समर्पण भावनेतून उभा राहिलेला चित्रपट ‘डॉ. हेडगेवार’

    01-Aug-2025   
Total Views |

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आद्य सरसंघचालक प. पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या जीवनावर आधारित ‘डॉ. हेडगेवार’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. चित्रपटाचा प्रीमियर सन सिटी सिनेमा, विलेपार्ले येथे शुक्रवारी संपन्न झाला. यावेळी प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने चित्रपट पाहण्यासाठी उपस्थित होता. टाळ्यांचा कडकडाट, हिंदुत्वाचा जयजयकार या सगळ्याने वातावरण प्रफुल्लित झाले होते. विशेष म्हणजे हा चित्रपट एका स्वयंसेवकांच्या समर्पण भावनेतून उभा राहिलाय.

राधास्वामी अवुला दिग्दर्शित ‘डॉ. हेडगेवार’ या हिंदी भाषी चित्रपटात डॉ. हेडगेवार यांच्या विशाल कार्याचा प्रवास मांडण्यात आलाय. चित्रपटाची संकल्पना व निर्मिती जयानंद शेट्टी यांची असून त्यांनी स्वतः प. पू. डॉ. हेडगेवारांची भूमिका साकारली आहे. जयानंद शेट्टी हे संघ स्वयंसेवक असून त्यांनी या चित्रपटकारिता आपले राहते घर पणाला लावले होते. मात्र चित्रपटाचे यश प्रेक्षकांच्या प्रतिसादातून दिसून आले.

चित्रपटाला अनुप जलोटा, सुरेश वाडकर, रवींद्र साठे, शंकर महादेवन, अवधूत गुप्ते अशा अनेक दिग्गज कलाकारांचे स्वर लाभले आहेत. हा चित्रपट पुढील एक आठवडा विविध चित्रपटगृहांत दाखवला जाणार आहे. त्यामुळे संघ शताब्दी वर्षात प्रदर्शित झालेल्या हा चित्रपट आवर्जून पाहण्याचे आवाहन चित्रपटाचे निर्माते व प्रमुख भूमिकेत असलेले जयानंद शेट्टी यांनी केले आहे.

चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान पद्मभूषण राजदत्तजी, ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी, अजिंक्य देव, अंगद म्हसकर, भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव सुनील देवधर, विलेपार्ले विधानसभा आमदार पराग आळवणी, आदी मान्यवर उपस्थित होते. देशातील प्रत्येक स्वयंसेवकांनी मनापासून पहायला हवा, जगायला हवा असा हा चित्रपट असल्याचे राजदत्तजी यांनी सांगितले. देश-राष्ट्रासाठी मी जगेन ही शपथ प्रत्येकाने घ्यायला हवी असे आवाहनदेखील त्यांनी केले. सामान्य स्वयंसेवकाने तयार केलेला हा एक महासागराचा चित्रपट असल्याची भावना अभिनेते अजिंक्य देव यांनी व्यक्त केली. त्याचबरोबर मनोज जोशी म्हणाले की, स्वयंसेवकांच्या समर्पण भावनेतून तयार झालेला हा चित्रपट आहे. संघाची गंगोत्री कुठून उगम पावली, हे आजच्या युवा पिढीला या चित्रपटातून कळेल.

चित्रपट कुठे कुठे पाहता येईल?

१) सन सिटी सिनेमा, विलेपार्ले पूर्व - सायंकाळी ५.४५ वा.
२) संगम सिनेमा, जे बी नगर - सायंकाळी ६ वा.
३) मूवी टाईम, हब, गोरेगाव पूर्व - रात्री ९ वा.
४) मॅक्सस सिनेमा, साकीनाका - सायंकाळी ७.३० वा.

ओंकार मुळ्ये

'मास मीडिया' या विषयातून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण.'कम्युनिकेशन ॲण्ड जर्नालिझम' विषयातून पदव्युत्तरपर्यंतचे शिक्षण पूर्ण. सध्या दै.'मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक म्हणून कार्यरत. लिखाण, संगीत, वाचन, फोटोग्राफी, इ.ची आवड.लिवोग्राफी भाषाशैलीत विशेष प्रावीण्य.बालपणापासून रा.स्व.संघाचा स्वयंसेवक