नवी दिल्ली : (Delhi Police detained INDI bloc MPs) काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मतदार यादीतील बनावट मतदारांच्या मुद्द्यावरुन केंद्रीय निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. यावर चर्चा करण्यासाठी आयोगाने काँग्रेससह इतर विरोधी पक्षांच्या ३० सदस्यीय शिष्टमंडळाला बैठकीसाठी बोलावले होते. मात्र, याआधीच इंडी आघाडीतील खासदारांनी निवडणूक आयोगाच्या दिशेने मोर्चा काढला.
या मोर्चात इंडी आघाडीतील २५ घटक पक्ष सहभागी झाले. मल्लिकार्जुन खर्गे, शरद पवार, संजय राऊत, अखिलेश यादव, प्रियांका गांधी आदींसह जवळपास ३०० खासदार मोर्चात सहभागी झाले.
पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. पण ही परवानगी झुगारून खासदारांनी मोर्चा काढला. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर पॅरामिलिट्री फोर्स तैनात करण्यात आली होती. तसेच संपूर्ण कार्यालयाबाहेर बॅरेकेडिंग करण्यात आले होते.
संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत खासदारांनी मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र, पोलिसांनी हा मोर्चा अडवला. संतप्त खासदार बॅरिकेड्सवर चढले. सपा नेते अखिलेश यादवही बॅरिकेडवर चढले. टीएमसी खासदार सागरिका घोष आणि महुआ मोइत्रा या सुद्धा बॅरिकेड्सवर चढल्या. संतप्त झालेल्या खासदारांनी जागेवरच बसून ठिय्या आंदोलन सुरू केले.
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी खासदारांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र, कुणीही ऐकायला तयार नव्हते. अखेर पोलिसांनी राहुल गांधी, प्रियंका गांधी, संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांना ताब्यात घेतले आहे. तृणमूलच्या एका महिला खासदाराची प्रकृती यादरम्यान बिघडल्याची माहिती आहे.