मुंबई : जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टच्या (जेएनपीटी) परिसरातील तेलगळती रोखण्यासाठी आणि समुद्रातील तरंगता कचरा गोळा करण्यासाठी जेएनपीटीने एमटीयूएलच्या माध्यमातून यंत्रणा कार्यान्वित केली आहे. तथापि, या बाबींवर समाधानकारक कारवाई व्हावी, यासाठी संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जेएनपीटीच्या यंत्रणांची पाहणी करण्यासाठी पाठवण्यात येईल, अशी माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली.
आ. प्रसाद लाड यांनी जेएनपीटीने बंदरात होणारी तेलगळती, कोळसा वाहतूक होऊन प्रदूषण आणि त्यामुळे मासेमारीचे नुकसान होत असल्याच्या प्रश्न विचारला, त्यावर मंत्री मुंडे यांनी उत्तर दिले. यात आ. भाई जगताप यांनीही उपप्रश्न विचारला. पंकजा मुंडे म्हणाल्या की, जेएनपीटीच्या आजूबाजूच्या समुद्र परिसरात मत्स्यमारीस बंदी आहे. हा परिसर मत्स्यमारीसाठी अधिसूचित क्षेत्र नसल्यामुळे आणि तिथे जहाजांची मोठ्या प्रमाणावर ये-जा असल्यामुळे प्रदूषणाचा धोका वाढतो. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्या भागात मत्स्यमारीस परवानगी नाही, अशी माहिती त्यांनी दिली.