नवी दिल्ली : (Anand Sharma Resigns As Chairman Of Congress Foreign Affairs Department) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनी रविवारी दि. १० ऑगस्ट रोजी पक्षाच्या परराष्ट्र व्यवहार विभागाच्या (DFC) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आनंद शर्मा यांनी पक्षाची पुनर्रचना व्हावी आणि या पदावर तरुण नेत्याची निवड व्हावी, त्यासाठी आपण हे पद सोडत असल्याचे म्हटले आहे. माजी केंद्रीय मंत्री राहिलेले शर्मा प्रदीर्घ काळापासून या पदावर कार्यरत होते. मात्र आता त्यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पक्षाच्या परराष्ट्र व्यवहार विभागाच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसला नवा चेहरा शोधावा लागणार आहे.
आनंद शर्मा यांनी काय म्हटलंय?
आनंद शर्मा यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना राजीनाम्याचे पत्र लिहिले आहे. यात आनंद शर्मा यांनी म्हटले की, "मी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे अध्यक्ष या दोघांनाही आधी सांगितले आहे की, माझ्या मते समितीची पुनर्रचना करावी जेणेकरून चांगली क्षमता असलेल्या तरुण नेत्यांना त्यात समाविष्ट करता येईल. यामुळे समितीच्या कामकाजात सातत्य राहील. पुढे लिहिताना शर्मा यांनी पक्ष नेतृत्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. गेल्या काही दशकांमध्ये समितीने आशिया, आफ्रिका, मध्य पूर्व, युरोप आणि लॅटिन अमेरिकेतील प्रमुख राजकीय पक्षांसोबत काँग्रेसचे संबंध मजबूत केले आहेत. परराष्ट्र व्यवहार विभागाने काँग्रेस विचारसरणीचे राजकीय पक्ष आणि आंतरराष्ट्रीय संघटनांसोबत चांगले संबंध प्रस्थापित केले आहेत. याचा मोठा फायदा पक्षाला झाला आहे.
आनंद शर्मा हे काँग्रेस कार्यकारिणी समिती (CWC) चे सदस्य आहेत. ही पक्षाची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था आहे. तसेच शर्मा हे जवळजवळ चार दशकांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर काँग्रेसचे प्रतिनिधित्व करत आहेत. अलिकडेच ऑपरेशन सिंदूरनंतर भारताची भूमिका मांडण्यासाठी परदेशात गेलेल्या सर्वपक्षीय संसदीय शिष्टमंडळांचे ते सदस्य देखील होते. शर्मा यांनी भारत-अमेरिका यांच्यातील अणु कराराच्या वाटाघाटींमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी अणु पुरवठादार गट (NSG) मध्ये भारताला सूट मिळावी यासाठी प्रयत्न केले होते. तसेच त्यांनी पहिले भारत-आफ्रिका शिखर परिषदेचे आयोजन केले होते. ते देशाचे वाणिज्य मंत्री देखील होते. त्यांच्या कार्यकाळात पहिला जागतिक व्यापार संघटनेचा करार आणि व्यापक व्यापार करार झाला होता.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\