
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ११ वर्षांच्या सत्ताकाळात काय बदल झाला, तर हिंदूंचा कायम दुस्वास करत, हिंदू-मुस्लीम तेढ निर्माण करण्यासाठी मुस्लिमांचे लांगूलचालन करणारे हिंदूद्वेष्टे लोक मोदींच्या ११ वर्षांच्या काळात श्रद्धाळू हिंदू आहोत, असे म्हणू लागले आहेत, दाखवू लागले आहेत. यात जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या बापाचा म्हणजे शरद पवार (ते शरद पवार यांना बापच मानतात) यांचा नंबर वरचा. ‘साल्यांनो! मी तुमच्या देवाचा बाप आहे’ म्हणणारे शरद पवार सार्वजनिकरित्या देवदेव करायला लागले आहेत, तर जितेंद्र आव्हाड तुळजाभवानी मातेच्या मंदिराची बळेच बाजू घेत आहेत. हिंदूंनो, आणखी किती ‘अच्छे दिन’ हवे आहेत?
असो! "कोणत्याही परिस्थितीत तुळजाभवानी मंदिराच्या गाभार्याला हात लावू देणार नाही, ज्या पायर्यांवरून छत्रपती शिवाजी महाराज गेले, त्या पायर्या आणि देवीच्या गाभार्याला हात लावू देणार नाही,” असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. असे म्हणत ते तुळजापूरच्या देवीच्या मंदिरात गेले. आई भवानी आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलही बोलले. हेच आव्हाड काही वर्षांपूर्वी देवधर्म किंवा छत्रपतींबद्दल बोलताना कुणी पाहिले आहे का? गेल्याच आठवड्यात जितेंद्र आव्हाड यांनी, सनातन धर्मावर गरळ ओकली होती. अर्थात, त्याशिवाय दुसर्याची त्यांच्याकडून अपेक्षाच नाही. पण, लगेच आता त्यांना देवधर्म आणि मंदिराची काळजी वाटू लागली? आपण हिंदू आहोत, आपण तुळजाभवानी मातेचे २०१ वेळा दर्शन घेतले हे सांगायची वेळ आव्हाडांवर आली आहे. आव्हाडांची आजपर्यंतची जी कारकीर्द पाहता, त्यांना तुळजाभवानी मंदिरापेक्षा त्या मुद्द्यावरून राजकारण पेटवायचे आहे, असेच दिसते. दुसरीकडे तुळजापूरच्या भाजपच्या कार्यकर्त्यांनीही आंदोलन केले की, आव्हाड हे तुळजापूरचे नाव बदनाम करीत आहेत. मंदिर तोडले जाणारच नाही मग, आव्हाड खोटे का बोलत आहेत. अर्थात, त्यामागे आव्हाडांची इच्छा आहेच की, समाजाने त्यांना हिंदूंचे कैवारी समजावे. ‘सेव्ह गाझा’ म्हणणार्या आव्हाडांना सध्या हिंदुत्वाचे भरते आले आहे. हे सगळे पाहून ‘हेराफेरी’ सिनेमातला डायलॉग आठवतो. त्यात नायक म्हणतो, ‘सब लडकी का चक्कर हैं बाबुभैया|’ आव्हाड आणि त्यांच्या समविचारी लोकांचे हे बेगडी देवधर्म प्रेम पाहून, या डायलॉगचे शब्द बदलून ओठावर येतात ते म्हणजे, ‘सब व्होट का चक्कर हैं बाबूभैया!’ आणि हे महाराष्ट्र जाणतो!
मिंतादेवीची माफी मागातदार सूची आणि मतदार पुनर्परीक्षण म्हणजे ‘एसआयआर’ या प्रक्रियेविरोधात, काँग्रेस आणि त्यांचे समविचारी पक्ष आहेत. मतदारांची सत्यता तपासली, तर मृत किंवा वास्तवात नसलेल्या मतदारांची नावं त्या यादीतून वगळली जातील. खरे मतदारच मतदानास पात्र ठरतील. पण असे झाले, तर मग खोट्या मतदारांचे काय? हे खोटे मतदार ज्यांना मतदान करतात, त्या राजकीय पक्षाचे काय होणार? देशामध्ये निर्मळ मतदान व्हावे, यासाठी ही प्रक्रिया गरजेची आहे. मात्र, मतदारयादीचे पुनर्परीक्षण नको म्हणत, विरोधी पक्षांनी मतदारयादींची सत्यता तपासण्याला विरोध केला आहे. हा विरोध का बरं असेल? याचे कारण काय? खोटे मतदार किंवा अस्तित्वात नसलेल्या मृत मतदारांचा कुणाला फायदा होणार आहे? विरोधी पक्षाचा पुनर्परीक्षणाला विरोध का आहे, याचे उत्तर काय?
असो! निवडणूक मतदान संदर्भात घोळ आहे. याविरोधात राहुल गांधी आणि प्रियांका वाड्रासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. आंदोलन करताना त्यांनी एका महिलेचे चित्र असलेले ‘टीशर्ट’ घातले होते आणि तिचे वय १२४ वर्षे आहे, असे त्यांनी लिहिले होते. निवडणूक यंत्रणेने महिलेचे वय चुकीने लिहले, हे जाहीर केले. मात्र, आंदोलनात त्या ‘टीशर्ट’वर ज्या महिलेचा फोटो आहे, ती मिंतादेवी मात्र खूप रागावली. ती म्हणाली, "राहुल गांधी आणि प्रियांकाने कुणाला विचारून तिचा फोटो असलेला ‘टीशर्ट’ घातला?” त्या दोघांना शिक्षा व्हायला हवी. अर्थात मिंतादेवीचे म्हणणे बरोबरच आहे. कारण, मिंतादेवी ही ४० वर्षांचीही नाही मात्र, तिचा फोटो वापरून वर तिचे वय १२४ असल्याचे लिहून आंदोलन करणार्या काँग्रेसी नेत्यांना, मिंतादेवीची परवानगी घ्यावी असे जराही वाटले नाही? संविधानात याविरोधात कायदा आहे, हे लाल रंगाचे खोटे आणि छोटे पुस्तक हेच संविधान असल्याचे मानणार्या राहुल गांधींना माहिती नाही का? पण, अर्थातच आपण या देशाचे राजे असून, जनता आपल्याला काय उलट प्रश्न विचारेल? अशी वृत्ती राहुल आणि प्रियांका यांची असावी. त्यामुळेच तर मिंतादेवीची परवानगी न घेता, त्यांनी तिचा फोटो वापरला. त्यामुळे काँग्रेसी नेत्यांनी आता मिंतादेवीची माफी मागावी.