ताण : आधुनिक जीवनाचा अदृश्य साथीदार

    11-Aug-2025
Total Views |

आजच्या काळात ‘ताण’ हा शब्द जवळजवळ प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग झाला आहे. माणसाच्या आयुष्यातील हा सार्वत्रिक अनुभवच. कधी कामाचा ताण, कधी नातेसंबंधांचा ताण, तर कधी केवळ भविष्याची चिंता... हा अनुभव सर्व वयोगटांतील लोकांना कमी-अधिक प्रमाणात येत असतो. पण, ताण म्हणजे नेमके काय? केवळ मानसिक अस्वस्थता की शरीर आणि मनाच्या संतुलनाला आव्हान देणारी एक खोल प्रक्रिया? याविषयी आजच्या लेखात केलेला हा ऊहापोह...

ताण हा आयुष्यातील एखाद्या घडामोडीला प्रतिसाद देताना किंवा कोणत्यातरी अवघड परिस्थितीत कृती करावी लागेल, असे वाटल्यावर शरीर आणि मनात निर्माण होणारी प्रतिक्रिया म्हणजे ताण. अल्पकालीन ताण उपयुक्त ठरतो, आपले लक्ष केंद्रित करतो, प्रेरणा देतो आणि कार्यक्षमता वाढवतो, पण जर हा ताण दीर्घकालीन राहिला किंवा वारंवार झाला, तर तो शरीर, मन आणि सामाजिक नातेसंबंधांवर नकारात्मक परिणाम करू लागतो.

भारतीय तत्त्वज्ञानात ताणाबद्दल वेगवेगळे दृष्टिकोन सापडतात. भगवद्गीतेत ‘समत्व योग उच्यते’ असे सांगितले आहे. म्हणजेच परिस्थिती कितीही प्रतिकूल असली, तरी मनाचे संतुलन टिकवणे ही खरी योगसाधना आहे. आणखी एक महत्त्वाची संकल्पना म्हणजे, सजगता (चळपवर्षीश्रपशीी), जी बौद्ध व ताओ तत्त्वज्ञानासारख्या पूर्वेकडील तत्त्वपरंपरांमध्ये मूळ धरणारी आहे. सजगता ही वर्तमानावर केंद्रित असलेली जागरूकता सूचवते, जी व्यक्तीला तणाव निर्माण करणार्या विचारांपासून आणि भावनांपासून थोडेसे अलिप्त होण्यास मदत करते. बौद्ध तत्त्वज्ञानात तसेही दुःख हे जीवनाचा अविभाज्य भाग मानले गेले आहे, परंतु त्यावर विजय मिळवण्यासाठी त्या विशिष्ट क्षणात जगण्याची कला महत्त्वाची ठरते. या दृष्टिकोनातून पाहता, ताण म्हणजे बाह्य परिस्थिती नव्हे, तर आपण तिला दिलेली मानसिक प्रतिक्रिया. मानस-शरीर यांचा परस्पर संबंध हा तणावावरील तत्त्वचर्चांमधील एक केंद्रबिंदू आहे. सजगतेची सवय लावल्यास, व्यक्ती अधिक शांत, स्पष्ट आणि संतुलित होते, ज्यामुळे ती तणावाला अधिक परिणामकारकरित्या प्रतिसाद देऊ शकते. मानसिक आणि शारीरिक अवस्थांतील परस्पर संवादावर तो भर देतो. तत्त्वज्ञांनी पूर्वीपासूनच हे मान्य केले आहे की, तणाव हा फक्त मानसिक अनुभव नसून त्याचे शरीरावरही ठोस परिणाम होतात. ही जाणीव आपल्याला हे दाखवते की, तणावावर मात करण्यासाठी मानसिक आणि शारीरिक या दोन्ही बाजूंवर लक्ष केंद्रित करणार्या सर्वसमावेशक उपाययोजना आवश्यक आहेत, ज्यामुळे एकूण आरोग्य आणि सुख वाढते.

सामान्य माणसासाठी ताण हा रोजच्या जीवनातील न सुटणारे ओझे आहे. गृहिणींसाठी घरातील जबाबदार्या, विद्यार्थ्यांसाठी परीक्षेचे दडपण, तर नोकरदारांसाठी लक्ष्य गाठण्याची धडपड... प्रत्येकाचा ताण वेगळा. अनेकांना वाटते की, ताण म्हणजे फक्त वाईट भावना, पण वास्तवात ताण कधीकधी प्रेरणादायीही असतो. उदाहरणार्थ, थोडासा ताण आपल्याला सजग ठेवतो, मेहनत करण्यास प्रवृत्त करतो. परंतु, जेव्हा तो सातत्याने व अनियंत्रित प्रमाणात वाढतो, तेव्हा तो मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम करतो. ताणाचा शारीरिक पातळीवरील परिणाम समजून घेणे महत्त्वाचे आहे. एखादी तणावपूर्ण परिस्थिती आली की, शरीरात ‘ड्रेनालिन’ आणि ‘कॉर्टिसॉल’ यांसारखी हार्मोन्स स्रवतात. त्यामुळे हृदयाची गती वाढते, रक्तदाब चढतो, श्वासोच्छ्वास जलद होतो आणि स्नायू ताणले जातात. ही ‘फाईट ऑर फ्लाईट प्रतिक्रिया काही क्षणांसाठी आवश्यक असू शकते, पण जर ती दीर्घकाळ चालू राहिली, तर मात्र ती हानिकारक ठरते. ताण केवळ शारीरिक आरोग्यावरच नाही, तर मानसिक व भावनिक आरोग्यावरही परिणाम करतो. चिडचिड, मूडमध्ये सतत बदल, भीती, नैराश्य, आत्मविश्वास कमी होणे, सामाजिक संपर्क टाळणे, लक्ष केंद्रित करण्यात अडचण, निर्णय घेण्याची क्षमता कमी होणे असे परिणाम दिसतात. मानस-न्यूरो-इम्युनोलॉजी (झीूलहेपर्शीीेर्ळााीपेश्रेसू) या क्षेत्रातील संशोधनात असे दिसून आले आहे की, दीर्घकालीन ताणामुळे मेंदूच्या रसायनशास्त्रात गंभीर बदल होऊन मानसिक आजारांची शयता वाढते.

एखादी घटना (उदा. नोकरी जाणे) ही एक ‘स्टिम्युलस’ असते आणि त्यावर आपली भावनिक व शारीरिक प्रतिक्रिया म्हणजे ‘रिस्पॉन्स’ असतो. हान्स सेल्ये या प्रसिद्ध वैज्ञानिकाने ताणाच्या तीन टप्प्यांचे वर्णन केले आहे. ‘अलार्म स्टेज’ (शरीराची सजग प्रतिक्रिया), ‘रेझिस्टन्स स्टेज’ (ताणाचा सामना करण्याचा टप्पा) आणि ‘एझॉर्शन स्टेज’ (सामर्थ्य संपल्याने शरणागती पत्करणे व थकवा व आजार जाणवणे). या सिद्धांतानुसार, ताण हा शरीर-मनाचा नैसर्गिक प्रतिसाद आहे, परंतु त्याचे दीर्घकाळ टिकणे धोकादायक ठरते.

ताण आपल्या संवादावरही परिणाम करतो. तणावाच्या अवस्थेत आपण लवकर चिडतो, अस्वस्थ होतो, शब्दांवर नियंत्रण राहात नाही किंवा आपण पूर्णपणे गप्प बसतो. अशा वेळी नातेसंबंधांमध्ये तणाव वाढतो आणि आपल्याला मिळणारा आधार कमी होतो. काहीजण ताणामुळे सार्वजनिक बोलणे टाळतात, एकलकोंडे होतात, कारण त्यावेळी त्यांना भीती, थरथर आणि मानसिक पोकळी जाणवते.

आपला ताण कोणत्या गोष्टींमुळे वाढतो, हे ओळखणे हे त्यावर नियंत्रण मिळवण्याचे पहिले पाऊल आहे. प्रत्येक व्यक्तीचे ‘ट्रिगर्स’ वेगळे असू शकतात. नोकरीतील दडपण, अभ्यासातील अडचणी, नातेसंबंधातील तणाव, मोठे जीवनबदल, आरोग्याच्या समस्या, आर्थिक ताण अशा अनेक कारणांनी ताण वाढू शकतो.

ताण हा आपल्या शत्रू किंवा मित्र यांपैकी काहीच नाही; तो फक्त आपल्याला जीवनाच्या गतीची, आपल्या मर्यादांची, आणि आपल्या मानसिक ताकदीची आठवण करून देणारा एक संकेत आहे. ताण टाळणे केवळ अशय आहे, पण त्याच्यासोबत संतुलितपणे राहणे ही एक कला आहे आणि ही कला शिकणारा माणूस केवळ ताणावर विजय मिळवत नाही, तर जीवनाचा खरा आनंदही शोधतो.
(क्रमशः)

डॉ. शुभांगी पारकर