बारामुल्ला येथे निघाली भव्य तिरंगा यात्रा १२ हजारांहून अधिक लोकांनी घेतला सहभाग

    12-Aug-2025   
Total Views |

मुंबई : भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमिवर आणि हर घर तिरंगा अभियानांतर्गन देशभरात विविध ठिकाणी तिरंगा यात्रा आयोजित केल्या जातायत. जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला येथे नुकतीच एक भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. ज्यामध्ये १२ हजारांहून अधिक लोकांनी सहभाग घेतला. जम्मू-काश्मीर एलजी कार्यालयाने तिरंगा यात्रेचा व्हिडिओ आपल्या एक्स अकाऊंटवर पोस्ट केला आहे. साधारण २ किलोमीटर लांबीचा तिरंगा ध्वज हातात घेऊन सर्वजण एकत्रितपणे या यात्रेत चालत होते.

त्याचबरोबर लाल चौकातील घड्याळ मनोरा असलेल्या परिसरातही जम्मू आणि काश्मीर संस्कृती विभागाअंतर्गत तिरंगा सेल्फी पॉइंट उभारण्यात आल्याचे दिसले. याठिकाणी येणाऱ्या अनेक पर्यटकांनी सेल्फी पॉइंटवर फोटो काढण्याचा आनंद लुटला. हे तिरंगा सेल्फी पॉइंट देशभक्तीची भावना व्यक्त करण्याचे एक उत्तम माध्यम असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या समर्थनार्थ फुटीरतावाद्यांच्या रॅलींपासून ते पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धच्या निदर्शनांपर्यंतचा संपूर्ण प्रवास या घड्याळ मनोऱ्याने पाहिला आहे.

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या अध्यक्षतेखाली भव्य तिरंगा यात्रा काढण्यात आली. तिरंगा यात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी स्वागत कमान उभारण्यात आल्या होत्या, जिथे लोक तिरंगा यात्रेवर पुष्पवृष्टी करून स्वागत करत होते. ही तिरंगा यात्रा सिटी सेंटर, गांधी रोड व आकाशवाणी तिराहा मार्गे जात राजमाता विजयाराजे सिंधिया कृषी विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचली.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक