
वय हा एक आकडा असतो. याची प्रचिती देत वयाची साठी ओलांडल्यावरसुद्धा बॅडमिंटन स्पर्धेत बाजी मारणार्या मिलिंद पूर्णपात्रे यांच्याविषयी...वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर माणसाला निवृत्तीचे वेध लागतात. कळत-नकळत आयुष्याची संध्याकाळ त्यांच्या मनात घर करू लागते. परंतु, आपल्याला समाजात अशीसुद्धा काही माणसं भेटतात, ज्यांच्यासाठी वय म्हणजे केवळ एक आकडा असतो. अशी माणसे जीवनाच्या प्रातःकाळीच स्वप्नपूर्तीचा विडा उचलतात. मग त्या स्वप्नांचा पाठलाग करण्यासाठी, ते बंधनांच्या सर्व सीमा झुगारून देतात आणि त्यामुळेच आपल्या कार्यात यशस्वीही होतात. अशाच एका अवलियाचे नाव म्हणजे मिलिंद पूर्णपात्रे. पाच दशकांहून अधिक काळ बॅडमिंटन खेळणारे मिलिंद पूर्णपात्रे, आजच्या अनेक तरुणांसाठीचे आदर्शच.
१९७२-७३ मध्ये मिलिंद पूर्णपात्रे यांनी बॅडमिंटनचा श्रीगणेशा केला. चाळीसगावसारख्या ठिकाणी त्यांनी आपल्या खेळाची बाराखडी गिरवली. बॅडमिंटन हा तेव्हाच्या काळातसुद्धा श्रीमंतांचाच खेळ. सर्वसामान्य घरात जन्मलेल्या मिलिंद यांनी अगरबत्त्या, उटणे, कॅलेंडर आदी गोष्टी विकून, आपला खर्च सुरू ठेवला. त्यांच्या या क्रीडा शिक्षणाच्या काळात त्यांचे काका भानू सोनवणे, प्राचार्य डी. व्ही. चित्ते यांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. नंतरच्या काळात राष्ट्रीय बॅडमिंटन विजेते आणि शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी असलेल्या अनिल प्रधान यांनीसुद्धा, मिलिंद यांना प्रोत्साहित केले. सुरुवातीला शाळा आणि नंतर महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या स्पर्धांच्या माध्यमातून, मिलिंद यांनी स्वतःची वेगळी छाप सोडली. १९७७-७८ साली प्रथमच त्यांना पुणे विद्यापीठ बॅडमिंटन स्पर्धेत महाविद्यालयाचे प्रतिनिधीत्व करण्याचा मान मिळाला. त्यांच्या या कार्यकर्तृत्वाने लवकरच राज्याच्या सीमा ओलांडल्या. पुणे विद्यापीठ बॅडमिंटन संघाचे कर्णधारपद भूषवत असताना, मिलिंद यांच्या संघाने, ‘ऑल इंडिया इंटर झोनल युनिव्हर्सिटी स्पर्धे’त उपविजेतेपदाला गवसणी घातली. १९७५ ते १९८५ या एका दशकाच्या कालावधीमध्ये, अनेक वेळा मिलिंद यांनी वेगवेगळ्या गटामध्ये एकेरी व दुहेरी विजेतेपद भूषवले. हे सारं शय झाले ते, त्यांच्या दुर्दम्य इच्छाशक्ती आणि कठोर परिश्रमामुळेच. याच दरम्यान क्रीडा क्षेत्रातील उत्तम कामगिरीमुळे ते आयकर विभागात रुजू झाले.
