पाककडून बलुचिस्तानची गळचेपी! इंटरनेट सुविधा ३१ ऑगस्टपर्यंत राहणार बंद

    11-Aug-2025   
Total Views |

मुंबई : बलुचिस्तानात पाकिस्तानकडून होणाऱ्या दडपशाहीचे सत्र अद्याप संपलेले नाही. आता तर पाकिस्तान बलुचिस्तानची गळचेपीदेखील करत असल्याचा आरोप होतोय. सध्या येथील इंटरनेट सुविधा ३१ ऑगस्टपर्यंत बंद करण्यात आली आहे. यामुळे बलुचिस्तानातील शिक्षण, ऑनलाइन व्यापार आणि माध्यमांद्वारे बातमी देण्याच्या प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण झाला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचे पाकिस्तान सरकारचे म्हणणे आहे.

सरकारी प्रवक्त्यांनी असा दावा केलाय की, सशस्त्र गट आपली हालचाल समन्वयित करण्यासाठी इंटरनेटचा वापर करत होते. केंद्र सरकारच्या या निर्णयाची विद्यार्थ्यांनी, व्यापाऱ्यांनी, पत्रकारांनी आणि मानवाधिकार संघटनांनी तीव्र टीका केली आहे. ग्रामीण भागात परिस्थिती आणखी गंभीर आहे. क्वेटा, तुर्बत, पंजगुर आणि खुजदार येथील स्वतंत्र पत्रकार व उद्योजक यांचे म्हणणे आहे की त्यांचा उदरनिर्वाह ठप्प झाला आहे.

मानवाधिकार संघटनांनी याप्रकरणी गंभीर चिंता व्यक्त केली असून इंटरनेट बंदीला नागरी स्वातंत्र्याचे उल्लंघन तसेच नागरिकांच्या शिक्षण, आर्थिक क्रियाकलाप आणि माहिती मिळवण्याच्या मूलभूत हक्कांवर प्रहार असल्याचे म्हटले आहे. स्थानिक राजकीय व सामाजिक संघटनांचे म्हणणे आहे की सुरक्षा वाढवण्याऐवजी सरकार जनतेवर सामूहिक शिक्षा लादत आहे.


ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक