नवी दिल्ली : (PM Narendra Modi) देशभरात आज सगळीकडे स्वातंत्र्य दिनाचा सोहळा उत्साहात साजरा होत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लाल किल्ल्यावर ध्वजारोहण करुन देशाला संबोधित केले. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी देशातील विविध राज्यांमध्ये गेल्या काही काळापासून सुरु असलेल्या भाषिक वादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी भारतीय भाषांचा उल्लेख करत "आपल्या सगळ्या भाषा जेवढ्या समृद्ध होतील. तेवढे आपल्या ज्ञानप्रणालीला सामर्थ्य मिळेल", असे प्रतिपादन केले आहे.
"आपल्या संस्कृतीची ताकद ही आपली विविधता आहे"
स्वातंत्र्यदिनी देशवासियांना संबोधित करताना पंतप्रधानांनी देशातील विविधतेचा उल्लेख करत म्हटले की, "आपल्या संस्कृतीची ताकद ही आपली विविधता आहे. आम्ही ही विविधता साजरी करू इच्छितो. ही विविधता साजरी करण्याची सवय लागावी, असा आमचा प्रयत्न आहे. भारत नावाचा हा बगिचा विविध प्रकारच्या फुलांनी बहरलेला आहे, ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. आपल्या देशात खूप विविधता आहे आणि ही विविधता आपल्यासाठी एक खूप मोठा ठेवा आहे", असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.
आपल्या सर्व भाषा जेवढ्या समृद्ध होतील
"आपला देश भाषांच्या विविधतेने भरलेला आहे. म्हणूनच आम्ही मराठी, आसामी, बांगला, पाली, प्राकृत या भाषांना अभिजात भाषांचा दर्जा दिला आहे. आपल्या भाषा जेवढ्या विकसित होतील. आपल्या सर्व भाषा जेवढ्या समृद्ध होतील. तेवढं आपल्या ज्ञानप्रणालीला सामर्थ्य मिळेल, असं माझं मत आहे. आजचे हे युग डेटाचे आहे आणि त्यामध्ये ही ताकद जगासाठीही मोठी शक्ती ठरू शकते. एवढे सामर्थ्य आपल्या भाषांमध्ये आहे. आपल्याला आपल्या सर्व भाषांबाबत अभिमान वाटला पाहिजे. आपल्या सर्व भाषांच्या विकासासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजे", असे आवाहनही नरेंद्र मोदी यांनी यानिमित्ताने केले.