नवी दिल्ली : (PM Narendra Modi on Semiconductor Development) भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दि. १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. यावेळी केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. यावेळी साल २०२५ च्या अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर चिप्स बाजारात उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगभरातील इतर राष्ट्रे समृद्ध होत गेली, परंतु भारताचे सेमीकंडक्टरचे स्वप्न ५०-६० वर्षांपूर्वीच जन्माच्यावेळीच संपवण्यात आलं, याची आठवण करुन देत मोदींनी भारत आता मिशन मोडवर असल्याचे सांगितले.
सेमीकंडक्टरच्या कल्पनेचीच भ्रूणहत्या झाली!
यासंदर्भात बोलताना पंतप्रधान म्हणाले की, "भारतात सेमीकंडक्टर कारखाना सुरू करण्याचा विचार ५०-६० वर्षांपूर्वी सुरू झाला होता. परंतु त्या सेमीकंडक्टरच्या कल्पनेचीच भ्रूणहत्या झाली. आमच्या सरकारने मिशन मोडमध्ये सेमीकंडक्टर उद्योगावर काम सुरू केले. तोपर्यंत ही योजना आजवर रखडलेली होती. सध्या सहा चिप प्लँट यांची उभारणी प्रगतीपथावर आहे. तर आणखी चार प्लँट्सना हिरवा कंदिल दाखविण्यात आला आहे. या वर्षाच्या अखेरीस, मेड इन इंडिया सेमीकंडक्टर चिप्स बाजारात उपलब्ध होतील.
"
...पण सेमीकंडक्टरचा प्रकल्प प्रत्यक्षात आला नाही"
"आज लाल किल्ल्यावरून मी भूतकाळातील सरकारवर टीका करणार नाही. परंतु देशातील युवा पिढीला हे माहीत असायला हवे की, ५०-६० वर्षांपूर्वी सेमीकंडक्टर कारखाना सुरू झाला होता, त्यासाठी फाईल्सही सरकवल्या गेल्या. पण सेमीकंडक्टरचा प्रकल्प प्रत्यक्षात आला नाही. आपण पाच ते सहा दशके वाया घालवली. आज ज्या देशांनी सेमीकंडक्टरमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली ते जागतिक स्तरावर त्यांची ताकद दाखवत आहेत", असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात म्हटले.
"मेड इन इंडिया सेमीकंडक्टर चिप्स बाजारात येणार"
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, "आम्ही स्वतःला भूतकाळातील ओझ्यातून मुक्त केले आहे आणि सेमी कंडक्टर प्लँटवर मिशन मोडवर काम केले. लवकरच सहा युनिट्स सुरू होणार आहेत. या वर्षाच्या अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर चिप्स बाजारात उपलब्ध होतील. या आठवड्याच्या सुरुवातीला केंद्रीय मंत्रिमंडळाने मेड इन इंडिया सेमीकंडक्टर मिशन अंतर्गत चार नवीन सेमीकंडक्टर उत्पादन आणि चाचणी संयंत्रांना मंजुरी दिली. याचा एकूण आर्थिक खर्च ४,५९४ कोटी रुपये आहे. यापैकी दोन प्लँट ओडिशामध्ये आणि अन्य दोनपैकी एक पंजाब आणि एक आंध प्रदेशात उभारले जाणार आहेत."
भारताच्या तंत्रज्ञान क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\