मुंबई : "ऋजुता हाडये यांच्या कविता अनघड आहेत, परंतु त्या भावभावना व विचार चिंतनात मुरलेल्या आहेत' असे प्रतिपादन ज्येष्ठ संपादक दिनकर गांगल यांनी केले. दि. ९ ऑगस्ट रोजी ठाण्याच्या दक्षा हॉल येथे सृजनसंवाद प्रकाशनतर्फे संपादक दिनकर गांगल यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. ऋजुता हाडये यांच्या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी ज्येष्ठ लेखक, बालशल्यचिकित्सक डॉ. संजय ओक यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी कवी, संपादक गीतेश शिंदे, कवयित्री, लेखिका प्रा. सुजाता राऊत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कवयित्री डॉ. ऋजूता हाडये यांनी आपल्या मनोगतातून आपल्या कवितेचा प्रवास उलगडून सांगितला. शाळेपासून झालेले भाषेचे संस्कार व मिळालेले प्रोत्साहन, तसेच आजवरच्या जगण्यातील अनुभवातून त्यांची कविता घडत गेली. त्यांच्या प्रवासात ज्यांनी योगदान दिले त्यांचे त्यांनी कृतज्ञतापूर्वक स्मरण केले. गीतेश शिंदे आपले मत व्यक्त करताना म्हणाले की सध्या कवितांचे उदंड पीक येत आहे; मात्र डॉ. ऋजुता हाडये यांची कविता अस्सल आहे. त्यांच्या कवितेत भाषिक सौंदर्य, सहजता आहे म्हणून ती वाचताना आपलीशी वाटते. कवितेवर भाष्य करताना प्रा. सुजाता राऊत म्हणाल्या की डॉ. ऋजुता यांची कविता शब्दसंपन्न आहे, पण ती शब्दबंबाळ नाही. मराठी कवितेच्या परंपरेशी नाते सांगणारी ही कविता आहे, तिला तिचा आत्मस्वर आहे. ती प्रामाणिक आहे. या कवितेत प्रामुख्याने भावसंवेदन दिसते. त्यात सरलता व तरलता आहे हे सांगत संग्रहातील विविध कवितांचे दाखले दिले.डॉ. संजय ओक यांनी ऋजुता यांच्या वैद्यकीय कारकीर्दीचा आढावा घेतला. त्यांची कविता आत्मसंवादी आहे असे ते म्हणाले. ही कविता उत्कट भाव प्रकट करणारी आहे असेही त्यांनी सांगितले. कविता ही आतून येणारी, प्रकटणारी गोष्ट आहे. त्यांच्या कवितेत विविध विषय हाताळले आहेत. वेगवेगळ्या कवितांची उदाहरणे देऊन त्यांनी हे विशद केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध आर. जे. मानसी आमडेकर यांनी केले. काव्य रसिकांच्या उपस्थिीतीमध्ये हा सोहळा उत्साहात संपन्न झाला.
मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.