इतिहासावर सुरू असलेल्या वादांची आपल्याला आता सवय झाली आहे. ऐतिहासिक व्यक्तिरेखा, घटनाक्रम, ऐतिहासिक प्रसंगांचे आकलन, अस्मितेचे राजकारण, त्यातून होणारे वाद-प्रतिवाद यांमुळे समाजात सध्या वेगवेगळ्या विषयांवर विचारमंथन सुरू आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. परंतु, जगामध्ये अनेक ठिकाणी मानवाच्या उगमापासून ते संस्कृतीच्या जडणघडणीतील विविध टप्प्यांवर मानवाचा विकास कसा झाला, याविषयी विविध प्रकारचे संशोधन अजूनही सुरू आहे. यामुळे आपल्याला त्या त्या काळातील समाजरचना, जीवनपद्धती या सगळ्या गोष्टींचा उलगडा तर होतोच परंतु, अशा इतिहासशास्त्राला वैज्ञानिकतेची जोड मिळते, तेव्हा वर्तमानातील मनुष्य स्वभावाची आणि त्याच्या भौतिक जीवनाच्या अनेक कांगोर्यांची नव्याने माहिती होते.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा विकास झाला आणि इतिहास संशोधनाला मोठ्या प्रमाणात हातभार लागला. सुरुवातीच्या काळात डेटा गोळा करणे, त्याचे विश्लेषण, त्यातून पुढे संशोधन अशी गुंतागुंतीची प्रक्रिया पार पडल्यानंतरच लोकांपर्यंत हे विषय पोहोचायचे. मात्र, तंत्रज्ञानाच्या विकासाचा वेग, त्या अनुषंगाने बदलणारी समाजरचना या गोष्टींचा प्रभाव इतिहास संशोधनावर पडला आणि संशोधनाच्या कार्यामध्ये आमूलाग्र बदल घडून आला. कृत्रिम बुद्धिमत्तेचा क्षेत्रनिहाय विस्तार करणार्या गुगलसारख्या कंपन्यांचा, आता इतिहास संशोधनाच्या दालनामध्येसुद्धा शिरकाव झाला आहे. रोमन संस्कृती ही जगातल्या अनेक समृद्ध अशा प्राचीन संस्कृतीपैकी एक. आरोग्यव्यवस्था, शिक्षणव्यवस्था यांच्यापासून ते अगदी सार्वजनिक सुव्यवस्थेपर्यंत, रोमन संस्कृतीने अनेक आदर्श घालून दिले. तत्कालीन शिलालेखांच्या माध्यमातून आपल्याला, रोमन संस्कृतीच्या इतिहासाचे दर्शन घडते. मात्र, ज्या शिलालेखांनी इतया शतकांचा प्रवास केला, त्यांचे आकलन व अभ्यास ही गोष्ट साधीसोपी नाही. शिलालेखांमध्ये असलेली लिपी, भाषा, संस्कृती याचा समग्र विचार करूनच, त्या काळाचे योग्य ते आकलन आपल्याला होते. इथेच इतिहास संशोधकांच्या मदतीला धावून येतं गूगल डीपमाईंडचे ‘एनियास.’
या ‘एआय’ टूलला, ग्रीक-रोमन पुराणकथांमधील नायकावर आधारित नाव ठेवण्यात आले आहे. ‘नॉटिंगहॅम विद्यापीठा’च्या डॉ. थिया सोमरशिल्ड यांनी तंत्रज्ञांच्या साहाय्याने, हे टूल तयार केले. यावेळी सदर सॉफ्टवेअरची माहिती देताना त्या म्हणाल्या की, "एनियास’च्या माध्यमातून, इतिहासकारांना खंडित लॅटिन मजकुराचे अर्थ लावण्यास आणि शिलालेखातील मजकूर एकत्रित करण्यास मदत होईल. शिलालेख उलगडताना प्रामुख्याने या आव्हानाला आम्हाला तोंड द्यावे लागले, त्यामुळे सदर ‘एआय’ टूलच्या माध्यमातून आमचे कार्य सोपे होऊ शकते.”
आजमितीलासुद्धा शिलालेख हे प्राचीन संस्कृतीच्या अभ्यासाचे महत्त्वाचे साधन आहे. राजाचे आदेश असो वा तत्त्कालीन बुद्धिवंतांनी मांडलेले विचार, या सगळ्याची माहिती आपल्याला या शिलालेखाच्या माध्यमातून मिळते. रोमन संस्कृतीच्या पाऊलखुणा इतया प्राचीन आहेत की, काही अभ्यासकांच्या मते प्रतिवर्षी किमान १ हजार, ५०० नवे शिलालेख आपल्याला सापडतात. सोमरशिल्ड यांच्या मते, शिलालेखांच्या अभ्यासावरून असे लक्षात येते की, या शिलालेखांवर समाजातील वेगवेगळ्या वर्गांच्या अभिव्यक्तीचे प्रतिबिंब बघायला मिळते. यानिस असाएल या तंत्रज्ञाच्या नेतृत्वात, गूगलमधील एका चमूने ‘एनियास’ची निर्मिती केली. दोन लाखांहून अधिक शिलालेखांच्या प्रारूपांचा अभ्यास करून, वेगवेगळे संदर्भ संकेत ‘एआय’ टूलला शिकवले गेले. आतापर्यंत २३ इतिहासकारांनी ‘एनियास’ या ‘एआय’ टूलचा वापर केला आहे. प्रामुख्याने लॅटिन शिलालेखांच्या विश्लेषणासाठी या टूलचा वापर करण्यात असून, सदर अभ्यासकांनी या ‘एआय’ टूलच्या उपयुक्ततेबद्दल समाधान व्यक्त केले. येणार्या काळात इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात तरी, या ‘एआय’ टूलमुळे तळापासून बदल घडेल यात शंका नाही.
इतिहासलेखन, संशोधनाच्या परिप्रेक्ष्यात होणारे नवनवीन प्रयोग, यामुळे इतिहासाच्या कक्षा दिवसेंदिवस रुंदावत आहेत. यामुळे परिवर्तनाची एक वेगळी दिशा आपल्याला गवसते. जिथे संस्कृतीचा केवळ गौरवच नसतो, तर एक सजग नागरिक म्हणून संयुक्तिक आकलनसुद्धा असते. इतिहास आपल्यासमोर अनेक कोडी वेळोवेळी टाकत असते, त्यामुळे येणार्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने अशी अनेक कोडी सुटतील असे वाटते.