आम्ही माणूस नाही का?

    10-Aug-2025   
Total Views |

यंदाच्या रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला दि. ८ ऑगस्ट रोजी दै. ‘मुंबई तरुण भारत’ने किन्नर भगिनींसोबत रक्षाबंधन साजरे केले. त्यारवेळी मोठ्या संख्येने किन्नर भगिनी जमल्या होत्या. कार्यक्रमात या भगिनींनी मनमोकळेपणाने त्यांचे विचार मांडले. त्यांचे विचार ऐकून आणि त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर मनात वादळ निर्माण झाले. आम्ही माणूस नाही आहोत का? हा प्रश्न सलत आहे. त्या अनुषंगाने किन्नर भगिनींच्या जीवनाचा घेतलेला मागोवा...

‘मुंबई तरुण भारत’ने किन्नर भगिनींसोबत रक्षाबंधन साजरे केले. त्यावेळी जमलेल्या सर्व किन्नर भगिनींना पाहून, मला पूर्वी भेटलेल्या त्या दोन किन्नर भगिनी आठवल्या, अत्यंत आक्रमक. त्यांच्याशी संवाद साधला होता. त्यातली एक म्हणाली, "मी उत्तर प्रदेशमधून आले. माझ्या घरी आईला माहिती होते मी किन्नर आहे पण, लोकांना कळले तर काय होईल, या भीतीने आईने ही गोष्ट सगळ्यांपासून लपवली. हे लपवण्यासाठी माझ्यावर खूप बंधने आली. घराबाहेर पडूही दिले जात नव्हते. माझे बालपण, किशोरवय, तरुणपण साचून राहिले. आई म्हणत, असे तुझे लग्न झाले की सगळे ठीक होईल. काही वर्षांनी माझ्यासाठी स्थळही पाहण्यास सुरुवात झाली. सुंदर चेहरा असल्याने, माझे लग्नही झाले. पण, पतीला पहिल्याच रात्री कळले की मी किन्नर आहे. त्याने मला खूप मारले. मारत मारत माहेरी आणले. सगळा गाव गोळा झाला, तो शिव्या देत होता. तो ओरडून सांगत होता की, ’ही मुलगी नाही ** आहे.’ त्याचे म्हणणे ऐकून सगळा गाव स्तब्ध झाला. आईला हे सहन झाले नाही. आता माझे कसे होणार, ही भीती तिला वाटली. तिने घरात स्वतःला पेटवून घेतले आणि आगीने वेढलेली आई माझ्या नवर्याला ओरडून सांगत होती, हीची चूक नाही. तिला सोडू नका.” हे सांगताना ती किन्नर भगिनी रडत होती. पुढे ती म्हणाली, "त्यानंतर जे घडले त्याला शब्द नाहीत. गावातले अनेकजण जे मला दीदी म्हणून आदर द्यायचे, तेसुद्धा माझ्याशी लगट करण्याचा प्रयत्न करू लागले. मी स्त्री नाही किन्नर आहे, हे समजताच त्यांची सगळी नाती संपली!” तर दुसर्या किन्नर भगिनीची व्यथाही अशीच. ती मुंबई शहरात येऊन, एक आठवडाच झाला होता. दिसायला नाजूक सुंदर जणू परीच पण, ती खूप आजारी होती. तिला अंथरूणातून उठताही येत नव्हते. तिने सांगितले, "माझ्या घरचे खूप चांगले होते.” शाळेच्या माध्यमिक वर्गात असताना तिचे आणि एका मुलाचे प्रेम झाले. मानसिक पातळीवरून शारीरिक संबंधापर्यंत प्रेम पोहोचले. त्याच क्षणी त्या मुलाला आणि तिलाही कळले की, ती स्त्री नाही ती किन्नर आहे. मानसिक धक्क्याने ती कोलमडली. स्वतःला सावरत ती उठली मात्र, ज्याच्यावर तिने जिवापाड प्रेम केले होते, त्याने त्याच्या चारपाच मित्रांना फोन करून बोलावले आणि सांगितले की, हिने मला फसवले, तिला धडा शिकवायचा. त्या पाच-सहाजणांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तिला तिथेच सोडून ते पसार झाले. ती गावात येईपर्यंत सगळ्यांना माहीत झाले होते की, ती मुलगी नाही किन्नर आहे. घराचे दरवाजे बंद झाले आणि गावात राहणेही मुश्किल झाले. ती मुंबईत आली, तिकिटासाठीही पैसे नव्हतेच. ती ट्रेनमध्ये बसली, विनातिकीट प्रवास करते म्हणून टिसीने पकडले. पुढे तुरुंगात टाकले गेले पण, ती किन्नर होती म्हणून तिला स्त्रियांच्या नाही, तर पुरुषांच्या सोबत तुरुंगात डांबले गेले. त्या दोन दिवसांत तिच्यावर मानसिक आणि शारीरिक आघात झाले. तिने पोलिसांकडे तक्रार केली, तर त्यांचे म्हणणे, "तुला पुरुषांपासून धोका असायला तू काय बाईमाणूस आहेस का? तुला काय हे सगळं जुनंच आहे.” त्या दोन दिवसांत तिच्यासोबत भिकारी, चोर, नशेडी, गर्दुले सारे होते. तिला लैंगिक आजार झाला आहे. ती काय करणार? ती देहव्रिकी करत नव्हती. पण, तरीही तिच्यावर ते लादले गेले होते. त्या दोन किन्नर भगिनींच्या व्यथा आठवून जीव कासावीस होत होता.

