‘एआय’वरील अतिनिर्भरता घातकच!

    14-Aug-2025   
Total Views |

‘एआय’ तुमचा डॉक्टर, मानसोपचारतज्ज्ञ, वकील किंवा डायरी नाही! ‘चॅट जीपीटी’चे सीईओ सॅम अल्टमन यांनी काही दिवसांपूर्वी केलेले वक्तव्य वरवर पाहता सल्ला देणारे असले, तरीही ‘एआय’वर असणारे लोकांचे अति अवलंबित्व हा सर्वार्थाने पुढील काळात चिंतेचा विषय असणार आहे. त्याबद्दलचे हे आकलन.

‘चॅट जीपीटी’ किंवा तत्सम सुविधा देणार्या ‘एआय’ टूल्सचा वापर हा, गोपनीयतेच्या अधिकारात येत नाही. अर्थात डॉटर, मानसोपचारतज्ज्ञ आपल्या रुग्णांबद्दलची माहितीही गोपनीयतेच्या (Attorney-client privilege) अंतर्गत येत नाहीत. अशी माहिती न्यायालये किंवा कायदेशीर स्थळी रुग्णाच्या इच्छेविरोधात वापरण्यास मनाई असते मात्र, ‘एआय’शी संवाद साधताना साठवणूक झालेली माहिती ही या अधिकारांतर्गत येत नाही. त्यामुळे युझर्सच्या गोपनीयतेचा भंग होऊ शकतो.

अनेकांना ‘एआय’ आता आपला खासगी आयुष्यातील मित्र वाटू लागला आहे, याबद्दल समाजमाध्यमांवरही चर्चा होते. मात्र, जागरूकता निर्माण होण्यासाठी नाही, तर खासगी संवाद आणि आयुष्यातील अडचणी विचारण्यासाठी चॅटबॉटचा वापर अधिक होत आहे. यामुळे मानसिक स्वास्थही बिघडण्याची भीतीही व्यक्त करण्यात आली. विभक्त होत चाललेली कुटुंबपद्धती, वाढता एकाकीपणा, नोकरी किंवा शिक्षणानिमित्त शहरांमध्ये राहताना एकटे झालेली सवय यातूनच सुरू झालेल्या या गोष्टी आहेत.

अगदी साधा ई-मेल करण्यापासून असो वा एखाद्या ऑफिसमध्ये बैठकीत सादरीकरणाचा विषय असो, हल्ली सर्हास ‘चॅटबॉट एआय’चा आधार घेण्याकडे सर्वसामान्यांचा कल असतो. त्याशिवाय ‘एआय’ कंपन्या सोशल मीडिया इन्फ्लूएर्न्सना त्यांच्या टूलचे प्रमोशन करण्यासाठी आशयनिर्मितीही करतात. त्यामुळे याबद्दल स्वतः कंपनी सीईओ यांनाच भूमिका मांडावी लागली.

‘एआय’ आणि ‘चॅटबॉट’चा वापर हा मानवाच्या कल्पनाशक्तीवरचा आघात करणारा नाही ना? याचाही विचार करावा लागेल. नव्याने येणार्या ‘एआय टूल्स’ आणि ‘चॅटबॉट्स’साठी, भारत हा लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून एक प्रकारे मोठी बाजारपेठच आहे. अमेरिका आणि पाश्चात्य देश भारताकडे बाजारपेठ म्हणूनच पाहतात. ज्याप्रकारे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या महत्त्वाकांशी आयातशुल्क प्रकरणाची चर्चा सध्या जशी जगभर आहे, तशीच भारतीय बाजारपेठ गमावण्याची चर्चाही अमेरिकेतच आहे. अमेरिकन कंपन्यांवर बहिष्कार वगैरे टाकण्याच्या मोहिमा तीव्र झालेल्या नाहीत, उलट त्यावरून सरकारकडे बोटे दाखवण्याचे काम सुरू आहे. धोरणात्मकरित्या जी भूमिका असेल ती सरकार घेईलच पण, आपणही या गोष्टींवर कोणत्या प्रकारे अवलंबून राहायचे, याबद्दलही मर्यादाही हवीच.

अर्थात अशा अवलंबित्वाबाबतच्या गोष्टी एकाएकी होणार नाहीत पण, त्याबद्दलचे सूक्ष्मनियोजन तर सुरू नाही ना याचा कानोसा घेण्याची वेळ आली आहे. काही दिवसांपूर्वी ‘मायक्रोसॉफ्ट’च्या तांत्रिक बिघाडामुळे, अचानक जगभरातील विमानांच्या उड्डाणांसहित, रस्ते आणि इतर वाहतुकीवरही परिणाम झाल्याची बातमी आली होती. आजही ‘ट्विटर’, ‘मेटा’, व्हॉट्सअॅपच्या सेवा काही काळासाठी ठप्प झाल्यानंतर जसा गोंधळ उडतो त्यावरून लक्षात येईल की, या सर्व टूल्सवर असलेले अवलंबित्व किती आहे.

चीनसारख्या या देशाला लक्षात आलेल्या या धोयामुळे, अमेरिकेच्या प्रत्येक टूल्स आणि सॉफ्टवेअर कंपन्यांवर त्यांनी बंदीच घातली. अर्थात त्यांनी स्वतःच्या यंत्रणाही उभ्या केल्या. त्यामुळे डेटा हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिलेला नाही. ‘चॅटबॉट’मध्येही चीनने स्वतःचे ‘डीप-सीक’ तंत्रज्ञान उभे करून, जगभरातील ‘एआय’ क्षेत्राला धक्का दिला होता.

