वाशिम, भंडारा, अंबरनाथ आणि पालघर येथील नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या कामांना गती द्या ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    09-Jul-2025   
Total Views |

मुंबई :  राज्यातील वाशिम, भंडारा, अंबरनाथ आणि पालघर येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रस्तावित आहेत. या महाविद्यालयांच्या बांधकामाकरिता जागा उपलब्ध होण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे. प्राधान्याने जागा उपलब्ध कराव्यात, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

विधानभवन येथे निर्माणाधीन वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांच्या जागा उपलब्धता व बांधकाम प्रगतीच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, मुख्य सचिव राजेश कुमार उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वाशिम, भंडारा, अंबरनाथ आणि पालघर येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बांधकामासाठी शासन मान्यता मिळाली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, आणि जिल्हा प्रशासनाने उपलब्ध जागांची पाहणी करून जागा निश्च‍ित करावी. या कामांसाठी सल्लागार संस्था नियुक्ती तसेच अनुषंगिक बाबींची वेळेत पूर्तता होण्यासाठी कालबध्द नियोजन करावे.कोणत्याही कामात दिरंगाई होवू नये याची स्थानिक प्रशासनाने दक्षता घ्यावी.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सिंधुदुर्ग, जालना, अमरावती, वाशिम, वर्धा, बुलढाणा, गडचिरोली, परभणी व हिंगोली येथे १०० विद्यार्थी क्षमतेचे विद्यार्थ्यांचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ४३० खाटांचे रूग्णालयांचे काम सुरू आहे. या महाविद्यालयांमध्ये सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी अतिरिक्त निधीची आवश्यकता आहे. त्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या नियमांनुसार सर्व कामांचा सुधारित सर्वसमावेशक प्रस्ताव उच्चस्तरीय समितीसमोर सादर करावा, असे आदेशही श्री. फडणवीस यांनी दिले.

बैठकीला मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव वित्त ओ. पी. गुप्ता, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, अपर मुख्य सचिव (वने) मिलिंद म्हैसकर, अपर मुख्य सचिव (कौशल्य विकास व उद्योजकता) मनीषा वर्मा, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, मुख्यमंत्री यांच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ. श्रीकर परदेशी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार, आरोग्य विभागाचे सचिव डॉ.निपुण विनायक, सचिव विरेंद्र सिंह, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, वैद्यकीय शिक्षण आयुक्त अनिल भंडारी, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण, आयुक्त आरोग्य सेवा आयुक्तालय महेश आव्हाड उपस्थित होते.

सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.