दृष्टीहीनांचे गोविंदा पथक गरुडभरारीसाठी सज्ज!

    15-Aug-2025   
Total Views |

मुंबई, नयना फाउंडेशनच्या माध्यमातून एक दशकाहून अधिक काळ दृष्टीहिनांचे गोविंदा पथक, दहीहंडीच्या उत्सवात हिरीरीने भाग घेत आहे. दृष्टीहिनांचे हे पहिले गोविंदा पथक असून, यावर्षी सुद्धा आपल्या पथकाच्या माध्यमातून नवे विक्रम साकार करण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.२०१० सालापासून दहीहंडीच्या उत्सवामध्ये सामील होणारे हे गोविंदा पथक दिव्यांगांसाठी आशेचा किरण बनून समोर आले आहे. नयन फाउंडेशनच्या माध्यमातून, दिव्यांगांसाठी वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन वेळोवेळी केले जाते. यामध्ये योगा, चेस, सेल्फ डिफेन्स, असे अनेक उपक्रम व शिबिरं राबवली जातात. केवळ मुंबईच नाही तर, मागच्या १२ वर्षांच्या कालावधीमध्ये नाशिक, अलिबाग या ठिकाणी सुद्धा त्यांनी उत्साहात गोविंदोत्सव साजरा केला. आपल्या श्रवणशक्तीतून थरांची अचूक रचना करत, मटकी फोडण्याचे कौशल्य या विशेष मुला मुलीनी आत्मसात केले आहे. आत्मबल आणि इच्छाशक्तीच्या जोरावर, माणूस आपल्या सर्व मर्यादांवर मात करून यशाची शिखर कशी गाठू शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे गोविंदा पथक आहे.

नयना फाउंडेशनच्या या गोविंदापथकाला अनेकांच्या कौतुकाची थाप सुद्धा मिळाली आहे. ठाण्यामध्ये पहिल्यांदा ज्यावेळेस या गोविंदा पथकाने आपल्या एकतेचा करिष्मा दाखवला त्यावेळेस टेंभी नाका पथक, जांभळी नाका पथक, माजगाव पथक यांनी या गोविंदा पथकाला सलामी दिली. गोविंदा पथकाच्या बाबतीत जय जवान गोविंदा पथक हे अनेकांसाठी स्फूर्ती स्थान आहे, परंतु जय जवान गोविंदा पथकाच्या म्हणण्यानुसार, नयना फाउंडेशनचे गोविंद पथक त्यांच्यासाठी प्रेरणादायी आहे. आज आधारीका फाउंडेशनच्या सहयोगातून, अनेक सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. वेगवेगळ्या शिबिरांचे आयोजन दिव्यांगांसाठी केले जात आहे आणि अडचणींवर मात करत, ही जिद्द मनात बाळगून काम करत राहायचं या उद्देशाने हे गोविंदा पथक सुसज्ज आहे.

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.