‘एआय चॅटबॉट’वर अवलंबून असणार्यांच्या डोळ्यात अंजन म्हणून, सीए श्रेया जयस्वाल यांनी एक लिंकडीन पोस्ट लिहिली होती. ज्यात त्यांनी ‘चॅटबॉट तुम्हाला तुरुंगात पोहोचवू शकतं,’ असे शीर्षकही दिले होते. कारण, सॅम अल्टमनच्या वायाचा उल्लेख करत त्यांनी पुन्हा सांगितले की, जे ‘चॅट-जीपीटी’मध्ये लिहिलेले आहे, त्याचा पुरावा म्हणून न्यायालयात त्याचा वापर होऊ शकतो. अर्थात न्यायालयाने तशी परवानगी दिली किंवा तो पुरावा म्हणून सादर झाला, तर त्या व्यक्तीला तुरुंगवास होऊ शकतो. तो कसा? तर समजा एखाद्या युझरने जर मस्करीत जरी त्यावर लिहिले की, "मी माझ्या पतीला किंवा पत्नीला धोका दिला आहे, मला आता पश्चाताप होतो आहे मी काय करू? यावर चॅटबॉट हवे ते उत्तर देईल. पण, जर का तो पुरावा युझरच्या साथीदाराला सापडला आणि प्रकरण न्यायालयापर्यंत गेले, तर तक्रारदार हा पुरावा म्हणून सादर करू शकतो. पुढे प्रकरण कायदेशीररित्या पोटगी देण्यापर्यंत जाऊ शकते.”

"एखाद्याने जर ‘एआय’ला प्रश्न विचारला की, इनकम टॅसमध्ये वाचण्यासाठी पळवाटा काय आहेत? तर टॅस ऑडिट किंवा दिवाळखोरी प्रक्रियेतही हा पुरावा म्हणून वापरता येऊ शकतो. एखाद्या कर्मचार्याने कंपनीत कार्यरत असताना, कंपनीच्या ध्येयधोरणांचा उल्लेख करत स्वतःच्याच व्यवसायासाठी काय फायदा होऊ शकतो का? असा प्रश्न विचारला आणि हा पुरावा सापडला, तरीही कंपनीच्या गोपनीयता धोरणांचे उल्लंघन म्हणून कारवाई होऊ शकते,” असे जयस्वाल यांनी सांगितले आहे.

पुढे त्या म्हणतात, "आपण सर्वचजण ‘चॅटजीपीटी’शी बोलताना एकदमच मनमोकळेपणे बोलू लागलो आहोत. इतके की, काहीच अंतर बाळगत नाहीत. जसे ‘चॅट जीपीटी’ एक डायरी, मानसोपचार तज्ज्ञ, मार्गदर्शक किंवा एकदम खास दोस्त असल्यासारखे लोक चॅट करू लागले आहेत. जर तुम्ही न्यायाधीशांसमोर ते वाय बोलू शकणार नसाल, तर अशा गोष्टी त्यात लिहायच्या भानगडीतच पडू नका,” असा सबुरीचा सल्लाही त्यांनी दिला आहे.

काही दिवसांपूर्वीच उघडकीस आलेली अनुप कुमार नायर यांची गोष्ट. ५५ वर्षीय नायर यांनी स्वतःला तीन वर्षे घरातच कोंडून घेतले. याक़ाळात जिवंत राहण्यासाठी त्यांनी, केवळ घरपोच अन्न पुरवणार्या अॅपचा आधार घेतला होता. घरातल्यांनी स्वतःचे जीवन संपवल्याने ते चिंताग्रस्त असायचे. त्यांनी बाहेरच्या जगाशी संपूर्ण संबंधच तोडून टाकले होते. जेव्हा त्यांना बाहेर काढण्यात आले, तेव्हा घराची अवस्था विचित्रच होती. ऑनलाईन जगावर अवलंबून राहिल्याचा अतिरेक आणि नैराश्याच्या कारणास्तव त्यांची ही अवस्था झाली. अर्थात आजही आपल्याकडे अशा गोष्टींवर चर्चा होत नाही. मूळात पुरुषांमध्ये तर नाहीच नाही.

या गोष्टींची शिकार तरुणाई सहज होते. मोबाईलचा अतिवापर, जंकफूडचे अतिसेवन, धुम्रपानाचा अतिरेक जितका गंभीर तितकाच गंभीर ‘एआय’वरच्या अवलंबित्वाचाही आहे. अर्थात, ‘सर्वच काही वाईट’ अशातलाही भाग नाही. समाजमाध्यमांवर तयार केला जाणारा सृजनशील मजकूरही तितकाच आवर्जून शेअर करावा, असाच आहे. अर्थात ज्याप्रमाणे इंटरनेट, संगणक, मोबाईल दुधारी शस्त्र मानले जायचे, त्याचप्रकारे ‘एआय’चेसुद्धाही आहे. वापरणारा त्याचा वापर कशाप्रकारे करतो, यावरही बर्याच गोष्टी अवलंबून आहेत. त्यामुळे ‘एआय’पेक्षा कधीकधी सदसद्विवेकबुद्धीचा वापरही महत्त्वाचा.

तेजस परब

मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक.