नवी दिल्ली : (KC Venugopal on Air India Flight Emergency Landing) तिरुअनंतपुरम येथून दिल्लीला निघालेल्या एअर इंडियाचे AI2455 या विमानाचे चेन्नईमध्ये इमर्जन्सी लँडिंग करावे लागल्याची माहिती समोर आली आहे. खराब हवामानामुळे विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या संशयामुळे क्रूने हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. या विमानात काँग्रेस नेते के. सी. वेणुगोपाल यांच्यासह अधूर प्रकाश, के. एस. सुरेश, के. राधाकृष्णन आणि रॉबर्ट ब्रुस हे खासदार प्रवास करत होते.
के. सी. वेणुगोपाल काय म्हणाले?
दरम्यान, काँग्रेस खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी या घटनेबद्दल 'एक्स'वरुन माहिती दिली. ते म्हणाले, "एअर इंडियाचे AI2455 विमान तिरुअनंतपुरमहून दिल्लीला जात होते. मी स्वतः विमानात अनेक खासदार आणि शेकडो प्रवाशांसह प्रवास करत होतो. आम्ही ज्या विमानात होतो त्यात प्रचंड प्रमाणात टर्ब्युलन्सचा सामना करावा लागला. त्यानंतर साधारण एक तासाने वैमानिकाने विमानात तांत्रिक बिघाड झाल्याची घोषणा केली आणि विमान चेन्नईत उतरवले."
Air India flight AI 2455 from Trivandrum to Delhi - carrying myself, several MPs, and hundreds of passengers - came frighteningly close to tragedy today.
What began as a delayed departure turned into a harrowing journey. Shortly after take-off, we were hit by unprecedented…
"पहिल्यांदा लँडिंग करत असताना एक धक्कादायक प्रसंग आला होता. कारण समोर आलेल्या माहितीनुसार तिथेच एक दुसरं विमान उपस्थित होतं. त्यामुळे वैमानिकाने तातडीने आमचं विमान लँड होतानाच पुन्हा आकाशाच्या दिशेने फिरवलं. त्यामुळे सगळ्या प्रवाशांचा जीव वाचला. तर दुसऱ्यांदा त्याने व्यवस्थित लँडिंग केले. आमचं नशीब बलवत्तर होतं आणि पायलटने प्रसंगावधान दाखवलं त्यामुळे आमचा जीव वाचला. पण प्रवाशांच्या बाबतीत अशी घटना घडायला नको. मी डीजीसीएला आवाहन करतो की या घटनेची तातडीने चौकशी करा. अशा प्रकारची घटना पुन्हा होता कामा नये यासाठी काळजी घ्या", असेही वेणुगोपाल म्हणाले.
एअर इंडियाने फेटाळला खासदार वेणुगोपाल यांचा दावा
विमान उतरताना हवाईपट्टीवर आधीच एक विमान होतं, असे खासदार वेणुगोपाल यांनी म्हटले होते. मात्र एअर इंडियाने त्यांचा दावा खोडून काढला आहे. धावपट्टीवर आधी कुठलेही विमान नसल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे. तांत्रिक बिघाडामुळे विमान लँड करत आहोत असे वैमानिकाने सांगितले होते. आमचे वैमानिक अशा प्रकारची परिस्थिती हाताळण्यासाठी अत्यंत कुशलपणे कार्यरत आहेत. या उड्डाणाच्या वेळीही वैमानिकाने सावधगिरी बाळगून आणि प्रसंगावधान दाखवत विमान उतरवले. विमान अचानक उतरवण्यात आल्याने प्रवाशांना जो त्रास झाला त्यासाठी आम्ही दिलगीर आहोत असंही एअर इंडियाने म्हटले आहे.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\