आस्थाची बहुगुणी झेप

    10-Aug-2025   
Total Views |

खेळासोबतच कला क्षेत्रातही आपल्या नावाची मोहोर उमटवणाऱ्या कल्याणमधील स्केटर आस्था प्रकाश नायकर हिच्याविषयी...

आस्था हिचा जन्म दि. ७ ऑटोबर २००९ रोजी झाला. तिचे शालेय शिक्षण कल्याणच्या ’लोक कल्याण पब्लिक स्कूल’मध्ये झाले. शालेय जीवनातच तिने विविध कलांचा अभ्यास केला. तिला स्केटिंग व चित्रकला या कलांशिवाय गायनाचीही आवड आहे. तिने स्केटिंग, गायन, भरतनाट्यम्, स्विमिंग आणि चित्रकला या कलागुणांमध्ये प्रावीण्य मिळविले आहे. आस्थाला तिची आई सुप्रिया आणि वडील प्रकाश यांचा भक्कम पाठिंबा लाभला आहे. सुप्रिया लहानपणापासूनच क्रीडाक्षेत्रामध्ये सक्रिय होत्या. त्यांचाच वारसा आता त्यांची कन्या आस्था चालवत आहे.

आस्थाने अडीच वर्षांची असतानाच पहिल्यांदा पायात स्केटिंगचे ‘क्वाड’ घातले. तिचे पहिले गुरू मोहित बजाज यांनी, तिच्यावर प्रचंड मेहनत घेतली आहे. आस्थाने वयाच्या पाचव्या वर्षीच ‘गिनीस वर्ल्ड रेकार्ड’मध्ये आपल्या नावाची मोहोर उमटवली. ‘वेद अॅकेडमी’च्या संकेत ओक व मधुरा ओक यांच्या मार्गदर्शनाखाली, विविध एकपात्री नाटकांमध्ये सहभागी होऊन प्रथम येण्याचा मानही आस्थाने मिळवला आहे. ओडिशा येथे झालेल्या एकपात्री नाटकामध्ये ‘चॅअरपरसन अॅवॉर्ड’ तसेच, पुर्ण ग्रुपच्या नाटकाला राष्ट्रीय स्तरवरचे प्रथम पारितोषिक मिळाले. यामध्ये तिला दिपाली काळे यांचे मोलाचे मार्गदर्शनही लाभले. आस्थाने आजवर, कधीही स्केटिंगचा सराव चुकवला नाही. तिची मेहनत, चिकाटी आणि जिद्द यामुळेच तिला २०१७ मध्ये, ‘आदर्श डोंबिवलीकर पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले. आस्थाने आतापर्यंत ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड’, ‘लिमका बुक ऑफ रेकॉर्ड’, ‘चिल्ड्रेन बुक ऑफ रेकॉर्ड’ अशा विविध रेकॉर्ड्समध्ये आपले नाव नोंदविले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या एलिमेंटरी व इंटरमिजेट परीक्षेतही ती ‘ए’ श्रेणीने उत्तीर्ण झाली. इयत्ता तिसरीमध्ये झलाईन स्केटिंग प्रकारात, ’महाराष्ट्र शासन युवा केंद्र संचालनालय’ यांच्यातर्फे कल्याण डोंबिवलीचे प्रतिनिधित्वही तिने केले. आस्थाने तिसरी ते दहावी याकाळातच महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक स्पर्धेत तालुकास्तर, विभागस्तर, जिल्हास्तर, व राज्य, राष्ट्रीय स्तरावरही चमक दाखवली. आस्थाने मुलांमध्ये भारतीय सैन्याबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने २०१७ साली, ५१ तास स्केटिंग करण्याचाही विश्वविक्रम केला. तिच्या या विक्रमाची नोंदही ‘ग्लोबल रेकॉर्ड’, ‘इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड’, ‘इंडियन अर्चिव्हस रेकॉर्ड’, ‘एशिया बुस ऑफ रेकॉर्ड’, ‘चिल्ड्रेन्स रेकॉर्ड’मध्ये करण्यात आली होती. २०१८ साली तिने ७२ तास ‘खेलो इंडिया मल्टी अॅक्टिव्हिटी स्केटिंग मॅरेथॉन’मध्ये सहभाग घेतला होता. त्यामध्ये तिने महाराष्ट्र शासन (क्रीडा व युवक सेवा संचालय) महाराष्ट्र राज्य पुणे २०१८-१९चा स्केटिंगमधला द्वितीय क्रमांक, महाराष्ट्र शासन (क्रीडा व युवक सेवा संचालय) महाराष्ट्र राज्य पुणे २०१९-२०चा द्वितीय क्रमांक पटकवला.जयपूर येथे झालेल्या ‘रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया’च्या राष्ट्रीय स्पर्धांमध्येही तिने रौप्यपदक मिळवले तसेच, रांची येथे झालेल्या १७ वर्षे वयोगटाखालील स्पर्धांमध्येही सुवर्णपदकांची कमाई आस्थाने केली. २०२४ साली बेल्जिअम येथे झालेल्या जागतिक स्केटिंग स्पर्धा ग्रॅण्ड प्रिस्स स्पर्धेमध्ये निवड होऊन, आस्थाला ११व्या स्थानकांवर समाधान मानावे लागले.

आस्थाने गुरू मंजिरी सावंत-तेरसे यांच्याकडून प्रशिक्षण घेऊन, गंधर्व महाविद्यालयाच्या शास्त्रीय संगीताच्या तीन परीक्षा व सुगम संगीतच्या चार परीक्षा दिल्या असून, या सर्व परीक्षांमध्ये आस्था प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाली आहे. आस्था अभ्यासाबरोबरच विविध कलागुण आत्मसात करू शकली, यात तिच्या शाळेचा मोठा वाटा होता. वेळोवेळी शाळेच्या प्राचार्या लीनाकुमारी, क्रीडा शिक्षक संजय वाघ यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन आस्थाला मिळाले. स्केटिंगमध्ये आस्थाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय झेप मारली, यामागे इंडिया स्केटचे पुष्पेंद्र सिंग व कल्याणचे पवन ठाकूर, अविनाश ऊंबासे यांचे उत्तम मार्गदर्शन होते. आस्थाच्या पाठीशी कल्याण-डोंबिवलीमधील सर्व क्रीडा शिक्षकांचाही मोलाचा आशीर्वाद लाभला आहे. राज्यक्रीडा पुरस्कार विजेते अंकुर आहेर व कल्याण क्रीडा तालुका समिती अध्यक्ष लक्ष्मण इंगळे यांचेही अमुल्य मार्गदर्शन, वेळोवेळी आस्थाला लाभले. आस्थाने नृत्यासह नाट्यस्पर्धेतही अनेक पारितोषिके पटकावली. आस्थाने लोकनृत्यामध्ये, राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेमध्ये तिसर्या क्रमांकाचे पारितोषिकही मिळविले आहे. तसेच मोनो डान्समध्ये ‘चेअरमन अॅवॉर्ड्स’ही तिने पटकावला. आथाला नाटकातही प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. ’भारत संस्कृती दर्पण नाट्य’ आणि ’नृत्य महोत्सव’ातही आस्था सहभागी झाली होती. येत्या काळात भारताचे प्रतिनिधित्व करत आशियाई स्पर्धा तसेच, ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्याचा तिचा मानस आहे. स्केटिंगचा सर्वांत मोठा ट्रॅक हा विरार येथे आहे. तसाच ट्रॅक कल्याण-डोंबिवलीमध्येही व्हावा, असे आस्थाला वाटते. अशा या हरहुन्नर खेळाडू आणि कलाकाराला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!