दै ‘मुंबई तरुण भारत’च्या कार्यालयात रक्षाबंधनासाठी आलेल्या किन्नर भगिनींचे जीवन कसे असेल? त्यांच्याशीही संवाद साधला, तर ‘एमएसडब्लू’ म्हणजे समाजकार्याचे पदव्युत्तर शिक्षण घेणार्या रितू कसबे म्हणाल्या, "संविधानातील आरक्षण जातीवरून आहे, मी बौद्ध आहे. जातीने मला आरक्षण आहे पण, त्याचा मला उपयोग नाही. मला वाटते, किन्नरांसाठी वेगळे आरक्षण हवे. त्यांचे म्हणणे आरक्षण हे संधी नाकारलेल्या, पीडित-शोषितांसाठी आहे. मग किन्नर तर वंचितातील वंचितांपेक्षाही वंचित आहेत. शोषित आणि जणू काही शापितही आहे. जन्मच दुःख, वेदना, अपमान करण्यासाठी आहे का? आम्हा किन्नरांसाठी स्वतंत्र आरक्षण असायला हवे.” उच्चशिक्षित रितू यांच्या डोळ्यात वेदना स्पष्ट जाणवत होती. त्या असे म्हणत होत्या कारण, त्यांनी भोगलेल्या समस्या त्रास आणि त्यांना नाकारल्या गेलेल्या संधी. दहा वर्षांपूर्वीची गोष्ट. त्या चांगल्या घरच्या होत्या मात्र, एकवेळ अशी आणली गेली की, त्यांना घराबाहेर पडावे लागले. जीविकेसाठी त्या घरोघरी मागायला जाऊ लागल्या. पण एक दिवशी भयंकर अनुभव आला. एका घरात मागताना तिथले लोक भिकारी, तृतीयपंथीसंदर्भात जे काही तुच्छतेने बोलता येईल, ते ते त्यांना बोलले. त्यांना रडू कोसळले कारण, त्या काही भिकारी नव्हत्या. त्या बारावीपर्यंत शिकलेल्या होत्या. कुणी काम दिले असते, तर त्यांनी आनंदाने केलेही असते. जगण्याचा पर्याय नसल्याने त्यांनी हा मार्ग निवडला होता. त्या रडल्या, नैराश्यात गेल्या. सूर्योदय होण्याआधी रात्र तेजित असते तसेच, त्यांच्यासाठी हे दिवस होते. नैराश्यातच त्यांच्या मनात आले, बस झाले हे जगणे. याच निश्चयाने त्यांनी अत्यंत खडतर जीवन जगत पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. नंतर त्यांनी पोलीस भरतीचा अर्ज भरला पण, पोलीस भरतीमध्ये अर्ज करताना, स्त्री आणि पुरुष हे दोनच कॉलम होते. पुढे मोठा संघर्ष केल्यानंतर, पोलीस भरती अर्जामध्येही तृतीयपंथी कॉलम आला. त्यांनी आणि त्यांच्यासोबतच्या ७१ किन्नर भगिनींनी अर्ज केला मात्र, त्यानंतर परीक्षा तीनच दिवसात होती. स्त्री आणि पुरुषांनी पोलीस भरतीसाठी अनेक महिने अभ्यास केला होता मात्र, तृतीयपंथीही पोलीस भरतीत सहभागी होऊ शकतात हे कळून, त्यांच्यासह ७२ जणींना तीनच दिवस झाले आणि तिसर्याच दिवशी परीक्षा होती. त्यामुळे त्यांचा अभ्यास त्या स्त्री पुरुषांच्या तुलनेत कमी झाला. त्यातच किन्नर म्हणून अर्ज भरल्यानंतरही, या ७२ जणींना महिलांच्या यादीतच समाविष्ट करण्यात आले. त्यामुळे या ७२ जणींना पोलीस भरतीत स्थान मिळालेच नाही. पुढे रितू यांनी तहसीलदाराची परीक्षा दिली. यावेळीही समोर सगळे स्त्री पुरुषच उमेदवार होते. त्यांचा अभ्यास त्यांच्या शैक्षणिक सुविधा आणि वातावरण यापासून रितू या कोसो दूर होत्या. त्यांना २०० पैकी तिला १०६ गुण मिळाले पण, त्या तहसीलदारपदासाठी पात्र ठरल्या नाहीत. खरे तर मुंबईमधून त्या एकमेव तृतीयपंथी उमेदवार होत्या, ज्यांनी तहसीलदारपदाची परीक्षा दिली होती. रितू यांच्यासारख्या अनेक किन्नर आहेत, ज्यांना समाजाच्या प्रवाहात यायचे आहे पण, आधीच बनवलेले कायदे, तरतुदी, समज, गैरसमज यामुळे त्यांच्या यशाचे मार्ग खुंटलेले आहेत. रितू म्हणतात त्याप्रमाणे जर खरंच किन्नरांसाठी आरक्षणाची तरतूद झाली तर? अर्थात आजकाल सगळ्यांनाच आरक्षण हवे असते. यात किन्नरांनीही आरक्षणाची मागणी केली, तर ती कशी पूर्ण करता येईल? असा प्रश्न आहेच. पण, संविधानाचे सूत्र आहे, ‘राईट टू लिव्ह.’ किन्नरांना उच्चसंधी मिळण्याआधीचे माणूस म्हणून जगण्यासाठी आरक्षण उपयोगी पडेल असे वाटते.

