गणेशोत्सवात मुंबईत डीजे वाजवण्याला बंदी, उच्च न्यायालयाचा निर्णय कायम

    12-Aug-2025   
Total Views |


मुंबई : (Mumbai Ganeshotsav 2025 DJ Ban) मुंबईत सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची लगबग सुरु झाली आहे. मात्र, गणेशोत्सवाच्या तोंडावर मुंबई उच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय कायम ठेवला आहे. गणेशोत्सवाच्या काळात संपूर्ण मुंबईमध्ये डीजेवर बंदी असणार आहे. जर कुणी डीजेचा वापर केला तर मुंबई पोलीस कारवाई करणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी डीजे आणि डॉल्बी सिस्टिमवर बंदी आणली होती. तो निर्णय आताही कायम ठेवला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गणेशोत्सव काळात डीजे वाजवणाऱ्या गणेश मंडळांवर मुंबई पोलिसांची नजर असणार आहे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्यास पोलिस कायदेशीर कारवाई करणार आहे. 

बऱ्याच गणेशोत्सव मंडळांनी डीजेला पर्याय म्हणून ढोल-ताशा पथक, लाईव्ह बँड किंवा कमी आवाजाच्या साऊंड सिस्टीमचा वापर करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, तरीही काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत असल्याचे पाहायला मिळते. यावर पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे. डीजेचा मोठा आवाज मानवी आरोग्यासाठी हानिकारक असल्याचा मुद्दा पर्यावरण आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी अनेकदा न्यायालयासमोर मांडला आहे. यामुळे ही बंदी कायम ठेवण्यात आली आहे.




अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\