मुंबई : मुंबईतील लोकल सेवा आणि बेस्ट सेवेनंतर आता मुंबई मेट्रो सेवेलाही मुंबईकरांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळतो आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण संचलित मुंबई मेट्रो २ अ आणि ७ या मार्गावरून एकाच दिवशी तब्बल ३ लाख १ हजार प्रवाशांनी प्रवास करत एक नवीन प्रवासी विक्रम केला आहे, अशी माहिती महामुंबई मेट्रो ऑपरेशनल कॉर्पोरेशन लिमिटेडने दिली आहे. एका दिवसातील आतापर्यंतची सर्वाधिक प्रवासी संख्या गाठत नवा मैलाचा दगड!, असे म्हणत एमएमएमओसीएलने आपला आनंद व्यक्त केला आहे.
"महा मुंबई मेट्रोनं ३ लाख प्रवाशांचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला आहे. हा मैलाचा दगड म्हणजे मुंबईकरांचा मेट्रोवरील वाढता विश्वास आणि झालेली घट्ट नाळ दर्शवतो. हे शक्य करणाऱ्या सर्व मुंबईकरांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि आमच्या समर्पित टीमचं देखील अभिनंदन करतो," अशा शब्दांत एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आणि महामुंबई मेट्रोचे अध्यक्ष डॉ. संजय मुखर्जी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
ते पुढे म्हणाले की, "दर महिन्याला आमच्या प्रवाशांची संख्या सरासरी ५% ने वाढत आहे. हे आमच्या सेवेवर असलेल्या विश्वासाचे द्योतक आहे. आम्ही मुंबईकरांना अखंड, सुरक्षित, वक्ताशीर आणि पर्यावरणपूरक सेवा देण्यास सदैव कटिबद्ध आहोत. याच दिवशी आम्ही एक नवा हरित विक्रमही केला. एकूण ६२ हजार २८२ प्रवाशांनी व्हॉट्सॲपच्या माध्यमातून, कागदविरहित तिकिटांची निवड केली, जो आजवरचा सर्वाधिक आकडा आहे. व्हॉट्सॲप आधारित मेट्रो तिकिटिंगमध्ये महामुंबई मेट्रो देशात आघाडीवर आहे. आमच्या एकूण तिकीट विक्रीपैकी २०% बुकिंग व्हॉट्सॲपवरून होते. देशातील सर्व मेट्रोंपैकी ही सर्वाधिक टक्केवारी आहे.
मुंबईकरांच्या या पर्यावरणपूरक निवडीमुळे स्वच्छ आणि हरित प्रवासाच्या आमच्या मिशनला अधिक बळ मिळाले आहे. मुंबईच्या वेगवान जीवनशैलीला जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पर्याय म्हणजे महा मुंबई मेट्रो आहे. मुंबईकरांनो, तुमच्यासोबत हा आनंददायी प्रवास यापुढेही अखंडपणे सुरूच राहील. तुमच्या पाठिंब्यामुळेच महा मुंबई मेट्रोचा प्रवास अधिक व्यापक आणि यशस्वी होत आहे, अशी भावना एमएमएमओसीएलने व्यक्त केली.