सुधा पुजारी या किन्नर भगिनी कळवा येथील रुग्णालयात, किन्नरसमूहांसाठीच्या विशेष कक्षात समुपदेशक म्हणून काम करतात. त्याचबरोबर त्या पहिल्या किन्नर रिक्षाचालकही आहेत. त्या विचारतात, "तुम्ही कधी पाहिले आहे का की, बसमध्ये किंवा रेल्वेमध्ये एखादी किन्नर प्रवास करत आहे? रेल्वेमध्ये मागणारे दिसतील; पण प्रवास करणारे दिसणार नाहीत. प्रवास करताना दिसले, तरी घोळक्याने आणि रेल्वेच्या दरवाज्यात उभे राहिलेले. असे का? या प्रश्नाचे उत्तर आहे की, पुरुषांसाठी असलेल्या रेल्वे डब्यात ते बसू शकत नाहीत आणि स्त्रियांच्या डब्यातही बसू शकत नाहीत. दरवाज्यात उभे राहण्याशिवाय पर्याय नसतो. चुकून ते सीटवर बसले, तरी इतर लोक घाबरून किंवा अगदी किळस येऊनही दूर होतात. समाजात लिंगभेदापलीकडे जाऊन समानता आली आहे, असे म्हटले जाते. मी तर म्हणते की, बस आणि रेल्वेसारख्या सार्वजनिक वाहनांमध्ये किन्नरांसाठीही आरक्षित असलेली सीट असावी. आम्हीही बस आणि रेल्वेमध्ये सन्मानाने प्रवास करू. आमच्या आरोग्य सुविधेबद्दल तर न बोलले बरे पण, आता कुठे आशेचा किरण निर्माण होत आहे.”

