टाम्पा : (Asim Munir issued a nuclear threat to India) ऑपरेशन सिंदूरनंतरही पाकिस्तान सुधारण्याचे चिन्ह नसल्याचेच चित्र वारंवार पाहायला मिळत आहे. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख आणि फिल्ड मार्शल असीम मुनीर यांनी अमेरिकेच्या धरतीवरुन पुन्हा एकदा भारताला अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिली आहे. असीम मुनीर यांनी अमेरिकेतील एका कार्यक्रमात म्हटले आहे की, "जर इस्मालाबादला भारताच्या अस्तित्वापासून धोका उद्भवला, जर आम्ही बुडणार असू तर अर्धे जग आमच्यासोबत घेऊन बुडू", अशी पोकळ धमकीच मुनीर यांनी दिली.
भारताविषयी गरळ ओकून मुनीर यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये झालेल्या नुकसानाचा आणि पराभवाचा राग व्यक्त केला. एखाद्या देशाच्या लष्करप्रमुखाने अमेरिकेतून तिसऱ्या देशाला अण्वस्त्र धमकी देण्याची ही पहिलीच वेळ आहे. अमेरिकेतील व्यापारी आणि मानद वाणिज्यदूत अदनान असद यांनी टाम्पा येथे आयोजित केलेल्या ब्लॅक-टाय डिनरमध्ये मुनीर उपस्थितांना म्हणाले, "आम्ही एक अणुशक्तीसंपन्न राष्ट्र आहोत. जर आपल्याला वाटलं की आम्ही खाली जात आहोत, तर आपण अर्धे जग आपल्यासोबत घेऊन जाऊ."
भारताच्या धरणावर मिसाईल हल्ला करु
भारतासोबतच्या चार दिवसांच्या संघर्षानंतर दोन महिन्यात दुसऱ्यांदा अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या मुनीर यांनी सिंधू पाणी करार स्थगितीवरुन भारतावर निशाणा साधला. ते म्हणाले, "आम्ही भारत (नदीवर) धरण बांधण्याची वाट पाहू आणि जेव्हा ते बांधतील तेव्हा आम्ही ते दहा क्षेपणास्त्रांनी डागून नष्ट करू," असं ते म्हणाले आहेत. "सिंधू नदी ही भारताची कौटुंबिक मालमत्ता नाही. आमच्याकडे क्षेपणास्त्रांची कमतरता नाही", असे मुनीर यांनी म्हटल्याचं समोर आले आहे.
भारत चमचमती मर्सिडीज, पाकिस्तान भंगाराने भरलेला ट्रक...
असीम मुनीर यांनी भारताची तुलना हायवेवर धावणाऱ्या मर्सिडीझशी आणि पाकिस्तानची दगडं भरलेल्या डंप ट्रकशी करत पाकिस्तान कश्याप्रकारे भारताचे नुकसान करु शकतो, हे सांगितले. ते म्हणाले, “परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी मी एक साधे उदाहरण देईन. भारत म्हणजे फरारीप्रमाणे हायवेवरून वेगाने धावणारी चमकणारी मर्सिडीज आहे, पण आपण (पाकिस्तान) कचरा, विटा आणि दगडांनी भरलेला डंप ट्रक आहोत. जर ट्रकने कारला धडक दिली, तर कोणाचं नुकसान होईल?," अशी विचारणा त्यांनी उपहासात्मकपणे केली आहे.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\