गोपीनाथ मुंडेंनी सत्तेशी समझौता न करता संघर्ष करण्याची शिकवण दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ; अंडरवल्डच्या विळख्यातून महाराष्ट्राला बाहेर काढणारे गृहमंत्री

    11-Aug-2025   
Total Views |

लातूर : सत्तेशी समझौता न करता संघर्ष करण्याची शिकवण गोपीनाथ मुंडे यांनी मला दिली आणि मी जीवनभर ती पाळली. ते अंडरवल्डच्या विळख्यातून महाराष्ट्राला बाहेर काढणारे गृहमंत्री होते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवार, १० ऑगस्ट रोजी केले.

लातूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आणि कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मंत्री पंकजा मुंडे, लातूरचे पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आ. धनंजय मुंडे, यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "गोपीनाथ मुंड हे सातत्याने संघर्ष करणारे होते. सामान्य कार्यकर्त्यापासून तर देशाच्या मोठ्या पदापर्यंत त्यांनी केलेली वाटचाल ही त्यांची मेहनत आणि संघर्षातून साकार झाली आहे. अवघ्या ३५ ते ३७ व्या वर्षी ते भाजपचे अध्यक्ष झाले. पक्षाची धूरा सांभाळल्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. त्यांनी मोठे संघटन तयार केले. आज भारतीय जनता पार्टी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष आहे. याचा पायवा ठेवणाऱ्या बोटावर मोजणाऱ्या लोकांपैकी एक नाव गोपीनाथ मुंडे यांचेसुद्धा आहे. त्यांनी वेगवेगळ्या यात्रांच्या माध्यमातून एक मोठा संघर्ष उभा केला. नव्वदीच्या दशकात गोपीनाथरावांना विरोधी पक्षनेते पद मिळाले. महाराष्ट्राच्या राजकारणात विरोधी पक्षनेते कसे असावे याचे उदाहरण देताना पहिले नाव गोपीनाथ मुंडे यांचे येते. तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांना रात्री झोपेतही गोपीनाथजीच दिसायचे."

"अलीकडच्या काळात लोक हवेत बार सोडतात. त्यांच्याकडे काहीच पुरावे नसताना बोलून निघून जातात. दुसऱ्या दिवशी वेगळे बोलतात. अनेकदा माध्यमेसुद्धा त्यांना विचारत नाही. पण गोपीनाथजी असे व्यक्तीमत्व होते ज्यांनी विधानसभेत उभे राहून आरोप केल्यावर कधीच तो आरोप परत घेण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही. समोरच्याचा राजीनामा घेऊनच ते खाली बसले. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणावर त्यांनी काम केले. थेट सभागृहात उभे राहून दाऊदलासुद्धा आव्हान देण्याचे काम ते करायचे. गोपीनाथ मुंडेंनी त्याकाळात एक एक घोटाळे बाहेर काढले आणि महाराष्ट्रात एक वातावरण उभे झाले. १९९५ ला त्याच वातावरणात ते संघर्ष यात्रा घेऊन निघाले आणि उभा महाराष्ट्र ढवळून काढला. एकीकडे गोपीनाथ मुंडे आणि दुसरीकडे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी असे रान पेटवले की, महाराष्ट्रात परिवर्तन घडले आणि पहिल्यांदा महायूतीचे सरकार आले, गोपीनाथ मुंडे हे अंडरवल्डच्या विळख्यातून महाराष्ट्राला बाहेर काढणारे गृहमंत्री होते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांपेक्षाही जास्त लोकांचे समर्थन आणि आशीर्वाद मुंडे साहेबांना मिळायचे. सत्तेशी समझौता न करता संघर्ष करण्याची शिकवण गोपीनाथ मुंडे यांनी मला दिली आणि मी जीवनभर ती पाळली. आम्ही मोदीजींना मुंडे साहेबांना उधारीवर दिले होते. विधानसभा निवडणूक आल्यावर आम्ही त्यांना पुन्हा महाराष्ट्रात आणून मुख्यमंत्री बनवणार होतो. दुर्दैवाने आमचे ते स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही," असे ते म्हणाले.

गोपीनाथजींनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पक्ष वाढवला

"गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पक्ष वाढवला आणि त्यांनी सामाजिक न्यायाची कास कधीही सोडली नाही. त्यांनी ओबीसींची मोट बांधली. ओबीसींचे नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात असताना इतर समाजांचेही त्यांच्याबद्दल तेवढेच प्रेम होते. एखाद्या समाजाचे कल्याण होण्यासाठी दुसऱ्या समाजाचा दुस्वास करण्याची आवश्यकता नाही. आपण सगळे महाराष्ट्राचे कल्याण करण्यासाठी आहोत. त्यामुळे ज्या समजात जो वंचित आहे त्या प्रत्येकाचे कल्याण करण्याची जबाबदारी राज्यकर्त्यांची आहे. गोपीनाथजींनी जीवनभर जोपासलेली ही भावना आजच्या राज्यकर्त्यांनी समजून घेण्याची आवश्यकता आहे. गोपीनाथजींना केंद्रीय मंत्री म्हणून काही दिवसांचाच काळ मिळाला. ते ग्रामविकास विभागाचे मंत्री म्हणून केंद्रात काम करत होते. त्यांना अधिक काळ मिळाला असता तर या देशात एक चमकता तारा म्हणून त्यांना आपण पाहू शकलो असतो. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याचे त्यांचे स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत," असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हा विलक्षण योगायोग


लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्धाटन करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. विलासराव देशमुख यांनीसुद्धा महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि देशाचे मंत्री म्हणून लोकप्रियता मिळवली. गोपीनाथ मुंडे आणि विलासराव देशमुख यांची मैत्री संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे पुन्हा एकदा स्मारकाच्या स्वरुपात हे दोन्ही मित्र आजूबाजूला आले हा विलक्षण योगायोग आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....