तर जान्हवी गोस्वामी म्हणाल्या, "किन्नर असलो म्हणून काय झाले, मी धार्मिक हिंदू आहे. मी भक्तिभावाने पुजा-अर्चा करते. इंदूरमध्ये हिंदू किन्नरांवर धर्मांतरण करण्याची सक्ती झाल्याची घटना माहितीच आहे. आपल्या इथे काय सुरू आहे, याकडे हिंदू समाजाचे लक्ष आहे का? तसेच, आम्ही माणूस नाही का? इतर सगळ्या माणसांना ज्या भावभावना, संवेदना असतात, त्या किन्नरांनाही असतातच ना? आम्हाला कायद्याने सगळे हक्क दिले पण, त्या हक्कानुसार आम्हाला जगता येते का? आम्ही किन्नर म्हणून जन्मलो, यात आमचा काय गुन्हा? आम्ही धर्मकर्म मानतो, संस्कार मानतो. दया, माया, प्रेम आम्हालाही या भावना आहेत. पण, आयुष्यभर या सगळ्या भावना चिरडल्या जातात. आम्ही माणूस नाहीत का?”

असो, तहसीलदार होण्याची इच्छा असलेल्या रितू कसबे, किन्नरांसाठी आरोग्य क्षेत्रात काम करणार्या सुधा पुजारी तसेच, किन्नरांना मानवी हक्क मिळावेत यासाठी कार्य करणार्या जान्हवी गोस्वामी या तिघींशीही संवाद साधल्यानंतर वाटले की, किन्नर समाज, धर्मकर्म, देश संकल्पना मानत, सकारात्मक जीवन जगण्यासाठी प्रयत्नशील आहेत. प्रश्न आहे तो इतर उर्वरित समाजाचा! या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारने समाजातील शोषित-वंचित गटासाठी अनेक कल्याणकारी योजना आखल्या आहेत. घरकुल असू देत की, शिक्षण-आरोग्यासाठी असू देत. या सगळ्या योजनांचा लाभ यांना मिळायलाच हवा. नरेंद्र मोदी पंतप्रधान असताना आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना, हे सगळे लाभ या किन्नर भगिनींना पुढे मागे मिळतीलही. पण, योजनांचा लाभ होणे, भौतिक सुविधा प्राप्त होणे म्हणजेच, काही माणसांच्या जगण्याचे मापदंड नाहीतच. जोपर्यंत किन्नरांना माणूस म्हणून समाजात सर्वच स्तरावर वावरता येत नाही, स्वाभिमान आणि सन्मानाने जगता येत नाही तोपर्यंत सारे व्यर्थ आहे.

आम्ही माणूस नाही आहोत का? हा त्यांचा प्रश्न समाजासाठी आहे. समाज म्हणजे तरी कोण? तुम्ही आणि आम्हीच? आपण त्यांना सोबत घेऊन जाण्यास तयार आहोत का? हा दुरावा कधी आणि कसा मिटेल? याबाबत रा. स्व. संघ, ‘सेवा भारती’ने पुढाकार घेतला आहे. पण, तरीसुद्धा याबाबत सकल समाजात जागरण होणे गरजेचे आहे. कारण, विश्वशक्ती म्हणून भारत विकसित होताना, समाजातील हा एक मोठा गट सोडून कसे चालेल? सगळ्यात मुख्य म्हणजे तेही माणूस आहेत, हे विसरून कसे चालेल?

योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.