मुंबई : लेखक, विचारवंत आणि व्याख्याते दिवंगत नरहर कुरुंदकर यांच्या स्मारकाच्या कामासाठी दुसऱ्या टप्प्यात 3 कोटीचा निधी उपलब्ध करुन देण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांनी आज विधानपरिषदेत दिली.
विधान परिषदेत आज पुरवणी मागण्यांवर चर्चा झाल्यानंतर सांस्कृतिक विभागाच्या पुरवणी मागण्यांच्या उत्तराच्या भाषणात मंत्री शेलार यांनी प्रा. नरहर कुरुंदकर यांच्या स्मारकाला 3 कोटींचा निधीची देण्यात आल्याची माहिती दिली. नरहर कुरुंदकर यांचे वाङ्मयीन योगदान मोठे असून विचारवंत, लेखक, तत्त्वज्ञ म्हणून त्यांनी केलेले काम मोठे आहे. त्यामुळे त्यांचे भव्य स्मारक नांदेड येथे उभारण्यात येत असून त्याला प्रयत्नपूर्वक दुसऱ्या टप्प्यात 3 कोटी देण्यात आल्याचे मंत्री शेलार यांनी सांगितले.
तसेच महाराष्ट्रातील कोकणात असलेली कातळशिल्पे हा मोठा ऐतिहासिक ठेवा असून आपल्याकडे 52 गावात 90 ठिकाणी एकुण 1 हजार शिल्प सापडली आहेत. ही शिल्प इसवीसनाच्या पुर्वी 10 हजार वर्षेे जुनी असावी असा अंदाज आहे. त्यामुळे त्याचे जतन संवर्धन करण्यात येत असून त्याला युनोस्को चा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून जागतिक पातळीवर ती पोहचावी म्हणून एक माहिती पट तयार करण्यात येत आहे त्यासाठी या पुरवणी मागण्यांमध्ये तरतूद करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.. तर वृध्द कलाकार मानधन योजनेच्या 24 जिल्ह्यात कमिट्या गठीत करण्यात आल्या असून कलावंताना मानधन डिबीटी द्वारे देण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.