ग्रामीण भागातील ते कर्मचारी झाले परमनंट पहिल्या टप्प्यात 25 कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र प्रदान 'मुंबई तरूण भारत'चा इॅम्पक्ट

    15-Aug-2025   
Total Views |

कल्याण , २७ गावातील कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी सेवेत घेण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित होता. या बाबत 'समस्यांचे गाव' या मालिकेतून त्यांच्या या प्रश्नाला वाचा फोडण्यात आली होती. त्यांची दखल स्थानिक आमदार शिवसेनेचे राजेश मोरे यांनी घेतली होती. शुक्रवारी पहिल्या टप्प्यातील २५ कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घेण्यासंदर्भातील पत्र आयुक्त अभिनव गोयल यांच्याकडून कर्मचाऱ्यांना प्रदान करण्यात आले.

कल्याण डोंबिवली महापालिकेत २०१५ ला महापालिका निवडणूकीआधी २७ गावांचा समावेश करण्यात आला. आधी जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेल्या कामगारांना ही महापालिकेच्या सेवेत वर्ग करण्यात आले. मात्र तेव्हापासून ते आतापर्यंत आम्हाला महापालिका सेवेत कायम करा हा प्रश्न प्रलंबित पडला होता. याबाबत महापालिका प्रशासनाकडे वारंवार पत्रव्यवहार ही झाले होते. पण त्याची कोणीही दखल घेतली नव्हती. २७ गावे महापालिकेच्या आत आणि बाहेर याबाबतचा मुद्दा सातत्याने उद्भवत असतो. त्यामुळे या कामगारांचे भवितव्य काय असा ही प्रश्न उपस्थित होत होता. ज्यावेळी मुंबई तरूण भारत ने 'समस्यांचे गाव' ही मालिका चालविली तेव्हा कर्मचाऱ्यांनी सेवेत कायम करण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. याप्रकरणी तरूण भारतने प्रकाश टाकत हा मुद्दा मालिकेमध्ये उचलला होता. गावातील नागरी समस्यांबरोबरच कामगारांच्या सेवेत कायम करण्याच्या प्रश्नावर चांगलीच चर्चा झाली. स्थानिक आमदार राजेश मोरे यांनी मालिकेची दखल घेत विविध नागरी समस्यांवर आयुक्तांची भेट घेतली. त्यातील काही प्रश्न मार्गी लागले. आमदारांनी कामगारांच्या प्रश्नाबाबत आयुक्तांशी चर्चा केली होती. त्यावेळी आयुक्तांनी कामगारांना कायम सेवेत घेण्याबाबतच्या मुद्दयाला हिरवा कंदील दाखविला होता. १५ ऑगस्ट ला स्वातंत्र्य दिनी याबाबतचे पत्र देऊ असे आश्वासन आमदारांनी दिले होते. आज त्या आश्वासनाची अंमलबजावणी झाली असून कामगारांनी आमदारांसह तरूण भारतचे आभार मानले. पहिल्या टप्प्यात २५ कर्मचाऱ्यांना कायम केल्याबाबत नियुक्तीपत्र दिली आहेत. त्याचबरोबर आता उर्वरित कर्मचाऱ्यांना पत्र कधी देणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.