बिहारमधील २५० जनजातींच्या धर्मांतराचा डाव बजरंग दलाने उधळला

    12-Aug-2025   
Total Views |

मुंबई : देशभरात इस्लामिक कट्टरपंथी आणि ख्रिस्ती मिशनरींचे गट दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. भारतातील लोकसंख्येचे संतुलन बदलून सामाजिक एकतेला तडे देण्याचा प्रयत्न वारंवार त्यांच्याकडून होतो आहे. बिहारच्या कटिहार जिल्ह्यातील आदिवासींच्या धर्मांतरणाचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले. येथील २५० आदिवासी समाजातील लोकांना ख्रिस्ती बनवण्याचा कट रचला जात होता. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे कटात सामील असलेल्या ६ जणांना ताब्यात घेणे पोलिसांना शक्य झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, धर्मांतर करण्यासाठी आलेल्या टोळीच्या निशाण्यावर प्रामुख्याने संथाली आदिवासी समाजातील लोक होते. या गरीब आणि निष्पाप लोकांचे मतांतरण करण्याचा (ब्रेनवॉश) प्रयत्न सुरु होता. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना याची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली आणि धर्मांतराचा कट उधळला.

बजरंग दलाचे या प्रकरणी म्हणणे आहे की, गेल्या काही दिवसांपासून त्यांना या भागात हिंदूंचे धर्मांतर केले जात असल्याची बातमी मिळत होती. घटनास्थळी पोहोचल्यावर कळले की, २०० ते २५० लोकांना धर्मांतर प्रक्रियेत सामील केले गेले आहे. घटनास्थळी काही धार्मिक पुस्तके आणि आपत्तिजनक साहित्य मिळाले, जे धर्मांतर होत असल्याची साक्ष देतात. या प्रकरणाचा कठोर तपास व्हावा अशी बजरंग दलाची मागणी आहे.

पोलिसांनी धर्मांतराच्या तक्रारीनंतर २ पुरुष आणि ४ महिलांना ताब्यात घेतले असून, प्रकरणाची कसून चौकशी सध्या होते आहे. विशेष म्हणजे ख्रिस्ती धर्म स्वीकारलेल्या एका कुटुंबाने घरवापसी केली आहे.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक