‘ते’ हिंदू पारतंत्र्यातच!

    15-Aug-2025   
Total Views |

'व्हॉईस ऑफ पाकिस्तान मायनॉरिटी’ या संघटनेने नुकतेच एका अहवालात जाहीर केले की, पाकिस्तानमध्ये दरवर्षी दोन हजार अल्पवयीन मुलींचे अपहरण केले जाते. या मुली हिंदू किंवा ख्रिश्चन असतात. या मुलींचे काय होते? तर त्याबाबत अमेरिकी राजनयिक सॅम्मुअल ब्राउनबॅकने म्हटले होते की, "पाकिस्तानमधल्या या हिंदू, ख्रिश्चन मुलींना चीनमध्ये वेश्या म्हणून विकले जाते किंवा चीनमध्ये कुणाची तरी जबरदस्तीने पत्नी बनवले जाते.” पाकिस्तानमधील गैर मुस्लिमांचा मागोवा घेतला, तर जाणवते की, अल्पवयीन ख्रिस्ती हिंदू मुलींचे अपहरण करून, धर्मांतरण करून त्यांचा निकाह पाकिस्तानातील प्रौढ किंवा वृद्ध मुस्लीम व्यक्तींशी लावला जातो. ती व्यक्ती विवाहित असते आणि पोरांचे लेंढारही असतेच. या पळवून आणलेल्या बालिकेने दिवसभर त्याच्या बायका आणि मुलांसाठी काम करायचे आणि रात्री त्या माणसाचा शारीरिक अत्याचार सहन करायचा.

अल्पवयीन हिंदू मुलींचे अपहरण करायचे. त्यांचे धर्मांतरण घडवून आणायचे. त्यांचा निकाह त्यांचा बाप किंवा आजा, शोभेल अशा मुस्लिमाशी लावून द्यायचा. मुलींच्या आईबाबांनी पोलिसांत तक्रार केली, तरी त्यांची तक्रार घेतली जात नाही. हिंदूंनी संघटित होऊन न्यायालयात खटला दाखल केला, तर एक-दोन वर्षांनंतर न्यायालयात खटला उभा राहतो. त्यानंतर पुढे न्यायालयात दृश्य काय असते, तर ती १३ ते १४ वर्षांची मुलगी हिजाब घालून न्यायालयात उभी असते. आईबाप पुरावे देतात की, मुलगी अल्पवयीन आहे, तर न्यायालयात तिचा तो वयस्कर पती आणि त्याचा वकील सिद्ध करतात की, मुलगी अल्पवयीन नाही ती १८ वर्षांची आहे. मुलीचे अपहरण करून तिच्याशी निकाह करणारा, ती १४ वर्षांची मुलगी १८ वर्षांची आहे, असे छातीठोकपणे सांगतो. तसे खोटे पुरावेही उभे करतो आणि पाकिस्तानचे न्यायालय ते पुरावे मान्यही करतात. हिजाबमध्ये उभी असलेली ती बालिका काहीच करू शकत नाही. कारण, तिच्याकडून जबरदस्तीने इस्लाम कबुल करून घेतलेला असतो. हिंदू आईबाबांकडे जाण्यासाठी ती इस्लाम सोडू शकत नाही. कारण, तसे केल्यास तिथले धर्मांध कट्टर लोक तिचे आणि तिच्या हिंदू कुटुंबांचे तुकडे करतील, याची तिला खात्री असते.

पाकिस्तानमधील काही घटना पाहू. २२ वर्षीय जिया, २० वर्षीय दिया, १६ वर्षीय दिशा या तिघी सख्ख्या बहिणी, तर १३ वर्षीय हरजित त्यांचा भाऊ. परहाण खासखेली नावाच्या संगणक शिक्षकाने या चौघा बहीण-भावांचे अपहरण केले. अपहरणकर्त्या परहाण खासखेलीने न्यायालयात सांगितले की, "त्या तीन बहिणी आणि त्यांच्या भावाने इस्लाम मर्जीने स्वीकारला आहे.” पण, १६ वर्षांची दिशा किंवा १३ वर्षांचा हरजित अल्पवयीन असताना धर्मांतरण कसे करू शकतात, याचे पाकिस्तानमध्ये उत्तर नाही. दुसरी घटना ननकाना साहिबा येथील शीख बाबाजींची मुलगी जगजित कौरची. तिचे मोहम्मदने अपहरण केले. तिच्या कुटुंबाने जंगजंग पछाडले. आंतरराष्ट्रीय स्तरावर हा विषय गेला. तेव्हा मोहम्मद न्यायालयात हजर झाला. जगजितचे जबरदस्तीने धर्मांतरण झाले, या विषयावर न्यायालयाने तिलाच सुधारगृहात पाठवले आणि सांगितले की, सुधारगृहातून एक वर्षाने बाहेर आल्यावर तुला मोहम्मदकडेच जावे लागेल.

याच पाकिस्तानमधली अजून एक घटना. नऊ वर्षांची हिंदू बालिका खेळत असताना, एका ५५ वर्षांच्या मुस्लीम इसमाने तिला पळवून नेले. तिचे धर्मांतरण केले आणि तिच्याशी निकाहही केला. पण, त्यावर न्याय नाही. हिंदू बालकांची स्थितीही काही वेगळी नाही. या बालकांवरही लैंगिक अत्याचार होत असतात. भयंकर! फाळणी झाल्यावर जवळजवळ २० टक्के हिंदू विश्वासाने पाकिस्तानमध्ये राहिले. पण, आज तिथे केवळ १.६ टक्के हिंदू आहेत. १८.४ टक्के हिंदू गेले कुठे? अमानवी, अधार्मिक अत्याचार त्यांच्यावर झाले. पाकिस्तान त्यांच्यासाठी नरक झाला. पाकिस्तानमधल्या या हिंदूंचा शोध कुठे घ्यायचा? हे सगळे पाहून ‘थॉट्स ऑन पाकिस्तान’मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेल्या विचारांचे महत्त्व प्रकर्षाने जाणवते. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीतल्या नागरी संशोधन कायद्याचेही महत्त्व पटते. आज भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. बहुसंख्य हिंदू असलेल्या भारतात कट्टर मुस्लीमही सुखनैव राहतात. मात्र, पाकिस्तानमधल्या हिंदूंच्या स्वातंत्र्याचे काय?
९५९४९६९६३८

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.