प्राप्त हैं, पर्याप्त हैं!

    14-Aug-2025   
Total Views |

‘प्राप्त हैं, पर्याप्त हैं’ हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून विस्थापित मुलींचे संगोपन करण्याचा विडा उचललेल्या अहिल्यानगरच्या वीणा मोकाशी यांच्याविषयी...

आपण जगलेले संघर्षमय जीवन कोणाच्याही वाटेला येऊ नये, अशी प्रार्थना काहीजण मनातल्या मनात करतात; तर काहीजण असे असतात, जे अशा प्रकारचे जीवन आज जगतात, त्यांच्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात आपले सर्वस्व अर्पण करतात. वीणा सचिन मोकाशी या त्यांपैकी एक. हरिद्वार येथे २००३ सालदरम्यान ढगफुटी झाली, त्यात अनेकजण विस्थापित झाले. मुलींची संख्या यात जास्त होती. वीणा यांनी इथल्या काही मुलींना दत्तक घेऊन, त्यांच्या उपजीविकेचा खर्च त्यांनी उचलला असून, त्यांचे संपूर्ण संगोपन वीणा स्वतः करीत आहेत.

अहिल्यानगर येथे त्यांचे बालपण गेले. कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हलाखीची. शालेय शिक्षण घेणेसुद्धा अवघड जात होते. त्यांची आई इयत्ता दुसरी शिकलेली आणि वडील इयत्ता सातवी पास होते. एका खासगी कंपनीत ते नोकरीला होते. घरखर्चात आपलाही थोडाफार हातभार लागावा, या अर्थी वीणा यांनीदेखील स्वतः शाळेत जाता जाता इतर मुलांना शाळेत घेऊन जाणे, त्यांना परत येताना घरी सोडणे अशा पद्धतींचे काम लहान वयात सुरू केले. त्याकाळी ‘स्कूल व्हॅन’ किंवा ‘स्कूल बस’ ही पद्धत नव्हती. म्हणून उपजीविकेचा एक मार्ग म्हणून त्यांनी हा पर्याय स्वीकारला. एकंदरीतच त्यांचे शैक्षणिक जीवन स्वकष्टार्जित असे गेले.

वीणा या इयत्ता सातवीत गेल्यावर त्यांनी चौथी, पाचवी आणि सहावीच्या मुलांचे लास घेण्यास सुरुवात केली. मधल्या काळात वडिलांचा अपघात झाल्याने तेदेखील घरीच होते. महिन्याच्या ३० दिवसांपैकी २२ दिवस घरीच असायचे. अशा परिस्थितीत नोकरी करण्याची त्यांची शारीरिक क्षमता नव्हती. त्यामुळे वीणा यांनी हा लास सुरू करण्याचा निर्णय घेतला.

अकरावी झाल्यानंतर शेजारच्याच एका कन्स्ट्रशन कंपनीत त्यांनी पार्ट टाईम जॉब करण्यास सुरुवात केली. सुदैवाने त्यांच्यावर देवी सरस्वती प्रसन्न होती म्हणून त्या दहावीत बोर्डात आल्या, असे त्या गमतीत म्हणतात. या प्रवासात वेळोवेळी शिक्षकांचेसुद्धा उत्तम मार्गदर्शन त्यांना मिळत होते. नोकरीच्या ठिकाणी तेव्हा अकाऊंट लिहिणे आणि हिशेब करणे इतकेच काम त्यांच्याजवळ होते. वीणा यांना खासकरून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये विशेष रस होता. मात्र, तेव्हाची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांनी कॉमर्समध्येच उत्तम करिअर करायचे ठरवले. मुकुंद घैसास यांचे लाभलेले मार्गदर्शन त्या कधीच विसरू शकत नाहीत.

इयत्ता दहावी आणि बारावीदरम्यान त्या ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’च्या संपर्कात आल्या. तेव्हा सुहास वैद्य, सीमा काळे, जयंत कुलकर्णी या सर्वांनी राष्ट्रभक्ती म्हणजे नेमके काय हे संस्कार वीणा यांच्यावर केले. त्यामुळे समाजाकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोनच बदलला.

त्यांनी ‘सीएमए’ अर्थात ‘कॉस्ट अॅण्ड मॅनेजमेंट अकाऊंटन्सी’ केले असून, तीन विषयांत ‘एमकॉम’देखील केले आहे. सध्या त्या कल्याणच्या एका नामांकित महाविद्यालयात साहाय्यक प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. संघप्रणित सहकार क्षेत्रात काम करीत असलेल्या ‘सहकार भारती’च्या कोकण विभाग सहप्रमुख म्हणून त्यांच्याकडे जबाबदारी आहे.

वीणा यांची विशेष बाब म्हणजे, त्यांनी आज दहा मुलींना दत्तक घेतले असून, त्यांचे संपूर्ण संगोपन त्या करत आहेत. २००३ साली हरिद्वार येथे ढगफुटी झाली होती. त्यात बरेचजण विस्थापित झाले. विस्थापितांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक होते. या मुलींपैकी सहा वर्षांच्या एका मुलीला त्यांनी सर्वप्रथम दत्तक घेतले. पुढे २००९ सालापर्यंत दहा मुली दत्तक घेतल्या. आज दहापैकी एका मुलीचे ‘एमबीए’ पूर्ण होऊन लग्नसुद्धा झाले आहे आणि ती छान संसार करते आहे. दोन मुली एम्स हॉस्पिटलमधून मेडिकलचे शिक्षण घेत आहेत.

वीणा म्हणतात, "कोरोनाच्या मधला काळ थोडा संघर्षमय होता. मुलींच्या आर्थिक व्यवस्थेत अडचण येईल का, असे बरेच प्रश्न त्यांना पडत होते. मात्र, सुदैवाने तेव्हा सर्वकाही सुरळीत झाले.” दुसरे म्हणजे वीणा यांच्या घरच्या मंडळींना, नातेवाईकांना याबाबत कुठलीच कल्पना नव्हती. मुलींच्या संगोपनाचा निर्णय हा सर्वस्वी वीणा आणि त्यांच्या पतीचा होता. जसजसे इतरांना या कार्याबद्दल कळले, तसतसे तेसुद्धा आज वीणा यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.

त्या म्हणतात, "आपण समाजाचे देणे लागतो. जर आपल्याकडे मूठभर असेल, तर त्यातले घासभर आपण गरजूंना दिले पाहिजे. हीच आपली भारतीय संस्कृती आहे.” वीणा कायम म्हणतात, "ही मुले शिकण्यासाठी प्रचंड उत्सुक असतात, फक्त त्यांना शिकवण्यासाठी शिक्षकांची गरज आहे. आपण एक महिना, १५ दिवस किंवा किमान सात दिवस जरी या मुलांच्या सेवेसाठी वाहिले, तरी त्यांच्यादृष्टीने हे खूप मोठे योगदान ठरेल. आज या मुलांना गरज आहे ती फक्त भावनिक आधाराची. ती जर आपण पूर्ण केली, तर ही मुलेसुद्धा आपल्या खांद्याला खांदे लाऊन विविध क्षेत्रांत अभिमानाने काम करतील.” वीणा मोकाशी यांच्या या कार्याला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने अनेक शुभेच्छा.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक