पुढच्या पिढ्यांसाठी निर्माण केला आहे. हा ग्रंथ केवळ एक वाचनसाहित्य न राहता, तो भारतीय स्त्रीशक्तीच्या गौरवशाली परंपरेचा शिक्षणात समावेश व्हावा, ही काळाची गरज आहे.

आपल्याला असे सांगितले जाते की, पाश्चिमात्य देशांनी स्त्रीला स्वातंत्र्य, शिक्षण आणि अधिकार दिले. परंतु, या ग्रंथातील स्त्री शासकांची आणि अधिकार्यांची यादी वाचून लक्षात येते की, भारतीय स्त्रीला स्वातंत्र्यासाठी, संरक्षणासाठी लढावे लागले ते भारतीयांशी वा भारतीय संस्कृतीशी नाही, तर पाश्चात्य शासकांशी आणि पाश्चात्य संस्कृतीशी. या सर्व वीरांगनांना शस्त्र आणि शास्त्राचे शिक्षण आणि शासन करण्याचे मूलभूत स्वातंत्र्य होते. ज्यावेळी युरोपमधील स्त्री मतदानाचा अधिकार मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरली होती, त्यावेळी स्वतंत्र भारतातील स्त्री मतदान करून, निवडणूक लढवून, जिंकून, मंत्रिपद भूषवत होती.

‘अपराजिता’ प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावे असे, दीपस्तंभासारखे ठाम उभे असलेले, स्त्रीशक्तीचे तेजस्वी दर्शन घडवणारे एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक साहित्य.

पुस्तकाचे नाव : अपराजिता
लेखिका : मेजर मोहिनी गर्गे-कुलकर्णी
प्रकाशन : मिहाना पब्लिकेशन,पुणे
- बुकगंगा, अमेझॉन, सह्याद्री बुस, मिहाना पब्लिकेशन्स इत्यादी वेबसाईट्सवरून घरपोच मागवता येईल.
पृष्ठसंख्या : ८३६