आपल्या उदरनिर्वाहासाठी माणूस कमवता झाला की, हळूहळू त्याचे छंद आवडी-निवडी यांना एक मर्यादा येते, त्याचे प्राधान्यक्रम बदलतात. परंतु, मिलिंद यांनी आपले ध्येय कधीच नजरेआड होऊ दिले नाही. आयकर विभागात काम करतानासुद्धा, त्यांच्या हातातील रॅकेट कधी सुटले नाही. अनेक बॅडमिंटन स्पर्धांमध्ये त्यांनी आयकार खात्याचे प्रतिनिधित्व केले. दरम्यानच्या काळात एका बाजूला बॅडमिंटनचा सराव सातत्याने सुरू होता, तर दुसर्या बाजूला नोकरीसुद्धा. एकाच वेळेला खेळाला आणि नोकरीला वेळ देताना बर्याचदा दमछाक व्हायची; धावपळीमध्ये अर्धा अधिक वेळ जायचा. परंतु, एव्हाना खिलाडू वृत्ती अंगात पूर्णपणे भिनली होती, त्यामुळे सगळ्या कष्टांवर मात करून त्यांनी आपली स्पर्धांमधील घोडदौड सुरूच ठेवली. त्यांच्या याच साधनेचा परमोच्च बिंदू म्हणजे २०१५ हे वर्ष. कारण, यावर्षी त्यांनी स्वीडन येथे पार पडलेल्या ‘वर्ल्ड मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धे’त भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या या कार्यासाठी पुढे २०१६ साली त्यांचा‘खेल सेवा पुरस्कारा’नेही गौरव करण्यात आला. तसेच, २०१७ मध्ये ‘क्रीडा प्रावीण्य पुरस्कारा’ने त्यांना सन्मानित करण्यात आले.
वयाची साठी ओलांडूनसुद्धा मिलिंद पूर्णपात्रे यांच्या भूमिकेमध्ये बदल झालेला नाही. आजसुद्धा ते बॅडमिंटन खेळतात. उलटपक्षी आता प्रशिक्षक म्हणून ते वेगवेगळ्या गटातील मुलामुलींना, बॅडमिंटन शिकवतात. यावेळी प्रशिक्षक म्हणून काम करताना, खेळाच्या माध्यमातून माणसांना जोडण्याचा प्रयत्न ते सातत्याने करततात. त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी २०२४ साली ‘विलेपार्ले संघा’च्यावतीने, त्यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. गंमतीचा भाग म्हणजे त्यांचा खेळ निवृत्तीनंतरसुद्धा थांबलेला नाही, किंबहुना, त्याला अधिकच धार आली आहे. नुकतेच काही महिन्यांपूर्वी ठाणे येथे झालेल्या ‘महाराष्ट्र राज्य मास्टर बॅडमिंटन अजिंक्यपद’स्पर्धेमध्ये, मिलिंद पूर्णपात्रे आणि दिलीप सुखटणकर यांनी दुहेरी राज्य विजेतेपद पटकविले.
क्रीडा क्षेत्रातील समृद्ध अनुभवसंचित गाठीशी असलेले मिलिंद सांगतात की, "शालेय जीवनानंतर मुले करिअरसाठी खेळांचा त्याग करतात किंवा स्पर्धात्मक खेळाची वाट निवडत नाहीत. आपल्याला जर क्रीडाक्षेत्रामध्ये भारताचे नाव उंचवायचे असेल, तर त्यासाठी संस्थात्मक पातळीवर काम होणे गरजेचे आहे. आपल्याकडे एका विशिष्ठ उंचीवर एखादा खेळाडू पोहोचला की, त्याचा गौरव होतो ही चांगलीच बाब आहे. मात्र, अशा खेळाडूंची फळी उभी करायची असेल, तर समाज म्हणून खेळाडूंच्या पाठीशी आपण उभे राहावे लागेल.”
मिलिंद यांच्या व्यक्तिमत्त्वातील वैशिष्ट्य म्हणजे, निरनिराळ्या ठिकाणी प्रवास करून ते माणसं जोडतात. वेगवेगळ्या सांस्कृतिक वर्तुळांमध्ये त्यांनी अनेक माणसं जोडली आहेत. व्यक्तीच्या आयुष्यात त्याने जोडलेली माणसं हेच खरे वैभवसंचित असते, याची त्यांना प्रचिती आली आहे. पाच दशकांहून अधिक काळ बॅडमिंटन खेळणारे मिलिंद त्यांच्या या यशस्वी कारकिर्दीचे रहस्य सांगतात की, आपल्या ध्येयाचे आपल्याला वेड लागायला हवे. सातत्याने त्याचाच विचार करत, आपली ऊर्जा आपण आपल्या ध्येयावर केंद्रित करायला हवी. ध्येयासक्तीसाठी मेहनत करायाला हवी. नवीन पिढीला असा संदेश देणार्या अशा या अवलिया खेळाडूला, त्याच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!