एनसीपीएच्या मंचावर नव्याने उलगडली 'सीतेची' गोष्ट !

    10-Aug-2025   
Total Views |

मुंबई,  एनसीपीएच्या " पेज टू स्टेज " या उपक्रमाच्या अंतर्गत दि. ९ ऑगस्ट रोजी जेष्ठ लेखिका, अरुणाताई ढेरे यांच्या " सीतेची गोष्ट " या कथेच्या अभिवाचनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ज्येष्ठ लेखिका वंदना बोकील कुलकर्णी यांनी हे अभिवाचन सादर केले. सीतेच्या व्यक्तिमत्त्वाचा भावस्पर्शी वेध घेणाऱ्या या कथेला प्रेक्षकांनी दाद दिली. याप्रसंगी कथेचे अभिवाचन केल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना वंदना बोकील कुलकर्णी म्हणाल्या की " अरुणा ताईंनी लिहिलेली ही कथा वाचणे, ती सादर करणे ही अत्यंत वेगळी अनुभूती असते. अरुणाताईंच्या लिखाणामुळे रामकथेचं एक वेगळं अर्थनिर्णयन आपल्या समोर सादर होतं. साहित्याच्या अंगाने सांगितलेली सीतेची गोष्ट, एक वेगळा दृष्टिकोन आपल्याला प्रदान करते." आपले मनोगत व्यक्त करताना अरुणाताई म्हणाल्या की " भारतभर भ्रमंती करताना मला असं लक्षात आलं की या देशातल्या स्त्रियांनी वेगवेगळ्या स्वरूपात सीतेच्या आठवणी जपून ठेवले आहेत. सोशिक, क्षमाशील तरीही निग्रही अशा सीतेचं रूप आपल्याला बघायला मिळतं. लोकपरंपरेतील ओव्यांचा माध्यमातून सीतेची गोष्ट शतकानो शतकं सांगितली गेली आहे. सीता म्हणजे एकाअर्थी भारतीय स्त्रीचा चेहरा आहे असच आपल्याला जाणवतं."


मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.