जेरुसलेम : (Five Al Jazeera journalists killed in Israeli Airstrike) इस्रायलने रविवारी १० ऑगस्ट रोजी रात्री उशीरा गाझा शहरात केलेल्या हवाई हल्ल्यात अल-जझीरा या माध्यम समूहाचे प्रतिनिधी अनस अल शरीफ यांच्यासह चार इतर पत्रकार ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. हा हवाई हल्ला अल-शिफा रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ झाला, जेथे अनेक माध्यम प्रतिनिधी राहत होते. अल-जझीराने दिलेल्या वृत्तानुसार, हॉस्पिटलच्या बाहेर असलेल्या तंबूला लक्ष्य करत झालेल्या हल्ल्यात एकूण सात जणांचा मृत्यू झाला, अशी माहिती शिफा हॉस्पिटलच्या
एका अधिकाऱ्याने दिली.
इस्रायल डिफेन्स फोर्सने काय म्हटलंय?
इस्रायल डिफेन्स फोर्सने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटलंय की, “पत्रकारितेचा बुरखा पांघरुन अनस अल-शरीफ हमासचा एजंट बनून काम करत होता. रॉकेट हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या हमासच्या दहशतवादी सेलचे तो नेतृत्व करत होता आणि इस्रायली नागरिक आणि आयडीएफ सैन्याविरोधात रॉकट हल्ले घडवू आणण्यात त्याचा सहभाग होता. अनस अल-शरीफ पत्रकारितेचा कव्हर म्हणून वापर करत होता.” तसेच रोस्टर, ट्रेनिंग रेकॉर्ड आणि पगाराची कागदपत्रं तो हमाससाठी काम करत असल्याचे सर्व पुरावे असल्याचा दावा इस्रायलने केला आहे.
इस्रायलने केलेल्या याच एअर स्ट्राइकमध्ये करस्पॉन्डट मोहम्मद क्रेइकेह, कॅमेरा ऑपरेटर इब्राहिम झहेर, मोहम्मद नौफल आणि मोअमेन अलिवा तसेच त्यांचा असिस्टंट मोहम्मद नौफल यांच्या मृत्यू झाल्याचे अल-जझीराने सांगितले आहे. इस्रायलच्या हल्ल्यात मृत्यू होण्यापूर्वी अल शरीफ यांनी एक्सवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता, ज्यामध्ये त्यांनी गाझा सिटीच्या पूर्व आणि दक्षिण भागात वाढलेल्या बॉम्बहल्ल्यांबद्दल माहिती दिली होती. या व्हिडीओमध्ये बॉम्बस्फोटांचे आवाज ऐकायला मिळत आहेत.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\