मुंबई : समाज आहे, म्हणून सद्भावना आहे. सद्भावना हे स्वस्थ समाजाचे लक्षण आहे. ते आपलेपणातील एक नाते आहे. ते सोशल कॉन्ट्रॅक्ट नाही. समाजात व्यक्ती आणि कुटुंब या दोन्हींचे अस्तित्व असते. समाजाचे साधारण उद्दिष्ट हे धर्मयुक्त जीवन असते. असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केले.
इंदूरच्या स्थानिक ब्रिलियंट कन्व्हेन्शन सेंटर येथे मालवा प्रांतातील प्रांत व राष्ट्रीय स्तरावरील समाजप्रमुखांच्या सामाजिक सद्भाव बैठक संपन्न झाली. त्यावेळेस ते बोलत होते. या बैठकीस मालवा प्रांतातील १११ समाजांचे २८४ समाजप्रमुख उपस्थित होते. त्यांनी आपल्या समाजाच्या जनकल्याण व सेवा कार्यांची माहिती सर्वांसमोर मांडली.
उपस्थितांना संबोधत सरसंघचालक पुढे म्हणाले, माणसाला फक्त शरीर व उपभोगाची वस्तू मानणाऱ्या विचारसरणीने संपूर्ण युरोप उद्ध्वस्त केला आणि आता हीच विचारसरणी भारताच्या कुटुंबव्यवस्थेला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहे. संस्थांना आपल्या नियंत्रणाखाली घेऊन समाज फोडण्यासाठी यांचा जगातील ५०–६० घराण्यांशी गठजोड झाला आहे. यांचा उद्देश भारताच्या बाजारावर कब्जा करणे हा आहे. इंग्लंडमध्ये २०२१ साली झालेल्या ‘डिस्मॅन्टलिंग हिंदुत्व’ या सेमिनारच्या मागे हाच विचार होता.
पुढे ते म्हणाले, "भारतामध्ये धर्म आणि राष्ट्र हे एकच असून त्यासाठी केले जाणारे कार्य हे ईश्वरीय कार्यच आहे. स्वामी दयानंद सरस्वती, स्वामी विवेकानंद यांसारख्या महापुरुषांनी जात-पात विसरून समाजात राष्ट्रभाव जागृत करण्याचे कार्य केले. समाज व कुटुंबासाठी मातृशक्तीचा विचार पुरुषांपेक्षा अधिक व्यापक असतो. आपापल्या क्षेत्रात स्थानिक पातळीवर सर्व जाती-बिरादरींनी एकत्र बसून आपल्या बिरादरीच्या उन्नतीसाठी विचार करावा तसेच दुर्बल समाजाला उंचावण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत. सर्व समाज मिळून राष्ट्र व हिंदू समाजाच्या प्रश्नांचे निराकरण करावे. आपण हिंदू आहोत, प्रत्येक हिंदूचे सुख-दुःख हेच आपले सुख-दुःख आहे."